श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ मराठी — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

माझा लय जीव हाय ह्या बाईवर. मस्त, मोकाट, उंडारल्या खोंडासारखी भाषा ! लावल तितके अर्थ कमी ! पंढरपूरच्या घाटापासून ते पुण्यातल्या पेठेपर्यंत किती कळा तिच्या अंगात !

नाकातून आवाज आला की लगेच कळतं की कोकणातून लेले किंवा नेने आलेत. “रांडेच्या” म्हणले की लगेच कोल्हापुरी पांढरा रस्सा आठवतो. ” का बे छिनालच्या ” म्हणलं की सोलापूरची शेंगा चटणी आणि “पोट्ट्या” म्हणलं  की नागपुरी सावजी जेवण. पोरीच्या तोंडून ” मी तिथे गेलो” आणि  “ऐकू आलं  म्हणलं  की सांगली !! “काय करून राहिला?” म्हणलं की नाशिक, “करूलाल?” म्हणलं की लातूर आणि ” विषय संपला ” म्हणलं की पुणे !! हेल काढून बोललेला नगरी किंवा बीडचा आणि “ळ” चा “ल” केला की कोकणी ! एका वाक्यात माणसाचं गाव कळतं.

हिंदी बोलताना तर मराठी माणूस लगेच कळतो. आमच्या इतकी हिंदीची चिंधी कुणीच केली नसेल. मराठी माणसाचे हिंदी आणि मुसलमान बागवान लोकांची मराठी म्हणजे विष विषाला मारते त्यातला प्रकार. ” हमारी अडवणूक हो रही है ” हे मराठी हिंदी, आणि ” वो पाटी जरा सरपे ठिवो ” ही बागवानी मराठी ऐकून मी लय खुश होतो राव ! मराठी खासदार आणि राजकारणी लोकांचं हिंदी ऐकून तर हिंदी पत्रकारांना घाम फुटत असावा.

एकाच गोष्टीला प्रतिशब्द तरी किती ? बायको, पत्नी, सौभाग्यवती, अर्धांगिनी, सौ, खटलं, कुटुंब, बारदान, बाई, गृहमंत्री, मंडळी—- इत्यादी सगळ्याचा अर्थ एकच– ! “इ” सारख्या आडवळणी शब्दापासून पण सुरु होणारे कितीतरी वेगवेगळे अर्थाचे शब्द… जसे की “इस्कोट”, “इरड करणे”, “इरल”, “इकनं”. — “ग्न” ने शेवट होणारे चार शब्द मराठीत आहेत … लग्न, मग्न, नग्न आणि भग्न. किती मस्त क्रम आहे ना? हे “ग्न” बाबत आमच्या मास्तरच ज्ञान !

इदुळा, येरवा, आवंदा, कडूस पडाय, झुंजूमुंजू, दोपार, सांच्याला, रातीला, तांबडं फुटायला— यातून जो वेळ कळतो त्याची मजा am, pm ला कधीच येणार नाही. कोरड्यास, आमटी, कट, शेरवा, तर्री, शॅम्पल यातला फरक कळायला महाराष्ट्र उभाआडवा बघावा लागतो. खेकडा कुठला आणि चिंबोरी कुठली? उंबर कुठलं आणि दोड्या कुठल्या? शाळू, ज्वारी आणि हायब्रीड यातला पोटभेद कळायला रानातली मराठी लागते. कडवाळ कुठलं न मका कुठला हे शेरातला शाना कदीबी सांगू शकत नाय !

खाण-पिणं असू द्या, जनावरं-जित्राब असू द्या, शिव्याशाप असू द्या, लाडाची नाव असू द्या, वेळ-काळाची गणित असू द्या, हुमान-कोडी असू द्या, ओव्या-अभंग असू द्या, अंगाई असू द्या, सणवार असू द्या, झाडाझुडुप असू द्या, शेतीची अवजारे असू द्या, कापडचोपड असू द्या नाहीतर अजून काही,—- मराठी प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. प्रत्येक गावात, शहरात, कामात, धंद्यात … सगळीकडे मराठीचा वेगळा बाज असतो, अंदाज असतो आणि लकब असते. दिवसातून ५ वेळा कपडे बदलणाऱ्या अवखळ, सुकुमार पोरीसारखी ही भाषा सगळीकडे नवनवे रंग उधळत असते.

माय मराठी… तुझ्यावर लय जीव आहे बाये !!! अशीच उंडारत राहा… वारं पिलेल्या खोंडासारखं !!

लेखक : डॉ. विनय काटे

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments