☆ किंमत अन्नाची … सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆
यू ट्युबला एका आहारतज्ञाचं भाषण ऐकण्यात आलं. त्यात त्यांनी योग्य आहार,सप्लिमेंट्स यांद्वारे अनेक रुग्णांना विविध आजारांतून कसं बरं केलं ,ते प्रभावीरीत्या सांगितलं होतं..
काही महिन्यांपूर्वी निघालेली B12 व D जीवनसत्त्वाची कमतरता व काही तब्येतीच्या तक्रारींमुळे मी या
आहारतज्ञांकडे फोन केला.फोन साहजिकच रिसेप्शनिस्टने घेतला…. ” आमच्या मॅडम ऑन लाईन तुमच्याशी ३० ते ४० मिनिटे बोलून तुम्हाला सल्ला देतील. या सल्ल्याची फी रु. तीन हजार असेल. तुमची केस पाहून तुम्हाला आम्ही तीन महिन्यांसाठी एक डाएट प्लॅन देऊ. तो तुम्हाला फॉलो करावा लागेल.तुम्ही जर हा प्लॅन घेतलात तर
तीन हजारमधील दोन हजार रुपये आम्ही परत करू.”
दोन हजार रुपये परत करणार म्हटल्यावर मला एकदम भारी वाटलं. डाएट प्लॅन घ्यायचाच ,असा पक्का निश्चय करून मी विचारलं, ” मॅडम, म्हणजे हा डाएट प्लॅन एक हजार रुपयात मला पडेल नं?”
” अहो मॅडम नाही नाही.डाएट प्लॅनची किंमत वेगळी पडणार.”
” किती आहे किंमत” मी जरा नाराजीनेच विचारले.
” प्रत्येक पेशंटनुसार प्लॅन वेगळा असतो.त्यामुळे किंमतही वेगळी असते.”
” अहो पण रेंज असेल नं,कमीत कमी किंमत काय असेल ?”
“साठ हजार”. ….
माझ्या हातातून फोन खाली पडला. दोन दिवसांनी माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या चित्राच्या घरी गेले होते.
तिला ही घटना ऐकवली. क्षणार्धात तिचा चेहरा रागाने लाल झाला. ती आत गेली. हातात अनेक बाटल्या,प्लास्टिकचे डबे आणि फाईल घेऊन बाहेर आली….. आठ महिन्यांपूर्वी चित्राला खूप अशक्तपणा वाटू लागला होता.काम होत नव्हते.चिडचिडेपणा आला होता.जगण्यात अर्थ वाटत नव्हता. ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला तपासले.त्यांना काही विशेष आजार वाटला नाही. जीवनसत्त्व ,लोहासारखी खनिजं यांच्या कमतरतेमुळे असं होऊ शकतं. पौष्टिक, संतुलितआहाराने बरं वाटेल, असं त्या जुन्या जाणत्या डॉक्टरांचं मत पडलं.
लक्ष्मी पाणी भरत असलेल्या चित्राच्या घरात अन्नाची काही कमी नव्हती. स्वयंपाकाच्या मावशी दोन्ही वेळेला प्रत्येकाच्या आवडीचं जेवण रांधत होत्या. पण चित्राला दाक्षिणात्य पदार्थ आवडत .ती बरेचदा वैशाली, वाडेश्वरमधून इडल्या,डोसेच मागवून खाई. इतर वेळी वरणभातावरच तिचं पोट भरत असे. आईस्क्रीम मात्रं तिला रोज लागायचेच. आणि चहा हे तिचं अमृत होतं. दिवसातून सात-आठदा तरी तिचा चहा होत असे. चित्राच्या लेकीचे चायनीजशिवाय पान हलत नसे. ती मैत्रिणींबरोबर चायनीज खाऊनच घरी येत असे. शिवाय डॉमिनोज ,पिझा हट, मॅकडी ही तिची तीर्थस्थानं होती. घरची पोळी भाजी तिला बोअर होई. भात खाणं हे तर तिला पाप वाटे. पिझा,बर्गरनी तिच्या व्यक्तीमत्त्वाला चांगलच वजनदार केलं होतं.. मंदार ,चित्राचे यजमान त्यांच्या धंद्याच्या निमित्ताने बरेचदा बाहेरच असत. सामिष जेवण त्यांचा जीव की प्राण…विविध गावांतील कोणत्या हॉटेलात फिश चांगला मिळतो, कुठे बिर्याणी लाजवाब असते, हे सांगताना सरस्वती त्यांच्या जीभेवर नाचत असे. मटन,तांबडा-पांढरा खाण्यासाठी ते मित्रांबरोबर खास कोल्हापुरला जात असत. त्यामुळे चित्राच्या शाकाहारी घरी जेवणासाठी ते क्वचितच असत.
चित्रावर त्यांचं खूप प्रेम होतं. म्हणूनच चित्रा आजारी पडल्यावर त्यांनी तिला लगेच डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी जेंव्हा जीवनसत्त्व, खनिजे, लोह यांची कमतरता सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढ्या समृद्ध भरल्या घरात असं का व्हावं ते त्यांना समजेना. म्हणूनच शेवटी ते शहरातल्या प्रसिद्ध व महागड्या आहारतज्ञांकडे चित्राला घेऊन गेले.
मी चित्राची फाईल पाहिली. फाईलमध्ये तिच्या रक्ताच्या तपासण्यांचे रिपोर्ट्स होते. त्यात अनेक जीवनसत्त्वे, खनिजे,लोह यांची कमतरता तिच्या रक्तात दिसत होती. त्या फाईलवर मी चौकशी केलेल्या क्लिनिकचेच नाव दिसत होते. निरनिराळ्या व्हिटॅमिन्स, मिनरल्सच्या गोळ्या असलेल्या बाटल्या दिलेल्या होत्या. प्लॅस्टिकच्या डब्यातून नाचणी,बाजरी वगैरेंची कसली कसली पिठे दिसत होती. या सगळ्यांचे तिच्याकडून ऐंशी हजार रुपये घेतले होते.
दिलेल्या प्लॅननुसार तिने ही औषधे घेण्यास सुरुवात केली. जेवणाऐवजी पिठे शिजवून खाऊ लागली. दोन दिवस बरं वाटलं. तिसऱ्या दिवसापासून जुलाब होऊ लागले. आहारतज्ञाला फोन केला. प्लॅननुसार सगळं सुरू ठेवा,असं उत्तर मिळालं. दोन दिवसांनी जुलाबांबरोबरच उलट्याही सुरू झाल्या. पुन्हा आहारतज्ञाला फोन गेला. मॅडम परदेशी गेल्याचं उत्तर मिळालं.
मैत्रीण उलट्या जुलाबांनी अंथरुणाला खिळली. चित्राच्या यजमानांना काय करावं ते समजेना. त्यांना ज्या आत्यांनी लहानाचं मोठं केलं होतं त्या आत्याला गाडी पाठवून गावाकडून घरी आणलं. आत्यांनी वयाची ऐंशी वर्षं पार केलेली असली तरी पन्नाशीच्या चित्रापेक्षा त्या ठणठणीत दिसत होत्या. ऐंशी पावसाळे पाहिलेल्या आत्याबाईंच्या सारं लक्षात आलं….. त्यांनी आल्या दिवसापासून पदर खोचून स्वयंपाकघराचा ताबा घेतला. त्यांनी तिच्यासाठी लोणकढ्या तुपातले मुगाचे,नाचणीचे, डिंकाचे लाडू बनवले. चित्राचा चहा बंद करून टाकला. उठल्याबरोबर कोमट पाणी, लिंबू नि मध तिला प्यायला देत असत. नाष्ट्याला ताजा बनवलेला लाडू नि गरमागरम भाताचे प्रकार.. गरम गरम भाताबरोबर कधी मेतकूट तूप लोणचं ,कधी कुळथाचं पिठलं, कधी लसणाची फोडणी दिलेलं मुगाचं वरण, कधी टोमॅटोचं तर कधी आमसुलाचं सार ! कधीतरी मुगडाळीची खिचडी ,तूप ,पापड नि मुरलेलं लिंबाचं लोणचं…..
दुपारच्या जेवणात गरम गरम पोळी, तूप, कधी बाजरीची तर कधी नाचणीची भाकरी. तिच्यासोबत घरच्या ताज्या लोण्याचा गोळा. पोळी-भाकरीसोबत लिंबू पिळलेली, भरपूर कोथिंबीर घातलेली रोज वेगळी कोशिंबीर, मोड आलेल्या कडधान्याची उसळ, रोज नवीन फळभाजी नि ओल्या खोबऱ्याची, कच्च्या टोमॅटोची ,कांद्याची, दोडक्याच्या किंवा दुधीच्या सालीची खमंग चटणी…..
दुपारी गरम गरम उपमा ,कधी पोह्याचा एखादा प्रकार ,कधी लाह्यापीठ ,कधी थालीपीठ, कधी मिश्र धान्यांचं गरमागरम धिरडं …..
रात्रीच्या जेवणात मात्रं गरम गरम ज्वारीची भाकरी, पालेभाजी नि जवस, खोबरं, कारळे, लसूण यांपैकी एकाची चटणी. दिवसभरात दोन मोसमी फळे तिला खावीच लागत..
आता आत्याबाई हे एकटीला थोडच खाऊ घालणार ?
साऱ्या घराचाच हा डाएट प्लॅन झाला. आणि आत्यांना नाही म्हणण्याची किंवा विरोध करण्याची कुणाची बिशाद नव्हती.
चित्राला तिच्या न कळत कधी बरं वाटू लागलं, ते कळलंच नाही. तिचा अशक्तपणा, निरुत्साह , निराशा सगळं सगळं पळालंच, पण चित्राच्या यजमानांची रक्तातील वाढलेली साखरही पळाली. लेकीचं वाढलेलं वजन पळालं नि तिच्यामागे कॉलेजात मुले लागू लागली..
….. आजारपणाच्या छायेनं वेढलेलं घर हसतं-खेळतं झालं.
बाहेरून पिझा ,बर्गर, वडापाव, तेलकट चायनीज, तुपकट पंजाबी ,बेचव कॉंटिनेंटल मागवणं बंद झालं नि पैशाची कल्पनेपलिकडे बचत होऊ लागली……. पण यासाठी ऐंशी हजार रुपये अक्कलखाती जमा करावे लागले.
भाच्याच्या घरातील पोटं आणि तब्येती मार्गी लावून आत्याबाई आपल्या गावी निघाल्या.. चित्रा नि तिच्या यजमानांनी आत्याला वाकून नमस्कार केला . आत्याबाईंनी डोक्यावर ठेवलेल्या आशीर्वादाचा हात हातात घेतला, नि त्या अन्नपूर्णेच्या हातात नवीन घडवून आणलेले सोन्याचे बिलवर चित्राने घातले.
” अरे पोरांनो, हे एवढे महाग जिन्नस कशासाठी ?” … आत्याबाई चक्रावून बोलल्या..
” आत्या तू तुझ्या अन्नपूर्णेच्या हातांनी जे पौष्टिक अन्न आम्हाला करून वाढलंस त्यामुळे चित्रालाच काय, आम्हा सर्वांना पुनर्जन्म मिळाला. त्या अन्नाची किंमत होऊच शकत नाही. पण ही फूल ना फुलाची पाकळी. “…..
लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले, सोलापूर
संग्राहिका : वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈