सौ. सुचित्रा पवार
☆ रे मना… आज कोणी बघ तुला साद घाली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
मन ! संस्कृत आणि प्राकृतातही एकच शब्द, काय आहे हो याची व्याख्या ?
“The heart is situated at the left side in the human body“–असं हृदयाबद्दल खात्रीशीर सांगितलं जातं मग मनाचं काय? कुठे असते ते वसलेलं ? हृदयात? हृदयाच्या पाठीमागे ? शरीराच्या उजव्या बाजूस ? मेंदूत ? नेमके कुठे? काहीच सांगता येत नाही ना?
बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘आता होतं भुईवर, गेलं गेलं आभायात’. असंच काहीसं मनाचं स्थान आहे. शरीरात कधीच स्थिर नसणारे मन, ठावठिकाणा नसणारे मन, आपल्या शरीरावर ,जीवनावर मात्र प्रभावशाली अंमल करते. हृदयाची जागा खात्रीशीर असून देखील ते कधीकधी कमजोर असते ,नव्हे ते कमजोर असले तरी चालते कदाचित ! त्यावर उपचार करता येतात.. पण मन कमजोर असेल तर? तर मात्र माणूस पूर्ण दुबळा होतो. त्याची जगण्याची दिशा बदलते, त्याची आकांक्षा ,उमेद सर्वच नष्ट होते.
A sound mind in a sound body असं म्हटलं आहे ते उगाच नव्हे ! ‘ मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ‘!! असं तुकारामांनी म्हटलंय; कारण माणसाचे मन शुद्ध असेल तर त्यात सर्व भाव शुद्ध येतात, अन कर्मेही शुद्धच होतात.स्वच्छ पाण्यात सभोवतालचा परिसर स्वच्छच दिसतो. तसेच मनाचे देखील आहे. मनापासून केलेले कोणतेही काम मनाला आनंद ,उत्साह ,उभारी देते अन मन प्रसन्न करते. आणि त्यावरच त्या कामाची यशस्वीता देखील अवलंबून असते . वरवर केलेले काम भलेही चांगले दिसले तरी स्वतःस समाधान देत नाही . मन लावून केलेली देवपूजा मन शांत करते ,चित्त प्रसन्न करते. मन लावून धुतलेले कपडे ,घासलेली भांडी कशी स्वच्छ ,चकचकीत होतात ! मन लावून केलेला स्वयंपाक रुचकर होतो अन भूक तृप्त करतो .मनापासून केलेला अभ्यास ज्ञान वाढवतो. मनापासून गायलेलं गाणं हृदयास भिडते ,असे सर्व काही मनाच्या ओलसर भूमीतून अंकुरते .
एवढ्याश्या मनाची व्याप्ती मात्र खूप मोठी असते. शक्ती तर कितीतरी पट मोठी असते. म्हणून पंगूसुद्धा हिमशिखरे ओलांडतात, नावेशिवाय नदीचा तीर गाठतात. ‘ मन कधी कधी इतके छोटे होते की चिमटीहून लहान जागेत मावते अन कधी इतके मोठे होते की त्यात सारे अवकाश सुद्धा समावते ‘…..
‘मन एवढं एवढं जणू खाकशीचा दाणा
मन केवढं केवढं त्यात आभाय मायेना !’
मनोव्यापारावर मानवी देह व जीवन अवलंबून आहे. कधी ते आकाशात स्वैर भरारी मारते तर कधी फांदीवर बसून हिंदोळते. कधी चांदणे बनते तर कधी गच्च काळोख ! कधी भिरभिरते तर कधी स्थिर बसते ! अगदी निमिषार्धात ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाते.आपल्या प्रिय व्यक्तीपाशी पोचते. त्याच्याशी हितगुज करते, कधी रुसते तर कधी हसते, कधी खट्टू होते तर कधी लट्टू !
या जगात सर्वात वेगवान काय असेल तर ते मन ! एवढे मात्र खरे की, मन उत्साही असेल तर जीवन उत्साही प्रवाही राहते. मनाला कीड लागली , आजार लागला तर देह कितीही सशक्त असला तरी कमजोर बनतो, आजारी पडतो .
मन तरुण असेल तर ते म्हातारपणही टवटवीत बनवते, आणि मन म्हातारे असेल तर तारुण्यातही म्हातारपण येते. म्हणूनच मनाला हवे जपायला फुलासारखे ! मग बघा या फुलाभोवती किती रंगीबेरंगी आनंदाची फुलपाखरे रुंजी घालतात अन जीवन मधाळ फुलपाखरी होते !…. फुलपाखरू खरेच छान किती दिसते !!
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈