श्री अमोल अनंत केळकर

☆  मनमंजुषेतून : मुंबईस्पिरीट  – श्री अमोल केळकर

Running (Raining)  successfully since २६ जुलै २००५

१५ वर्ष होतील.  अनेक प्रसंग जातायत डोळ्यासमोरुन. त्यानंतरची एक ही २६ जुलै अशी नाही की २००५ ची आठवण आली नाही मुंबई वर अनेक संकटे आली. पण २६ जुलैच्या संकटाचा वय्यक्तिक अनुभव घेतल्याने ते मनावर कायम कोरले गेलंय म्हणूनच आज सगळ्या जगासमोर भयानक आपत्ती असताना, यापूर्वी असे भयानक संकट कुठले अनुभवले?  तर २६ जुलैचा प्रलय असे मी सांगेन

दुपारी ३ ते दुस-या दिवशी उजाडेपर्यत मुंबईची जीवन वाहिनी अर्थातच लोकलच्या कुशीत, कुर्ला स्थानकात ती काळ रात्र काढली. त्यावेळी स्थानकात दोन लोकल एक ठाण्याकडे जाणारी तर एक मुंबई कडे जाणारी ज्यात मी स्वतः होतो, माझ्यासारख्या  हजारो लेकरांचा सांभाळ करत या दोन माऊली भक्कम उभ्या होत्या.

मी कुर्ला स्थानकात लोकल मधे सुखरुप अडकलोय हा घरी साधारण रात्री ७ च्या सुमारास धाडलेला शेवटचा निरोप. नंतर केवळ प्रतिक्षा.

काही तासात लोकल सुरु होऊन कुर्ल्याहून पहिल्या लोकलने परतायचे भले  रात्रीचे ११/१२ वाजले तरी चालतील ही आशा संपुष्टात आली जेंव्हा रुळावरील पाणी फलाटाला समांतर आले आणि त्यानंतरच्या थोड्याचवेळात लाईट ही गेले.

मग लक्षात यायला लागले जे घडतय ते भयानक आहे.

नेहमीसारखा भुकेला स्टेशनवरचा “वडा -पावच” धाऊन आला.

आपत्तीत लुबाडणूक करायचा विषाणू त्यावेळी इतका पसरला नव्हता त्यामुळे योग्य भावातच मिळाला.

तो खाऊन परत जाग्यावर येऊन बसलो. खिडकीची जागा आणि वाट काढून आत टपकणारा पाऊस त्यामुळे ती जागा दुस-या कुणी घेणे शक्य नव्हते. कोसळणा-या पावसाच्या प्रचंड आवाजात थोड्या थोड्या अंतराने डुलक्या घेऊन,  झुंजमूंज झाल्यावर आता रस्त्याने जायचे ठरवले

कुर्ला ( पू) ला स्टेशनबाहेर कमरेपेक्षा जास्त पाण्यातून, आफीस बॅग सांभाळत देवनार डेपो पर्यत चालत जाऊन,  नंतर बसने वाशी आणि मग वाशी- बेलापूर रिक्षा असा प्रवास करत २७ जुलै मध्यान्ही ला सुखरूप घरी पोहोचलो आणि या भयानक अनुभवाचा सुखरूप शेवट झाला.

कुणी विसरु शकेल

ती काळी रात्र  ?

जणू सागरच बनले होते

मिठी नदीचे पात्र ……

.

.

तरीही आमचे सुरु

शहरीकरणाचे सत्र

शिकलो नाही आपण

यातून काडी मात्र

(अमोल)

२६ जुलैग्रस्त  नवीमुंबईकर

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

सुरेख चित्रण.पण हम नही सुधरेंगे हेच खरं.