??

☆ टिकलीच्या_निमित्ताने…लेखिका : डॉ शरयू देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

तशी ती मी माझ्या मर्जीनेच लावते किंवा लावत नाही. पण मनात कैक वर्षं तिचं असणं /नसणं घोंगावत होतं.. सध्याच्या चर्चेत त्यालाच  वाट करून देण्याचा हा प्रयत्न ….

आई जुन्या मताची. त्यामुळे ‘टिकली न लावणं’ ही पद्धत तिच्या गावीही नव्हती. कुंकू /गंध/ टिकली न लावणं म्हणजे ‘आपल्या संस्कृतीला नाकारणं  आणि अमुक एका संस्कृतीला मूक पाठींबा दर्शविणं ‘ असं तिचं साधं सरळ गणित होतं. अर्थात मी लहानपणापासून बंडखोर, त्यामुळे इतर पुढारलेल्या विचारांच्या कुटुंबातील मुलींचं पाहून मीही गंध/ टिकली याला विरोध केला. आई म्हणायची, ” निदान बाहेर जाताना तरी लाव “.. ते थोडंसं पाळलं.

शाळेतल्या शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षिका, मुलींना ज्युदो कराटे शिकवण्यासाठी प्रोत्साहन देत आणि  शाळा भरताना कपाळावर गंध /टिकली नसेल तर २५ उठाबशा काढायला लावत. या परस्परविरोधी क्रियांमागची कारणमीमांसा समजून घेण्याची  मानसिक कुवत तेव्हा नव्हती. पण टिकलीविषयीचं गूढ निर्माण झालं ते तेव्हापासून. 

कॉलेजमधे आल्यावर वयानुसार येणारी परिपक्वता म्हणा किंवा आजूबाजूच्या विश्वाची थोडी अधिक जाण म्हणा, आईची बाजू थोडीथोडी पटायला लागली होती किंवा मुद्दाम विरोध करून तिला दुखवावंसं वाटेना. त्यामुळे जिन्स /western outfits घातले की टिकली नाही,आणि पंजाबी ड्रेसवर मॅचिंग टिकली असा आपला मधला मार्ग निवडला. तरीही टिकली /गंध याभोवतीचं गूढ आकर्षितच करत राहिलं…… ‘ लाव ‘ कुणी म्हंटलं की राग यायचा, पण ती लावल्यावर चेहरा जरा उठावदार, फ्रेश दिसतो  हे उघड उघड मान्य करायलाही कठीण जात असे.

सुट्ट्यांमध्ये गावी जात असू. तिथेही घरात आम्हाला मुली म्हणून कुठलीही बंधनं नव्हती. खानपान पेहराव याबाबत बऱ्यापैकी मोकळीक होती. आम्हीदेखील मुद्दाम जेष्ठांच्या समोर त्यांना आवडणार नाही असं काही करत नसू. गावात, इतरत्र बाहेर जाताना मात्र स्लिव्हलेस, बॉयकट असणं आणि टिकली नसणं हा चर्चेचा विषय ठरत असे. Obligatory झाल्या गोष्टी की मग उगाचच त्याविषयी तिटकारा निर्माण होतो. पण वय वाढत गेलं तसतसं मात्र ही जाणीव बोथट होत गेली. गावी गेल्यावर थोड्याशा मर्यादा पाळल्या की बाकी चैन असते हे लक्षात येत गेलं आणि बंडखोरी कमी होत गेली.

कॉलेजला असताना एक मुस्लिम मैत्रीण आमच्या पर्समधल्या टिकल्यांची पाकीटं घेऊन लेडीज रूममध्ये लावून आरशात बघत असे. कदाचित पहाण्याची सवय नसल्यामुळे असेल, पण तरीही साधारणच दिसणारी ती, टिकलीमुळे विशेष दिसत असे. पाच दहा मिनिटं ठेवत असे. त्या ५-१० मिनिटांत इवलीशी टिकली तिचा चेहेराच नव्हे तर मनही उजळून टाकत असे. साधं नेहमीचं टिकलीचं पाकीट कुणासाठी आनंदाचा स्त्रोत असू शकतो हे प्रथमच जाणवलं..

 Western Wardrobe असेल तर टिकली नाही लावायची हा पायंडा कायम ठेवला. भारतीय पोषाख परिधान केला की छोटीशी का होईना, पण  टिकली आपोआपच लावली जायची…  

पुढे पेशा निवडला तोही टिकलीचं महत्त्व वेगळ्या पद्धतीने दाखवून गेला. MA झाल्यावर लगेच हंगामी प्राध्यापिका म्हणून एका कॉलेजमधे जॉब मिळाला. माझे विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठे दिसत. पंजाबी ड्रेसमधल्या, बारीक टिकलीच्या, लहानखुरी असलेल्या मला कुणी प्राध्यापिका समजेना. विशेषतः वर्गातील मागच्या बेंचवरची मुलं टिंगल टवाळी करतायत असं जाणवलं. या व्यवसायात थोडा पोक्तपणा दिसण्यातही हवा हे लक्षात आलं. मग साडी नेसून आणि ठळकपणे दिसून येणारी टिकली लावायला सुरुवात केली तशी आपसूकच विद्यार्थी आदरानं, अदबीनं बोलायला लागले. टवाळखोर पोरांपासून दूर ठेवायला टिकली अशी धावून आली. प्राध्यापक, निवेदिका या सगळ्याच भूमिकांमध्ये टिकलीचं असणं मान देत गेलं. किंबहुना ती लावली नाही तर विनाकारण गैरसमज आणि चर्चा होत रहातील या विचाराने  ती लावण्याचीच सवय लागली. संस्कृतीचा संदर्भ बाजूला ठेवला तरी ही टिकली कुठेतरी अनेक विचित्र नजरांपासून वाचवणारी ‘सहेली’ बनत गेली. …

लग्न झाल्यावर अमेरिकेत गेल्यावर, एरवी नाही तरी, महाराष्ट्र मंडळात जाताना आवर्जून टिकली लावून जाणं असे…परदेशात भारतीय संस्कृतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असा छोट्या टिकलीतूनही केला जाई.. 

सासुबाई सुरूवातीला एक दोन वेळा टिकलीची आठवण करून देत. पण कदाचित सवयीने त्याही काही बोलेनाशा झाल्या. आजेसासुबाई मात्र एकदा स्पष्ट म्हणाल्या, ” तुला एरवी काय करायचं ते कर हो.. पण माझ्यासमोर अशी बिना कुंकू गंधाची येत जाऊ नकोस ..” हे ऐकताना किंचित राग येतोय की काय असं होतानाच त्या म्हणाल्या, “आमच्या कपाळावर आहे टिकली, पण खरं अर्थ आहे का त्याला?!” ह्या प्रश्नानं मात्र गलबलून आलं. पुन्हा कधीही त्यांच्यासमोर बिना टिकलीची गेले नाही. इतकुशा गोल तुकड्यानं आज्जेसासुबाईंचं मन जिंकलं तेव्हा मात्र अट्टाहास बाजूला सारला.. 

एरवी सगळे लाड पुरवणारा, सगळ्या बाबतीत मुभा देणारा मोठा भाऊ, आजही, अजूनही, माहेरी गेल्यावर, बाहेर जाताना  कपाळावर टिकली नाही अशी आठवण करून देतो, तेव्हा याचा संबंध स्त्रीमुक्तीशी न जोडण्याइतकी परिपक्वता आता आलीये. यात मला फक्त जाणवते ती त्याची धाकटी बहीण म्हणून काळजी आणि चुकूनही आपल्या संस्कृतीशी फारकत न होण्यासाठीची तळमळ. 

सासुबाईंनी मला टिकली लावण्याची सक्ती करू नये असं मी त्यांना आडून सुचवत असे. पण सासरे गेल्यावर जेव्हा थोडा वेळ रिकाम्या कपाळाच्या सासुबाई पाहिल्या तेव्हा मात्र धस्स झालं . माझ्या टिकलीमागची त्यांची भूमिका वेगळ्या पद्धतीने समोर आली आणि आता टिकली लावण्याची सक्ती मीच त्यांना करत असते . 

टिकली, मंगळसूत्र,  साड्या यांना कडाडून विरोध करणारी एक जेष्ठ मैत्रिण, नवऱ्याच्या अकाली निधनानंतर मात्र टिकली लावायला लागली. मध्यंतरी भेटली, ” हल्ली  साड्या नेसाव्या वाटतात गं खूप .. किती भारी भारी साड्या आणायचा ‘तो’.. मी मात्र त्याला ‘टिपिकल नवरा’ म्हणून चिडवत होते.. आता त्याची आठवण झाली की नेसते साडी आणि वर मॅचिंग टिकली सुद्धा …तिथून सुद्धा मला डोळा मारत असेल बघ “.. मनात आलं, हिची टिकली अजून वेगळी..

हौसेनं वेगवेगळ्या प्रकारच्या  टिकल्या लावणारी एक मैत्रीण, वेगळ्या समाजात हट्टानं प्रेमविवाह करून गेली तेव्हा टिकली नसलेलं तिचं भकास कपाळ पाहून हळहळ वाटली .” आता या कपाळावर कधीही टिकली येणार नाही ” हे तिचं वाक्यं  का कोण जाणे खूप खोलवर रूतलं. साधी टिकलीच ती, पण तिच्या नसण्यानं मैत्रिणीचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदललं. 

हैदराबादमध्ये आल्यावर, जॉब करताना जाणवलं की टिकलीचा आणि मॉडर्न असण्याचा काही संबंध नाही. Kafka, Derrida अशा विचारवंतांच्या क्लिष्ट संकल्पना सहज उलगडून दाखवणाऱ्या प्राध्यापिका भलं मोठं कुंकू लावून येत असत. आपण एका विशिष्ट धर्माचे आहोत (किंवा नाही आहोत) हे ठळकपणे दर्शविणं हैदराबादसारख्या ठिकाणी आवश्यक वाटत असावं आणि कदाचित त्याच जाणिवेतून इथल्या लहानथोर सर्व महिला टिकली आवर्जून लावताना दिसतात.

सुषमा स्वराज, स्मृती इराणी, निर्मला सिताराम, सुधा मुर्ती … यांच्या टिकल्या मला तळपत्या तलवारींसारख्या भासतात. बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यांचा अनवट संगम त्यांच्या कपाळावरच्या टिकलीने अधोरेखित होतो. त्यांचं कर्तृत्वच असं आहे की त्यांच्या कपाळावर धारण होऊन टिकलीचाच मान वाढलाय असं वाटत रहातं… 

टिकली अशी वेगवेगळी रूपं, अनेकविध संदर्भ घेऊन समोर येत राहिली. ती माझ्यातली बंडखोरी कमी करत गेली. अर्थात ती लावणं, न लावणं हा सर्वस्वी माझाच निर्णय. आधीही होता, आजही आहे आणि पुढेही राहील. पण आता प्रत्येक वेळी तिच्याभोवती स्त्रीमुक्तीचं वारूळ चढवायला नको वाटतं . घरात  ‘टिकली सुद्धा न लावणारी लंकेची पार्वती’ असा अवतार आजही कायम असतो. .सक्ती केली जात असेल तर आवडत्या गोष्टी देखील नावडत्या होतात. लावण्याची असू नये तशी न लावण्याची पण असू नये इतकंच.  चाळीशीत आता एक जाणवतंय की उगाच विरोधासाठी विरोध करायची गरज नसते , विनाकारण प्रसिद्धीसाठी टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही. 

बाकी हा लेख लिहीत  मी लहानपणापासून पहात असलेला , माझ्या काकूंचा कुंकूविरहित चेहरा सतत समोर होता. भर तारुण्यात ते पुसलं गेलं. घरात कुणीही न लावण्यासाठी बळजबरी केली नव्हती. पण त्या काळच्या प्रथेनुसार काकूंनी स्वतःच ते लावण्याचं नाकारलं…साजशृंगाराची आवड असणाऱ्या माझ्या काकूला हा निर्णय घेताना किती जड गेलं असेल ! ……. जी टिकली ” माझ्या कपाळावर माझ्या मर्जीनेच लागेल ” असा हट्ट करते, त्याच इलुशा टिकलीसाठी एक कपाळ गेली चाळीस वर्षे किती आसुसलेलं, अतृप्त राहिलंय याचा विचार करून मात्र अंगावर काटा येतो… 

लेखिका :  डॉ शरयू देशपांडे, हैदराबाद

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments