सौ. उज्ज्वला केळकर
मनमंजुषेतून
☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -1 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
बर्याच दिवसांनी आम्ही सख्ख्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. गप्पांना रंग चढला होता. किती बोलू आणि काय बोलू, असं प्रत्येकीला झालं होतं. बोलता बोलता विषय निघला, ‘आपल्यावर कुठल्या व्यक्तीचा विशेष प्रभाव पडलाय?’
मी एकदम म्हंटलं, ‘मला वाटतं, माझ्यावर माझ्या सासुबाईंचा प्रभाव आहे.’ सगळ्या जणी काहीशा चकित मुद्रेने माझ्याकडे बघू लागल्या. कारण सासू-सुनेचे भावबंध तसे जगजाहीरच. जुन्या बायकांनी तर ओव्या-बिव्यातून ते शीलालेखासारखे शाश्वत केलेले. गाऊन जगजाहीर केलेले. त्यांनी म्हणूनच ठेवलय, ‘माय म्हणता म्हणता ओठालागी ओठ मिळे’ इती वर्षा. ‘आणि सासू म्हणता म्हणता काय ग?’ शुभदाची तत्पर विचारणा. ‘सासू म्हणता म्हणता ओठातून जाई वारे.’ वर्षाचं प्रत्युत्तर.
त्यातून माझ्या सासूबाई जुन्या पिढीतल्या. सोवळ्या. दोन पिढ्यात असावं, तेवढं आमच्यात अंतर. त्यातही त्या श्रद्धाळू. अगदी अंधश्रद्ध म्हणाव्या, इतक्या पराकोटीच्या सश्रद्ध, तर मी आगदी पराकोटीची तर्कवादी. त्यामुळे मैत्रिणींना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. मग मी म्हणाले, ‘सासू’ जर ‘माय’ झाली, तर ओठाला ओठ जुळतीलच ना! आणि ओठाला ओठ जुळल्यावर मायेचे भावबंदही तसेच घट्ट होतील! मग भले तोंडाने ‘माय’ म्हणून हाक थोडीच मारली पाहिजे? माझं लग्नं झालं, तेव्हा हल्लीसारखी सासूला ‘आहो आई’ असं म्हणायची पद्धत नव्हती. पण ही पद्धत मात्र चांगली आहे. त्यामुळे भावनिकदृष्ट्या सासू-सून जास्त जवळ येत असतील, असं वाटतं.
‘मला असं वाटतं, माझे विचार,व्यवहार, वर्तन, दृष्टिकोन यावर माझ्या सासुबाईंचा खूप प्रभाव आहे. माझ्या लेखनावरही आहे, असं म्हंटलं, तर चूक ठरणार नाही. कारण लेखकाला काही लिहिताना व्यक्तींना खूप समजून उमजून घ्यावं लागतं. मग त्या प्रत्यक्षातल्या असोत किंवा मनाने सृजित केलेल्या असोत. व्यक्तीचं अंतरंग जाणून घेण्याची माझ्या सासुबाईंची शक्ती अजोड होती. अंतरंग जाणून त्यातील, ’सत्व ते घ्यावे, फोल टाकोनी द्यावे.’ या वृत्तीने त्या जागल्या, बोलल्या.
माझ्या सासुबाईंचं नाव लक्ष्मी. जुन्या पिढीतील थोर लेखिका लक्ष्मीबाई केळकर यांच्याशी नामसाम्य. माझ्या सासुबाईंनी लेखन केलं असतं, तर ‘माणुसकीचे गहिवर’ सारखं पुस्तक हातून लिहून झालं असतं.
‘ऐसी कळवळ्याची जाती । लाभावीण करी प्रीती।।’ या तुकोबांच्या वचनाचं मूर्त रूप म्हणजे माझ्या सासुबाई. त्यातही त्यांचा ‘प्रीती’ करण्याचा परीघ घरातल्या माणसांपुरता मर्यादित नव्हता. सगळे जवळचे, दूरचे नातेवाईक, परिचयातले, गावातले असा तो व्यापक होता.
माझं लग्न १२ मे १९६५ ला झालं. माझे पुतणे-पुतण्या सासुबाईंना आजी म्हणत. होता होता माझे दीर – जाऊबाई, यजमान सगळेच त्यांना आजी म्हणू लागले. मग मीपण त्यांना आजीच म्हणू लागले. नाही तरी त्यांची नात यमुताई, त्यांच्या मोठ्या मुलीची, अक्काची मुलगी माझ्यापेक्षाच नव्हे, तर यांच्यापेक्षाही मोठी होती. म्हणजे तसा विचार केला, तर आमच्यात दोन पिढ्यांचं अंतर होतं. म्हणजे नात्याने नसेना का, पण वयाच्या अंतराने मी त्यांच्या नातीसारखीच झाले होते आणि त्यांनीही तशीच माया माझ्यावर केली. त्यामुळे या पुढील लेखात मी काही वेळा त्यांचा उल्लेख सासुबाई असा न करता ‘आजी’ असाच केला आहे.
माझं लग्न झालं आणि मी माधवनगरला केळकरांच्या घरात आले, तेव्हा केळकरांचं खातं-पितं घर ‘सुशेगात’ नांदत होतं. पण कधी काळी, अल्पकाळ का होईना, या घराने दारिद्रयाचे चटके सोसले होते. विपत्तीचा अनुभव घेतला होता. सासुबाईंचे यजमान गेल्यावर त्यांना आणि त्यांच्या मुलांना गरिबीत दिवस काढावे लागले होते.
माझ्या सासुबाईंना कुणी वय विचारलं की त्या सांगत , ‘साल तितकं वय’. माझे सासरे १९४१ साली निवर्तले. म्हणजे त्या अवघ्या ४१ वर्षाच्या होत्या तेव्हा. सासर्यांना घरात नाना म्हणत आणि ते गावात नारायणभट म्हणून ओळखले जात. ते गेले, तेव्हा सासुबाईंच्या पदरात तीन मुली आणि दोन मुले होती. मोठ्या मुलीचे म्हणजे आक्कांचे तेवढे लग्न झाले होते. त्यांचीही परिस्थिती म्हणजे ‘एकादशीच्या घरी शिवरात्र’ अशीच. नाना सांगली संस्थानच्या गणपती पंचायतनातील विष्णु मंदिराचे पुजारी होते. त्यांची भिक्षुकी वृत्ती ( व्यवसाय) होता.
नानांचे बिर्हाड सांगलीच्या गावभागातील तात्या केळकरांच्या वाड्यात होते. आता सात माणसांचे कुटुंब आणि आला-गेला सांभाळत असणार्या एखाद्या भिक्षुकाची मिळकत किती असणार? त्यात शिल्लक किती उरणार? आक्कांच्या पाठचे दादा. ते तेव्हा दहावीत शिकत होते. त्यानंतर सुशीला, कुसुम, उषा या बहिणी, नंतर माझे यजमान अनंत. त्यांना सगळे बाळू म्हणत. ते अवघे तीन वर्षाचे होते तेव्हा. आता पुढे काय? हा प्रश्न स्वाभाविकपणे पुढे आला. ‘ आता गंगाधराने (दादांनी) शिक्षण सोडून भिक्षुकी करावी, असेच अनेकांचे म्हणणे पडले. माझ्या सासुबाईंनी मात्र, ‘मुलाला भिक्षुक करायचे नाही. सध्या या व्यवसायाला मान-प्रतिष्ठा राहिली नाही,’ असे ठामपणे सांगितले. तरीही १० वी आणि ११वी अशी दोन वर्षे शिकत असताना दादांनी दोन देवळातली पूजा केली. देवळातला प्रसाद म्हणून दोन ताटातून भरपूर जेवण घरी यायचे. घरच्यांची एक वेळच्या का होईना, पण जेवणाची सोय व्हायची. नानांनी थोडी जमीन घेतली होती आणि ती खंडाने दिली होती. खंडाचा धान्य घरी यायचं. त्यावेळच्या रीतीप्रमाणे सासुबाईंचं केशवपन झालं. त्याबद्दल मी पुढे केव्हा तरी दादांना विचारलं, ‘तुम्ही कसं होऊ दिलत केशवपन?’ त्यावर दादा म्हणाले, ‘ तो आजींचा स्वत:चा निर्णय होता.’ कदाचित त्यांच्यावर झालेले संस्कार, तो काळ, गावातलं वातावरण, सासरे करत असलेला व्यवसाय याचा तो एकत्रित परिणाम असेल.
‘कसं चाललं होतं तुमचं तेव्हा?’ मी एकदा आमच्या कुसुमवन्संना विचारलं होतं. ‘अपरंपार कष्ट आणि अपार काटकसर या दोन चाकांवर आमचा गाडा तेव्हा चालत होता.’ त्या म्हणाल्या.
त्यावेळी कुसुमताई दहा वर्षाच्या होत्या. सुशीताई बारा वर्षाच्या असतील. कुसुमवन्स पुढे म्हणाल्या होत्या, ‘शेजार्या-पाजार्यांच्या रेशनचं धान्य आम्ही आणून देत असू. त्यांच्या रेशनवरची बाजारी आम्ही घेत असू. आमच्या रेशनवरची बाजरीही आम्ही घेत असू. बाजरी उष्ण. त्यामुळे घरात आम्ही कुणी ती खात नसू. आमचे चुलत भाऊ गणुदादा यांना आम्ही ती देत असू. त्या बाजरीवर ते रुपयाला दहा आणे कमिशन देत असत. इतरांचं शिवण शिवून शिलाईचे पैसेही आम्ही मिळवत असू. प्रत्येक फ्रॉकला चार आणे शिलाई मिळायची. संध्याकाळी बाजार उठायच्या वेळी आई बाजारात जाई. खंडून भाजी आणे. त्याचे वाटे घालत असू. शेजारी-पाजारी विकत देत असू. त्यातच आमची भाजी सुटायची. त्या काही वर्षात आम्ही तांदूळ घरात आणलाच नाही. रेशनवर कण्यांचं पोतं मिळे. कण्यांचाच भात घरात होई.’
क्रमशः …
© सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈