डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक अपंग प्रौढ मुलगा…. याला तीन वर्षांपूर्वी व्हीलचेअर देऊन आपण व्यवसाय टाकून दिला होता… सर्व काही छान सुरू होतं , अचानक याच्या गुडघ्याला कलिंगडाएव्हढी गाठ आली… पाच नोव्हेंबर रोजी याचे ऑपरेशन करून पुन्हा याला पूर्ववत केलं आहे…. सायकल कॉलनी, क्वार्टर गेट नंबर चार समोर हा विविध वस्तूंची विक्री करत पुन्हा उठून उभा राहिला आहे. 

याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या….. बऱ्याचदा रडून तो मला सांगत असतो… खूपदा मला वाईट वाटतं…! 

पण मी त्याला सांगून ठेवलंय, ‘ येड्या, अडचणी जिवंत माणसाला येतात…. अंत्ययात्रेसाठी तर लोक स्वतःहून रस्ता रिकामा करून देतात… तेव्हा अडचण आली तर आपण जिवंत असल्याचा जल्लोष करायचा आणि अडचणीवर लाथ मारून पुढे जायचं….!’

मुलांकडून भीक मागून घेतली की भरपूर पैसे मिळतात आणि म्हणून पालक आपल्या मुलांना भीक मागायला लावतात, शाळेत टाकत नाहीत… तरीही त्यांच्यात आणि माझ्यात असलेल्या नात्याचा उपयोग करून घेऊन, आपण साधारण ५२ मुलांना भीकेपासून सोडवलं आहे…. आपण अशा मुलांना शैक्षणिक मदत करत आहोत. (यांचे आईबाप / आजी आजोबा भीक मागतच आहेत, परंतु या मुलांची ओळख करून घेऊन, त्यांच्यातलाच एक मित्र होऊन, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त केले आहे) …. यात अनेक चिल्लीपिल्ली आहेत, दुसरी ते नववी पर्यंत…. 

पण येत्या काही दिवसात हाताशी येतील, अशी माझी पोरं पोरी सुद्धा आहेत….. 

१. ज्याचं संपूर्ण खानदान अजूनही भीक मागत आहे, अशा मुलाला आपण शिकवत आहोत. त्याची यावर्षीची एमपीएससी ची आणि कॉलेजची फी आपण १२ नोव्हेंबर रोजी भरली आहे. येत्या दोन वर्षात तो पीएसआय (इन्स्पेक्टर) होईल, अशी मला आशा आहे.

२. दुसऱ्या माझ्या मुलीचे आई वडील भीकच मागतात, परंतु या मुलीला सीए (चार्टर्ड अकाउंटंट) व्हायचं आहे… तिची बी कॉम थर्ड इयर ची फी आपण दहा नोव्हेंबर रोजी भरली आहे. 

३. ज्याला वडील नाहीत, परंतु आई भीक मागते, असा एक मुलगा, BSC कॉम्प्युटर सायन्स करत आहे, याची या वर्षाची कॉम्प्युटर सायन्स ची फी आपण सहा नोव्हेंबर रोजी भरली आहे. 

४. जिची आजी चिंचवड येथे भीक मागते, अशा एका माझ्या मुलीची अकरावी कॉमर्स ची फी आपण नऊ नोव्हेंबर रोजी भरली आहे. तिला प्रायव्हेट ट्युशन लावून, या प्रायव्हेट ट्युशनची फी सुद्धा भरली आहे….

५. दिवसा भीक मागून, रात्री शरीर विक्री करणाऱ्या, अशा माझ्या एका ताईच्या मुलाची आठवीची फी आपण दिनांक 22 नोव्हेंबर रोजी भरली आहे. 

६.  याच सोबत जिची आई अजूनही भीक मागते… अशा एका मुलीची एमबीए करण्याची इच्छा होती, तिला मागील वर्षी आपण MBA ला ऍडमिशन घेऊन दिलं आहे आणि आता दुसऱ्या वर्षाची फी भरून तिला पुस्तकेही घेऊन दिली आहेत. 

….. येत्या काही वर्षात इन्स्पेक्टर होणाऱ्या माझ्या मुलाला मी “जय हिंद सर” म्हणत, जेव्हा कडक Salute ठोकेन तेव्हा…. 

….. चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या माझ्या मुलीच्या केबिनमध्ये आत जाताना मी, ‘May I come in madam ?’  म्हणेन तेव्हा…. 

….. BSC Computer Science झालेलं माझं कार्ट, माझ्याकडे पाहून, ‘ तुम्हाला कॉम्प्युटर मधलं काय कळतंय ?’ असं मलाच विचारेल तेव्हा…. 

….. Masters in Business Administration (MBA) कम्प्लीट झालेली माझी मुलगी, गळयात पडून, जेव्हा “व्यवहाराच्या” चार गोष्टी मलाच सांगायला लागेल तेव्हा…. 

…… तेव्हा…. हो, तेव्हाच ….. “बाप” म्हणून खऱ्या अर्थाने माझा जन्म होईल !…. बाप म्हणून माझ्या जन्माला येण्याची… त्या दिवसाची मी वाट पाहतोय…. !

ज्या आज्यांना भीक मागायची नाही … काम करायचे आहे … ‘त्या आमास्नी कायतरी काम दे रं बाबा ….’ असं अजीजीने विनवतात…..पण अशा निरक्षर आणि कमरेत वाकलेल्या आज्यांना मी तरी काय काम देणार ? 

आणि म्हणून, माझे आदर्श, आदरणीय श्री गाडगे बाबांच्या प्रेरणेतून, अशा आज्यांबरोबर मी आणि मनीषा हातात खराटा घेऊन पुणे शहरातील कितीतरी अस्वच्छ जागा स्वच्छ करत आहोत…. आणि या बदल्यात मला मिळणाऱ्या डोनेशनमधून अशा आज्यांना पगार देणे सुरू केले आहे. या आज्यांची टीम तयार केली आहे या टीमला नाव दिले आहे “खराटा पलटण” ! 

…. ‘मला, मनीषाला आणि आमच्या खराटा मारणाऱ्या चाळीस आज्यांना, पुणे महानगरपालिकेने, “स्वच्छता अभियान” चे ब्रँड अँबेसिडर केले आहे… हे काहीतरी आक्रीतच म्हणायचं … ! 

— क्रमशः भाग दुसरा 

 © डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments