मनमंजुषेतून
☆ “माडगुळ फाईल्स : – एक वावटळ …. ” लेखक – श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
“आम्हा गरीबांचा संसार जाळून तुम्हाला काय रे मिळणार?”… ३०-३१ जानेवारी १९४८ च्या आसपासचा दिवस….गांधीहत्येनंतरचे उसळलेले जळीत माडगूळकरांच्या गावातल्या वाड्यापर्यंत पोहोचले होते,गदिमांची आई बनुताई मोठया धीराने त्यांना विरोध करत होती,त्यातलाच एक दांडगट “ह्या म्हातारीलाच उचलून आत टाकारे,म्हणजे तरी हीची वटवट बंद होईल !” असे खवळूनच म्हणाला. तितक्यात उमा रामोश्याने म्हातारीचा हात धरून तिला बाजूला ओढले म्हणून ती वाचली,नंतर बाका प्रसंगच उभा राहिला असता.
ढोल ताशे वाजवीत ७०-८० दंगलखोर गावात शिरले होते,तात काठ्या,ऱ्हाडी.. जळते पलीते होते. वात शिरल्या शिरल्या त्यांनी गदिमांच्या धाकट्या भावाचीच चौकशी केली, भेदरलेल्या छोट्या पोरांनी त्यांना थेट आमच्याच घरापाशी आणून सोडले होते. गदिमांच्या धाकट्या भावाला दटावून गावातल्या ठराविक जातीच्या सर्व लोकांची घरे त्याला दाखवायला लावली.एका मागून एक घरातल्या माणसांना बाहेर ओढून घरे पेटवून देण्यात आली. सर्वात शेवटी परत माडगूळकरांच्या वाड्याजवळ आल्यावर गदिमांच्या भावाला स्वतःच्या वाड्यात रॉकेल शिंपडायला लावले व ‘गांधी नेहरू की जय!’ असे ओरडत आमचा वाडा पेटवून दिला. सारे संपले होते आमच्या वाड्याची राख रांगोळी झाली होती. गदिमांचे वडील गावातील मारुतीला साकडे लावून बसले होते,धाकटा भाऊ दिवसभर घाबरून रामोश्याच्या कणगीत लपून बसला होता. महाराष्ट्रातल्या अनेक घरात हीच परिस्थिती होती. शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली होती.
याच वेळी ‘वंदे मातरम’ चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण कोल्हापूरला तर काही पुण्यात पूर्ण झाले होते. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर सर्व चित्रिकरण एकत्र असावे म्हणून दिग्दर्शक राम गबाले चित्रपटाच्या प्रिंट्स घेऊन रात्री कोल्हापुरातून रेल्वेत बसले. त्यांना माहित नव्हते की त्याच दिवशी महात्मा गांधी यांची हत्या झाली आहे व सगळीकडे दंगल सुरु आहे. गदिमा-पुल व सुधीर फडके यांनी साधारण तीन चित्रपटांकरिता एकत्र काम केले होते ते म्हणजे वंदे मातरम, ही वाट पंढरीची /संत चोखामेळा व पुढचे पाऊल. यातील वंदे मातरम हा स्वातंत्र लढ्यावर आधारित चित्रपट यात पु.ल व सुनीता बाईंनी मुख्य भूमिका केल्या होत्या तर दिग्दर्शन राम गबाले यांनी केले होते. गदिमांची गीते, कथा-पटकथा, संवाद तर फडक्यांनी संगीत दिले होते.
राम गबाल्यांच्याकडे चित्रपटाची मूळ प्रिंट एका मोठ्या ट्रंकेत भरलेली होती व रेल्वेत बसल्यावर चित्रपटाचे स्क्रिप्ट काढून ते चाळत बसले होते. तितक्यात ८-१० दंगलखोरांची एक टोळी रेल्वेत शिरली. प्रत्येक डब्यातल्या ठराविक जातीच्या लोकांची चौकशी करून त्यांच्या डोळ्यादेखत सामान रेल्वेच्या बाहेर फेकले जात होते. खूप गंभीर परिस्थिती होती,राम गबाले त्यांच्या तावडीत सापडले असते तर चित्रपटाचे अस्तित्व धोक्यात आले असते. चित्रपटाची प्रिंट व स्क्रिप्ट सर्व नष्ट झाले असते. सर्व कष्ट वाया गेले असते. गबाले स्क्रिप्ट व जीव दोन्ही हातात धरून बसले होते.
गदिमांना एक सवय होती कुठलेही साहित्य कविता, लेख पूर्ण झाला की फावल्या वेळेत ते बऱ्याचदा त्यावर चित्र/रेखाटने करून ठेवत असत. ज्याची अनेकदा दिग्दर्शकाला व अभिनेत्यांना मदत होत असे, असेच एक चित्र गदिमांनी त्या चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या मुखपृष्ठावर काढून ठेवले होते. त्यात चित्रपटाची नायिका झेंडा हातात घेऊन त्यांनी रेखाटली होती.
८-१० जणांचा समूह राम गबाले यांच्यापाशी आला त्यातल्या एकाने त्यांच्या हातातले जाडजूड स्क्रिप्ट पाहिले व विचारले हे काय आहे. गबाले यांनी सांगितले की १९४२ च्या स्वातंत्र संग्रामावर चित्रपट काढत आहोत व त्याचे हे स्क्रिप्ट आहे. त्या माणसाने ते नीट निरखून पहिले.
वर काढलेले गदिमांचे नायिका झेंडा हातात धरलेले छायाचित्र त्यांनी पाहिले व एकदम म्हणाले ” हे बेणं आपल्यातलच दिसतं आहे… चला पुढे… “
गदिमांच्या एका चित्राने तो संपूर्ण चित्रपट गांधीहत्येच्या दंगलीतून वाचविला होता. पुढे हा चित्रपट प्रसिद्ध झाला यातील “वेद मंत्राहून आम्हा वंद्यवंदे मातरम !” सारखी राष्ट्रगीताच्या तोडीची गीते खूप गाजली. एका लेखणीत किती ताकद असते याचे हे उत्कृष्ट उदाहरण!.
या सर्व घटनांनी माडगूळकर कुटुंबीय खूप व्यथित झाले होते. “या गावात राहण्यात काही अर्थ नाही… ” हाच विचार गदिमांच्या व भावंडांच्या मनात ठाम झाला होता. व्यथित माडगूळकर कुटुंबीय गाव सोडणार अशी बातमी गावात पसरली, गावकऱ्यांना या बातमीने अतीव दुःख झाले.गावातल्या जाणत्या लोकांनी गदिमांची भेट घेतली … “अण्णा,आम्ही तुमचा वाडा वाचवू शकलो नाही पण आम्ही तो तुम्हाला परत बांधून देऊ पण गाव सोडू नका … “,अशी अनेक वावटळे येत असतात पण वर्षानुवर्ष जपलेले ऋणानुबंध इतक्या सहज तुटत नाहीत. गावकऱ्यांनी आपला शब्द पाळला … माडगूळकरांचा वाडा त्यांनी परत उभारून दिला!.
आज जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांची धडपड पाहून वाईट वाटते,लहान पणापासून सर्व जातींचे मित्र होते आमचे,जात-पात पाहून कधीच मैत्री केली नव्हती…..पण आज सर्वांच्या डोळ्यात या वावटळीची धूळ शिरली आहे, काहीच स्पष्ट दिसत नाही…. अधून मधून अश्या वावटळी येतच राहतील, आपल्याला मात्र हे माणुसकीच्या शत्रूसंगे चाललेले युद्ध असेच चालू ठेवावे लागेल……..
(ही पोस्ट केवळ गदिमा/वंदे मातरम चित्रपटाच्या आठवणी जागवण्यासाठी आहे,अनेक वर्षांपूर्वी घडून गेले ते सत्य होते,पण यातून आपण केवळ गदिमांच्या आठवणी जागवायच्या आहेत,इतर कुठलाही उद्देश नाही व त्याला कृपया इतर रंग देऊ नये ही विनंती )
लेखक – श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈