सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -3 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पहिले, मुली आणि सुना यात त्यांनी कधी फरक केला नाही. मुलीही माहेरी आल्या आणि हात-पाय पसरून गप्पा मारत बसल्या असं कधी झालं नाही. आजी म्हणत, ‘कामावे ते सामावे.’ आता इथून पुढे)

आजी नि नातवंडे यांचे भावबंध मायेने थबथबलेले, सायीसारखे स्निग्ध, साखरेसारखे गोड, हे तर शाश्वत सत्य. माझ्या सासुबाईंचेही आपल्या नातवंडांवर- पतवंडांवर खूप प्रेम होते. त्यांना पतवंडेही होती. चांगली मोठी, जाणती होती. ही पतवंडे म्हणजे माझ्या पुतणीची, दादांची मुलगी माधुरी हिची दोन मुले. ती त्यांना पणजीबाईच म्हणत. खेळताना मुले पडली की त्या म्हणत, ‘पडो, झडो माल वाढो.’  आमच्या सुशीताईंची मुलगी सुनंदा भारी हळवी, म्हणून आजींचे तिच्या भावांना सांगणे असे, ‘उगीच तिला चिडवू नका. ती हरीण काळजाची आहे.’ त्यांच्या बोलण्यात अशा म्हणी, वाक्प्रचार नेहमी असायचे.

आजींना नातवंडांचं कौतुक होतंच. नातवंडांनाही या आपल्या आजीचं तितकंच अप्रूप होतं. नातवंडांना आजीचं कोणतं रूप भावलं? यमुताई ही त्यांची पहिली नात. धाकट्या मुलाच्या बरोबरीची. मोठी मुलगी आक्का, हिची मोठी मुलगी. तिचं आमच्याकडे येणं आणि रहाणं सर्व नातवंडात जास्त झालेलं. तिला आजीच्या गृहव्यवस्थापनातले कायदे आठवतात.  सकाळी उठल्यावर प्रत्येकाने पाच घागरी पाणी ओढायचे. त्यावेळी सगळंच काम घरात असे. स्वयंपाक चुलीवर. जेवणं झालं की प्रत्येकाने आपापलं ताट, वाटी, भांडं याबरोबरच चुलीवरचं एक जळकं भांडं घासायचं. पुरुषांनीसुद्धा. शिळं काही उरलेलं असेल, तर सगळ्यांनी वाटून खायचं. पुरूषांना तेवढं ताजं आणि बायकांना शिळं, असा भेदभाव नव्हता. शिळं टाकायचं नाही, हे मात्र नक्की होतं. ‘अन्न हे पूर्णब्रम्ह.‘ त्या म्हणायच्या. आजीच्या व्यवस्थापनाबद्दल तिची धाकटी बहीण कमल सांगते, ‘ सुट्टी असली की आम्ही माधवनगरला जायचो. सांगलीहून माधवनगर फक्त दोन –तीन मैलांवर. त्या काळात शेंगा फोडून शेंगदाणे वापरायची पद्धत होती. मग आजी मुलांपुढे शेंगांची रास ओतायची आणि म्हणायची भांडंभर दाणे काढले की मी एक रुपया देईन. मग जत्रेतून काय हवं ते तुम्ही घ्या. जो जास्त दाणे काढेल, त्याला जास्त पैसे. ‘ दाणे काढल्यावर पैसे मिळणार, म्हटल्यावर आम्ही इरीशिरीनं दाणे काढायचो. मुलांना जत्रेसाठी पैसे मिळायचे. आजीचे काम व्हायचे.’  त्या काळात धुणं- भांडी याव्यतिरिक्त सगळी कामे घरात असत. शेंगदाणे नव्हे, वर्षाची शेंगांची पोती घेतली जात. त्या काळात माधवनगरला विठोबाची, हरीपूरला शंकराची जत्रा भरे. आजी हौसेने नातवंडांना घेऊन जत्रेला जात. टांग्याने हरिपूरला जाण्याचेही आकर्षण असे. मीदेखील तीन-चार वेळा त्यांच्याबरोबर जत्रेला गेले होते.

माझ्या लग्नाच्या वेळी घरी संपन्नता आली होती, पण सासूबाई कधी आपले जुने दिवस विसरल्या नाहीत आणि गरजावंताला मदत केल्याशिवाय कधी राहिल्या नाहीत. त्या काळात आणि एकूणच आयुष्यात ‘जिथे कमी, तिथे मी’ या वृत्तीने त्या जगल्या आणि हाच वसा त्यांनी आपल्या मुली – सुनांनाही दिला. नातेवाईकांमध्ये कुणाची अडचण आहे असं कळलं की त्या निघाल्याच आपली पिशवी घेऊन त्यांच्या मदतीला. गावात कुणाला गरज असेल, तर त्या धावायच्या. गरजवंताची गरज भागवणे, हीच त्यांची दान-धर्माची कल्पना होती. कुणासाठी काही केलं, मग ते नातेवाईक असोत वा परिचित वा आणि कुणी, ते बोलून दाखवायचा त्यांचा स्वभाव नव्हता.

माझ्या जाऊबाईंची बाळंतपणे सांगलीत झाली. डॉक्टर सहजपणे उपलब्ध होणं, हे त्याचं कारण. माझ्या जाऊबाईंची म्हणजे आमच्या वहिनींची माहेरची स्थिती त्या काळात हलाखीची होती. वडील गेलेले. चार भावंडे शिकणारी. आजींना परिस्थितीची कल्पना होती. त्या नातवंडांना बघायला गेल्या की सुनेच्या हातात पैसे ठेवून येत. त्यातही विहीणबाई जवळ नाहीत, असं बघून त्या पैसे देत. त्यांच्या सन्मानाला ठेच लागू न देता मदत करायची, असं धोरण. मला दहा वर्षांनी मुलगा झाला म्हणून त्याचं नाव अमोल ठेवलं. त्या काळात माझं माहेरी करण्यासारखं कुणीच नसल्यामुळे माझं बाळंतपण सासरीच झालं. माझ्या मुलाची मुंज आम्ही त्यांच्यासाठी आठव्या वर्षी केली. मुंज झाल्यावर त्या म्हणाल्या, ‘आता मी मरायला मोकळी झाले.’ अर्थात त्यानंतर, त्या नऊ वर्षे जगल्या. वयाच्या ९२ वर्षापर्यंत त्या जगल्या. शेवटची दोन वर्षे त्यांना भ्रम झाला होता. सारखं पोटात दुखतय म्हणायच्या. औषध म्हणून श्रीखंडाची गोळीही दिलेली चालायची. अगदी आजारी, हांतरूणावर पडून अशा त्या फक्त चार-सहा महिनेच होत्या. बाकी त्यांनी आपलं जीवन आनंदात, सुखा – समाधानात, तृप्तीत, इतरांच्या आनंदात आनंद  मानत घालवलं.

आमच्या वहिनींच्या मावशी माधवनगरलाच रहात. त्यांच्या यजमानांना फारसं बरं नसे. त्या स्वत: फारशा शिकलेल्या नव्हत्या. शाळेत जाणार्‍या चार मुली आणि एक मुलगा. घराची शेती भाऊबंदांच्या वादात. त्यांना आजींनी मसाले, पापड, शेवया, तिखट , पुरणपोळ्या इ. करून विकायचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, ‘लोक काय म्हणतील, याचा विचार करू नकोस. लोक जेवायला घालणार आहेत का?’ मावशींचे पहिले ग्राहक आम्ही असू. आजी म्हणायच्या, ‘आपले चार पैसे जास्त गेले, तरी चालतील, पण ती आणि तिच्या घराचे अन्नाला लागले पाहिजेत. आजी त्यांना पोथी वाचून दाखवायला सांगत. त्यासाठी त्यांना पैसे देत. आजींचं हे रूप माझ्या डोळ्यापुढचं. इचलकरंजीला माझ्या दोन नंबरच्या वन्स सुशीताई रहात. त्यांच्यासमोर सौंदत्तीकर म्हणून जावा-जावा रहात. त्यांच्यापैकी धाकटीची स्थिती फारच हलाखीची होती. आजी एकदा त्यांना म्हणाल्या, ‘तुझ्या हातात कला आहे. लोकांचं शिवणकाम, भरतकाम करून दे. हलव्याचे दागिने कर आणि वीक. चार पैसे मिळतील. संसारात ते उपयोगी पडतील.’ त्यांनीही आजींचा सल्ला मानला. चार पैसे मिळू लागले. संसाराला मदत झाली.

सल्ले केवळ दुसर्‍यांनाच असत असं नाही. आम्हालाही असत. संक्रांतीच्या वेळी बायकांना हळदी-कुंकवाला बोलावून काही ना काही लुटायची पद्धत होती. त्या म्हणत,  ‘रुपया – दोन रुपयाची वस्तू तुम्ही लुटणार. त्याचा घेणाराला फार काही फायदा असतो, असं नाही. त्यापेक्षा यासाठी जेवढे पैसे तुम्ही खर्च करणार, तेवढ्या पैशाची एखादी वस्तू, एखाद्या गरजावंताला द्या. साडी म्हणा, एखादा मोठं भांडं म्हणा, चादर वगैर म्हणा, किंवा आणखी काही…. तिला गरज असेल ते.’ गरजू स्त्री ब्राह्मणाचीच असावी, असा त्यांचा हट्ट नसे. दान-धर्म, त्यातून मिळणारं पुण्य यावर त्यांचा विश्वास होता, पण दान-धर्माच्या त्यांच्या कल्पना मात्र आधुनिक होत्या.

शिक्षणाचं महत्व त्यांना होतंच. लग्न झालं, तेव्हा मी फक्त पदवीधर होते. लग्नानंतर बी. एड., एम. ए., एम. एड. हे सारं शिक्षण आजींच्या मान्यतेनं आणि प्रोत्साहनानं झालं. घरचा राबता मोठा. मला नोकरी. त्यातही एम. ए., करायचं ठरवलं. याला होकार देताना आजींनी आणखी एक गोष्ट व्यवहाराच्या दृष्टीने केली. ‘तुझी नोकरी आणि अभ्यास, त्यामुळे तिच्यावर ( माझ्या जाऊबाईंवर ) कामाचा जास्त बोजा नको. तुम्ही वेगळे रहा. मी माझ्या डोळ्यांदेखत तुम्हाला घर मांडून देते. वेगळे रहा. गोडीत रहा. गरजेप्रमाणे एकमेकींना मदत करा.’ या व्यवस्थेमुळे, मला माझ्या सोयीप्रमाणे काम करता आलं आणि अभ्यासाठी वेळ काढता आला. आम्ही दोघांनीही त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागायचा, आमच्याकडून शेवटपर्यंत प्रयत्न केला. आता आजीही नाहीत आणि त्यांचा वसा चालवणार्‍या जाऊबाईही नाहीत. मात्र त्यांनी आणि मी आजींचा वसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न आमच्या परीने केला आहे.

क्रमश: – भाग ३

©  सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments