सौ अंजली दिलीप गोखले
मनमंजुषेतून
☆ एक मनोगत…डाॅ.दीपाली घाडगे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
लिहायला हवंच खरं तर. हा विषय डोक्यात नव्हता. कालपासून ग्रुपवर मेसेज बघितल नव्हते. आत्ता पाहिले,आणि मग राहवलं नाही. मी स्वतःला तसं कधी मानत नाही, पण शेवटी सत्य तेच असतं. म्हणून विचार केला की इतक्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करते, आता विधवांचं देखील करावं.
मुळात मला स्त्रियांमध्ये विधवा, सधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता ,कुमारिका, असा भेद करणं मान्य नाही. सगळ्या पुरुषांच्या नावाच्या आधी श्रीयुत लावलं जातं, मग सौभाग्यवती आणि श्रीमती असा भेद का असावा ? थोडंसं परखड होईल पण पुढील गोष्टीवरुन लक्षात येतं की पुरुषप्रधान संस्कृतीमधील हे जोखड आहे, किंवा आपमतलबी पुरुषांनी तयार केलेली ही संस्कृती आहे.
समस्त स्त्रियांना नटण्याची, छान दिसण्याची आवड असते हा मुद्दा बाजूला ठेवला तरी —– मंगळसूत्र,मांग-टीका,जोडवी, सिंदूर ही आभूषणे काय दर्शवतात? या एका स्त्रीचं लग्न झालेलं आहे आणि त्या एका स्त्रीचं झालेलं नाही. फक्त एखाद्या पुरुषाला बघून कळतं का, तो अविवाहित आहे की विवाहित? स्त्रीकडे बघून मात्र लगेच लक्षात येतं आणि अंदाज देखिल बांधले जातात.
आता मुद्दा विधवा स्त्रियांनी ओटी भरून घेणं, हळदीकुंकू लावून घेणं– हे नाकारण्याचे, तिच्यावर हजारो वर्षापासून झालेले संस्कार आहेत, ” तू जर शुभकार्यात पुढे झालीस तर तिथे काही तरी अशुभ होईल.”—- मग कोणाला वाटेल की आपल्यामुळे कोणाचे वाईट व्हावे?—- मी एक स्वावलंबी, सुशिक्षित, पुरोगामी, काहीशी बंडखोर वृत्तीची असून सुद्धा काही वेळा माझ्या मनात असा किंतु क्षणैक का होईना येतो. मग ज्या महिला परावलंबी आहेत, कमवत नाहीत, त्यांच्या मनात भीती असणारच ना आणि सालोसाल चालत आलेल्या संस्कारांचे ओझे झुगारून देणे अजिबातच सोपं नसतं.
कोणत्याही धर्माबद्दल मला काही म्हणायचे नाही. परंतू = गार्गी मैत्री राहतात पुराणात. वर्तमानात अजूनही माझ्यासारख्या महिलेला ओवसायला जाताना कोणी हाक मारीत नाही, की वडाची पूजा करताना पर्यावरणाचा विचार करून सुद्धा कोणी बोलावीत नाही.—- तुम्ही साऱ्याजणी डॉक्टर आहात विचाराने पुरोगामी आहात. पण समाजातील हे प्रमाण किती टक्के? बहुसंख्य समाज झी मराठी आणि कलर्स प्रमाणे चालतो. तिथले सगळे सणवार हेव्यादाव्यांसह, श्रद्धा-अंधश्रद्धा यासह समाजात साजरे केले जातात.
कधी कधी वाटते, .. फुले, आंबेडकर, आगरकर, शाहू महाराज, यांचा पुरोगामी महाराष्ट्र हाच आहे का? सुदैवाने माझे सासर, माझ्या सर्व मैत्रिणी अतिशय पुरोगामी आहेत. त्या असा कोणताही भेदभाव करीत नाहीत. पण मला वाटायचे की असे व्यक्त व्हायची गरज का असावी? फक्त एका स्त्रीतत्वाने दुसऱ्या स्त्रीतत्वाचा सन्मान करणं जमू नये का? जसं पंढरीच्या वारीत प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला माउली म्हणून भेटतो, त्याचप्रमाणे तू कोणीही अस– विधवा, सधवा, घटस्फोटिता अथवा कुमारी – तुझ्यातल्या स्त्रीत्वाचा माझ्यातलं स्त्रीत्व सन्मान करतंय, आणि म्हणून मी तुला हळदीकुंकवाची दोन बोटं लावते, एवढं साधं आहे. – आणि हे जमू नये हे आपलं दुर्दैव.
बाकी मधु, विषयाला वाचा फोडल्याबद्दल खरंच आभारी आहे आणि सावंतवाडी वैद्य राण्यांमधील सर्व सख्यांचे पण आभार.
लेखिका – डॉ. दिपाली घाडगे, विटा..
प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈