श्री विश्वास विष्णु देशपांडे
परिचय
श्री विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव
- सेवानिवृत्त मुख्याध्यापक .
- सोशल मीडियावर गेली सहा वर्षे सातत्याने विविध विषयांवर लेखन.
- वर्तमानपत्र, दैनिके इ तून विविध लेख प्रसिद्ध
- औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक आधुनिक केसरी या ई वृत्तपत्रातून अनेक लेख ‘ उगवतीचे रंग ‘ या सदराखाली प्रकाशित
- तरुण भारतच्या ‘ आसमंत ‘ पुरवणीत ‘ थोडं मनातलं ‘ हे साप्ताहिक सदर सुरू.
- आदर्श शिक्षक पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार इ पुरस्कार…
- सहसचिव, म सा परिषद, पुणे शाखा चाळीसगाव
प्रकाशित पुस्तके :
- कवडसे सोनेरी… अंतरीचे
- आकाशझुला
- अष्टदीप (आठ भारतरत्नांची प्रेरणादायी चरित्रे)
- आनंदाच्या गावा जावे. (आनंद, ज्ञान देत सकारात्मक दृष्टिकोन देणारे लेख)
- रंगसोहळा (ललित लेख)
- रामायण : महत्त्व व व्यक्तिविशेष (रामायणातील पात्रे आणि त्यांचा आजच्या संदर्भातील संदेश, रामायणकालीन शिक्षण, समाजरचना इ रसाळ भाषेत सांगणारे पुस्तक)
- महर्षी वाल्मिकी चरित्र (या पुस्तकावर आधारित महर्षी वाल्मिकीच्या जीवनावर एक लघु चित्रपट देखील येणार आहे.)
विशेष :
- नाशिक येथील एफ एम रेडिओ विश्वासावर गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ दर मंगळवारी व शुक्रवारी सकाळी आठ वाजता ‘या सुखांनो या’ हा कार्यक्रम प्रसारित होतोय.
- याच रेडिओवर आनंदघन लता हा कार्यक्रम अकरा महिन्यांपासून सुरू आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत 46 भाग सादर झाले आहेत.
मनमंजुषेतून
☆ माती भिडली आभाळा… भाग-1 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
गारंबीचा बापू ‘ या चित्रपटात शांता शेळके यांचं एक सुरेख आणि अर्थपूर्ण गाणं आहे. ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा…’ रवींद्र साठे यांनी असं काही भावपूर्ण आवाजात गायिलं आहे की मला हे गीत नेहमी गूढ, गंभीर आणि रहस्यमय वाटत आलं आहे. पण त्यातील अर्थ जाणवावा, त्याचा प्रत्यय यावा असाच काहीसा अनुभव परवाच्या दिवशी आला. मी पुण्याहून गावाकडे परत येत असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावर नेवासे फाटा लागतो. अनेकदा येताना जाताना या गावावरून गेलो आहे. पण परवा सहज मनात आलं की हेच ते नेवासा ना जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ? आपण कधी गेलो का तिथे ? मग ठरवलंच की परत जायला कितीही वेळ होवो, आज आपण तिथे जायचंच आणि त्या पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यायचं.
मुख्य रस्त्यापासून आणि नेवासे फाट्यापासून नेवासे गाव साधारणपणे पाच किमी आत आहे. जाताना मध्ये थोडाफार कच्चा रस्ता लागतो. पण माऊलींचं दर्शन घ्यायचं एकदा मनानं घेतलं की रस्ता कच्चा असो की चांगला, सहज पार होतो. गावात शिरता शिरता एकाला विचारलं, ‘ माऊली ? ‘ एवढा एकच शब्द पुरेसा होता. त्याने लगेच मंदिराच्या दिशेकडे बोट दाखवलं. माऊली म्हटलं की झालं. कोण माऊली असा प्रश्न पडत नाही एवढी थोरवी त्या एकाच माऊलीची. मंदिराकडे जाताना सुंदर हिरवीगार शेतं मन आकर्षून घेत होती. माऊलींच्या मंदिरासमोरचा परिसर निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न भासत होता. मंदिरासमोर चिंचा लगडलेली छान चिंचेची झाडं. झाडाखालीच एक माऊली हार आणि प्रसाद विक्रीसाठी घेऊन बसलेली. तिच्याकडून दोन हार आणि प्रसाद घेतला. कमानीतून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराचे आवार प्रशस्त, शांत, स्वच्छ अन प्रसन्न.
थोड्याशा पायऱ्या चढून मंदिरात पोहोचलो तो भव्य सभामंडप दिसला. पाहतो तो त्यात पंचवीस तीस स्त्री पुरुष ज्ञानेश्वरीचं पारायण करतानाचे सूर कानी आले. त्यामुळे मंदिराचं वातावरण आणखीनच प्रसन्न वाटत होतं . ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओव्या कानावर पडत होत्या.
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥
ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।
हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥
‘जे जे उपजते किंवा जन्म घेते ते ते नाश पावते. नाश पावलेले पुन्हा दुसऱ्या रूपाने प्रत्ययास येते. सूर्य आणि चंद्राचा उदय अस्त हे अखंडित सुरूच असतात. त्याचप्रमाणे जन्ममरणाचे हे चक्र अविरत सुरू राहते. तेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आसक्ती मनात धरणे आणि तिच्या नष्ट होण्याने शोक करणे व्यर्थ आहे. ‘ या अर्थाच्या या सुंदर ओव्या कानी पडल्या. ज्या ठिकाणी साक्षात माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्याच ठिकाणी तिचे मनन, पठण किंवा पारायण करणारी ही मंडळी किती भाग्यवान आहेत असा विचार मनात आला.
मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूला प्रथम दर्शन घडते ते शिवलिंगाचे. नंतर ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला ( पैस ) टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो पैसाचा पवित्र खांब. आणि त्याच्या शेजारी असलेल्या भागात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी उतरवून घेतली ते सच्चिदानंदबाबा यांच्या सुंदर मूर्ती आहेत.
पूर्वी ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा या ठिकाणी करवीरेश्वराचे मंदिर होते. तेथील खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली.
शके बाराशे बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे ।
सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥
— अशी ही तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी.
काळाच्या ओघात ते करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले. पण माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, तो खांब मात्र तसाच राहिला. त्या खांबानं जणू आभाळ पेललं. आभाळ पेलण्याइतका तो उंच झाला. माऊलींनी त्याला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर म्हणजे आभाळच. ज्ञानेश्वरी म्हणजे सुद्धा आभाळ. इथला खांब हा पृथ्वीवरल्या मातीचेच प्रतीक. पण ही माती ज्ञानदेवांच्या पावन स्पर्शाने एवढी पुनीत, एवढी विशाल झाली की ती आभाळाला भिडली. म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या.
–क्रमशः भाग पहिला
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈