सुश्री प्रभा हर्षे
☆ त्या तश्या दोघीही आवडीच्या… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
गुळाची पोळी अन् पुरणाची पोळी…
अन ‘त्या दोघी’ हे मराठी मनाच्या अगदी जिव्हाळ्याचे विषय!
मकर संक्रांतीला मान गुळाच्या पोळीला. वर्षातून एकदा…. पण एकदाच ! त्यामुळे ही जरा ‘एक्सक्लुजीव’ वाटते.
पुरणाच्या पोळीचे मात्र तसं नाही…. गौरी, श्रावणी शुक्रवार, होळी हे खास दिवस आहेतच, परंतू कुळधर्म कुळाचार याही वेळेस पुपो शिवाय पान हलू शकत नाही.
गुळाच्या पोळीचा सोबती एकच…. साजुक तूप.
तर पुरणपोळीची जिवलग दोस्त तुपाची धार…आणि शिवाय इतरही. म्हणजे दूध, नारळाचे दूध, कटाची आमटी.
हे ही तिचे प्रिय सोबती…. अगदी आमरस सुद्धा.
गुळपोळी साखरेची बनवता येत नाही.
पुरणपोळीत साखरेचे पुरणही चालते… असं ऐकलंय. खाल्ली नाहीये मी कधी.
एका बाबतीत मात्र साम्य दोघींमध्ये….गृहिणीची कसोटी लागते त्या बनवतांना…. त्या उत्तमपैकी करायला जमणे हे म्हणजे ‘फेदर इन कॅप’!.. दोन्ही पोळ्यांत व्यवस्थित पुरण असणे, ते पोळीच्या कडेपर्यंत भरलेले असणे, पोळीचे आवरण अधेमधे फाटलेले नसणे, त्यातून पुरण ओघळलेले नसणे, ती तव्यास न चिकटणे ….अश्या बऱ्याच कसोट्यांवर पोळी उतरावी लागते, तेव्हा कोठे ‘सुगरणी’चा किताब प्राप्त होतो !
पुपो तव्यावरची गरम गरम खाण्यात मजा.
तव्यावरून थेट ताटात.
गुळपोळी गरमगरम खायची अट नाही. अन तशी ती खाणेही कठीण.
कारण त्यातला चटका देणारा गुळ.
गुळाचीपोळी कधी शिळीबिळी होत नाही.
पुरणपोळी जरी झाली शिळी तरी ती शिळी झाली की जास्तच छान लागते. खुसखुशीत होते.
आता ‘मोस्ट इंपॅार्टंट’ सवाल!
“गुळपोळी आणिक पुरणपोळी यातील कोण आवडे अधिक तुला?
सांग मला रे सांग मला”
असं कोणी गाऊन मला जर विचारू लागले तर?
अवघड आहे उत्तर देणे.
हं…..पण गुळाची पोळी हे उत्तर द्यावं लागेल.
आज तरी.
तुम्हाला वाटेल, आज संक्रांत म्हणून ‘देखल्या देवा दंडवत’ असणार!
ते एक आहेच.
पण अजुन एक कारण आहे.
पुरणपोळ्या दोन खाल्या, फार फार तर तीन, की पोट कसं भरून जातं.
पुपो अंगावर येते.
गुळाच्या पोळीचे मात्र तसे नाही.
गुळाचीपोळी म्हणजे चोरटे खाणे!
चार पाच सहज पोटात जातात, अन तरीही अंगावर येत नाहीत म्हणून.
लेखिका : अज्ञात
संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈