? मनमंजुषेतून ?

☆ धुंधुरमास स्पेशल… अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

मागच्याच आठवड्यात कसब्यात मित्राबरोबर बोलत थांबलो होतो. आमच्या शेजारून दोन ‘आज्या’ म्हणाव्या इतपत वयस्कर बायका बोलत चालल्या होत्या. ”वहिनी उद्या पहाटे वेळेत येताय ना धुंधुरमासाच्या कीर्तनाला ?” मग वहिनींनीही किंचित खोकत, ”हो हो, आज मुलालाच सांगून ठेवते सोडायला, उद्या नै हो उशीर होणार !”, बोलत दोघी पुढे निघून गेल्या. मला मात्र त्यानिमित्तानी कित्त्येक महिन्यांनी ‘धुंधुरमासाची’ आठवण झाली.

मग विचार केला की धुंधुरमास शब्द ऐकल्यावर,’ म्हणजे काय?’ हा प्रश्न तरी निदान मला आणि माझ्या मित्राला पडला नाही. कारण नशिबानी माझ्या पिढीला तरी धुंधुरमास म्हणजे काय ? हे सांगणारे लोक आजूबाजूला तरी होते. पण आजकाल अनेक ठिकाणी मुद्दलातच घोटाळा असतो. त्यामुळे आजच्या मुलांना धुंधुरमास म्हणजे काय ते सांगण्यासाठी चार शब्द तरी लिहायलाच पाहिजेत.

सूर्य धनु राशीत भ्रमण करतो तो म्हणजे धनुर्मास ऊर्फ ‘धुंधुरमास’. आयुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणाऱ्या ह्या धनुर्मासात सामान्य लोकांचा जठराग्नी (भूक) भल्या पहाटे जागृत होतो. त्यामुळे ह्या महिन्यात पहाटे उठून ह्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या, बाजरीसारखी धान्ये खायचे महत्व फार आहे. हे खाणं इतर ऋतूमध्ये  पचायला जड असलं तरी ह्या महिन्यात/ऋतूमध्ये मात्र ‘राजस’ मानलं गेलंय. वर्षभर खाण्यातून मिळणारी ‘एनर्जी’ आपल्याला फक्त ह्या एका महिन्यातल्या खाण्यातून मिळवता येते, येवढं ह्याचं प्रचंड महत्व पूर्वजांकडून सांगितलं गेलंय. आत्ताच्या पिढीला हे माहिती असण्याची शक्यता कमी, कारण आजकाल जिथे लोकांना मराठी महिनेच पाठ नसतात तिथे कालनिर्णयमधेही उल्लेख नसलेला ‘धुंधुरमास’ कोण लक्षात ठेवणार ?

ह्या ऋतूमध्ये खरी चव मिळणाऱ्या गवार, फरसबी, वांगी, मटारासारख्या ‘लेकुरवाळ्या’ फळभाज्या आणि बाजरी सारखी पिठं, पहाटेच्या वेळी जेव्हा पोटातली भूक पूर्णपणे ऐन भरात असते त्यावेळी खाण्यातली मजा, आणि त्यांची सहज होणारी पचनक्रिया ह्यांचा विचार,जेवणाकडे “अन्न हे पूर्णब्रम्ह” म्हणत वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघणाऱ्या संस्कृतीत प्राचीन कालापासून केला गेलाय, हे लक्षात आलं की त्याबद्दलचा आदर एक ‘फुडी’ म्हणून आजही वाढतो.

काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक लहान गावातच नाही, तर अगदी पुण्यातदेखील ठीकठिकाणी धुंधुरमास वेगळ्याच आनंदात साजरा व्हायचा. शहरातल्या जुन्या, प्रमुख मंदिरात काकड आरत्यांना जोडून नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं व्हायची. घराघरातून सूर्याला अर्घ्य देऊन नैवेद्य दाखवून पहाटे साग्रसंगीत जेवणं व्हायची. तरीपण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोन वगेरे बाजूला ठेऊन खाण्याची धुंधुरमासाची खरी मजा लुटायची असेल तर एखाद्या लहानश्या खेड्यातून जावं. काही दिवस आधी, रामाच्या पारी घरच्या शेतावर धुंधुर्मासातल्या चुलीवरच्या साग्रसंगीत जेवणाचा बेत ठरतो आणि एका सूर्योदयाच्या सुमारास शुचिर्भूत होऊन समस्त कुटुंब स्वतःच्या शेतावर हजर होतं. तो नजारा पाहण्यासारखाच असतो.

तांबडं फुटत असतानाच घरच्या गड्यांनी लावलेल्या सगळ्यात मोठ्या चुलीवर थोरल्या जाऊबाईंनी पदर खोचून मटार, गवार, गावरान गाजरं ह्यांची लेकुरवाळी भाजी स्वतः करायला घेतलेली असते. माहेरी आलेली लेक मटाराचे दाणे तोंडात टाकत मोठ्या वहिनीशी गप्पा मारत बसलेली असते. शेजारच्या दुसऱ्या चुलीवर फ़र्माईशीवरून भरतासाठी वेगळ काढलेलं मोठं, हिरवं वांगं गोवऱ्यांवर भाजण्यात दुसऱ्या सूनबाई दंग असतात. काटे काढून भाजलेल्या वांग्यात शेतातल्या ताज्या काढलेल्या भुईमुगाचे ‘कवळे’ दाणे पडतात. मुठीत मावतील येवढ्या हिरव्या मिरच्या, हाताशी असावी म्हणून बांधावरून नुकतीच खुडलेली कोथिंबीर दिमतीला असतेच. भाजत,गार होत आणि शेजारी लावलेल्या लोखंडी तव्यावरून ‘परतीचा’ प्रवास करत वांग्याचे भरीत ताटात पडतं. घरातल्याच असणाऱ्या रखमाच्या हातांतून पाणी लावून तव्यावर सर्रकन पडलेल्या,मुबलक तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्यांच्या वासानी एव्हाना हृदयाचा ठाव घेतलेला असतो. नैवेद्याच ताट सूर्यदेवाला दाखवल्यावर जेवणं सुरु होतात. चुलीवरचे भाजलेले पापड पटापटा पानात पडतात. घरी विरजून आणलेल्या दह्याचं लोणी वाढायचं काम घरातल्या आईसाहेबांनी स्वतःच्या हातात ठेवलेलं असतं. एकीकडे प्रत्येकाच्या पानाकडे लक्ष देत, आपल्या मनासारखं लोणी वाढत त्यांची देखरेख सुरु असते.

चुलीतून भाजून वेगळ्या काढलेल्या मिरच्यांचा ठेचा वाटायचं काम दिलेली घरातली एखादी परकरातली मुलगी मधेच लाजत येऊन पहिल्यांदाच केलेला ठेचा घाईनी ताटात वाढायला घेते.तिच्या वाढण्यावर लक्ष असलेल्या तिच्या आईची,“ सुलक्षणे ठेचा डाव्या बाजूला वाढावा की ग !”, अशी हाक आल्यावर पटकन आपली जीभ चावत धाकट्या काकाच्या ताटात डावीकडे ठेचा वाढते. “सुलक्षणाताई,आत्ता ठीकाय,पन सासरी गेल्यावर कसं व्हायाचं तुमचं?” म्हणाल्यावर “गपे काका,मला नै कधी लग्न करायचं”, म्हणत लाजून पसार होते. ते ऐकून समस्त काका,काकू,आत्याच्या हास्याचा आवाज ‘समद्या’ माळावर पसरतो. त्या नादात जेवताना तिखट लागल्यावर घरून बांधून आणलेल्या गुळपोळ्या प्रत्येकाच्या पानात पडत रहातात. हास्यविनोदात नेहमीपेक्षा चार घास जास्ती गेलेले कोणाला लक्षातही येत नाही.

तालेवार घराण्यांतून आलेल्या मोठ्या सुनांच्यापुढे बोलायची टाप नसलेली नुकतीच लग्न होऊन आलेली धाकटी सून, खांद्यावरचा पदर सावरत कोपऱ्यातल्या चुलीवर मंद आचेवर ठेवलेली मूगडाळीची खिचडी ढवळत मधूनच आपल्या धन्याकडे चोरटा कटाक्ष टाकत लाजत कोपऱ्यात उभी असते. सगळ्यांना तिची आठवण होते ती आज मोठ्यांच्या पंक्तीत बसलेल्या लहान मुलांची जेवणं उरकताना. नवीन धाकट्या काकूला सयेनी बिलगणारी घरातली मुलं मग तिचा धावा करायला लागतात. “धाकल्या सुनबाई खिचडी घ्या वाढाया”, असा सासुबाईंचा आवाज आल्यावर तंद्रीतून भानावर आलेल्या धाकल्या सूनबाई लगबगीनी मऊसुत खिचडी पुतण्यांच्या पानात एकेक करून वाढायला घेतात.

कुटुंबातले थोरले आण्णा,तात्या औंदाच्या पिकपान्याची चर्चा करीत आपल्या ‘बारदानाकडे’ बघून मनात समाधानानी हसत असतात.गावोगावी रंगणाऱ्या धुन्धुरमासाच्या ह्या जेवणावळी म्हणजे एकत्र कुटुंब व्यवस्थेला बांधून ठेवणारी ‘जान’ होती.

माझ्या माहितीत हेमंत ऋतूत भारतात इतरत्र कुठे अश्या जेवणावळी होत असल्याचं ऐकिवात नाही. असतील तर जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. पण आज महाराष्ट्रातही आजूबाजूला पाहिलं तर शहरात घरोघरी होणारे धुन्धुरमासाचे कार्यक्रम आता होताना दिसत नाहीत. रा.स्व.संघासारख्या संघटनांमध्ये काही ठिकाणी वैयक्तिक पातळीवर ह्या जेवणाची परंपरा टिकवून धरली जाते. जे जे लोक, संस्था ही अस्सल मराठी परंपरा टिकवून ठेवतायत त्यांचे प्रत्येकानी स्वागत करायला हवं. पुन्हा घरोघरी अश्या धुंधुरमास स्पेशल जेवणावळीची सुरुवात व्हायला हवी. कारण धुंधुरमासाच्या ह्या जेवणामध्ये “हाय कॅल्शियम,प्रोटीन्सच्या” खाण्याबरोबरच अदृष्य अशी ‘इंडीयन फॅमिली व्हॅल्यू” आहे. त्याची सर एसी हॉटेलात मेलामाईनच्या डिशमध्ये प्रत्येकी १२५ ग्रॅम पंजाबी भाजी, बटर रोटी आणि जीरा राईस खाऊन, वरती प्रत्येकी एक स्कूप आईस्क्रीमवर सांगता होणाऱ्या शहरी गेट टू-गेदर्सना येणं केवळ अशक्य.

शब्दांकन – अंबर कर्वे 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments