श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “मला भावलेलं इंग्लंड” ☆ श्री मोहन निमोणकर ☆

मागच्या वर्षी मी आणि बायको संजीवनीची इंग्लंडला जायची तिसरी वेळ होती. मुलगा आशिष फिजिओथेरपीमध्ये एम.एस. करून तिथं नोकरी करतोय, तर सून निवेदिताही तिथंच वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करते. दोघांनी तिथं नवीन संसार सुरु केल्यानं त्यांचं कौतुक करायला आणि चिरंजीव अभिनवला भेटायला आम्ही इंग्लंड गाठलं.

इंग्लंडमध्ये भौगोलिकदृष्ट्या पाहण्यासाठी ब-याच गोष्टी आहेत. पण यंदा आम्हाला तिथल्या सामाजिक आणि सार्वजनिक गोष्टी खूपच भावल्या. किंबहुना याच तिथलं वेगळेपण सिध्द करायला पुरेशा ठरल्या. एखाद्या देशाची ठरलेली जीवनशैली आणि स्वभाव असतो, यामध्ये इंग्लंड खरंच चारचौघांपेक्षा भिन्न ठरतो.

इंग्लंडमध्ये ढोबळमानानं चार ऋतू आहेत. समर, ऑटम, विंटर आणि स्प्रिंग. समरमध्ये पहाटे पाच वाजताच उजाडतं आणि रात्री १० वाजता अंधार पडतो. ऑटम, विंटर आणि स्प्रिंगमध्ये उशीरा उजाडतं आणि अंधारही लवकर म्हणजे दुपारी चार वाजताच पडतो. विंटरमध्ये तापमान सर्वात जास्त म्हणजे पाच ते सहा अंश तसंच कमी म्हणजे उणे असतं. इंग्लंड उत्तरध्रुवाजवळ असल्यानं तिथं खूप थंडी असते. समरमध्ये मात्र तापमान १८ अंश झालं, तरी लोकांना उष्णतेची लाट आल्यासारखं वाटतं. आम्हाला इथं एक गोष्ट नवीन वाटली. ती म्हणजे, दिवस लवकर वा उशीरा उजाडण्याचा, मावळण्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून वर्षातून दोनदा घड्याळ ऍडजस्ट केलं जातं. मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारी घड्याळ एक तास मागं करतात. सार्वजनिक बागांमध्येही बागा उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा उजेडानुसार बदलतात. तशा प्रत्येक महिन्याच्या वेळांचा बोर्ड आगाऊच लावलेला असतो. वर्षभरात पाऊस कधीही येतो; परंतु वेगळा असा पावसाळा हा ऋतू इथं नाही.

इंग्लंडची वाहतूक व्यवस्था जगातील उत्तम व्यवस्था म्हणावी लागेल. महाग आहे; पण अतिशय उत्तम. रेल्वेचं नेटवर्क हे खाजगी कंपन्यांकडे सोपवलंय. त्या कंपन्या म्हणजे सदर्न रेल, साउथ इस्टर्न रेल्वे, नॉर्दन रेल, ग्रेट वेस्टर्न रेल्वे आणि व्हर्जिन रेल्वे. या पाच खाजगी कंपन्या सर्व युकेचा रेल्वेचा प्रवास सांभाळतात. रेल्वे डब्यांची स्थिती अतिशय उत्तम. दारं आपोआप उघड-बंद होतात. त्यामुळे पळत येऊन गाडीला लटकत गाडी पकडणं हा प्रकार नवीन नाही. याव्यतिरिक्त लंडन ट्यूब रेल्वेही म्हणजे ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ इतर कंपन्यांचा भार हलका करते. ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ ही खाजगी कंपनी इंग्लंडमधील बसवाहतूक सांभाळते. बसमध्ये लहान मुलांच्या बाबा गाड्यांनाही प्रवेश प्राधान्यानं असतो. चढण्या-उतरण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, शिवाय उतरण्याचा आपला स्टॉप येण्यापूर्वी आपल्या सीटजवळील बटण दाबलं, की ड्रायव्हरला मेसेज जातो आणि तो बस स्टॉपवर थांबवतो. ड्रायव्हरच तिकिटं पाहतो आणि काढतोही.

रेल्वे आणि बसच्या तिकिटांचे दर हे वेळेनुसार (गर्दीच्या) कमी-जास्त असतात. तसंच, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी कमी असतात. एखादी ट्रेन रद्द झाली आणि रात्रीनंतर ट्रेन नसेल, तर पर्यायी व्यवस्था स्टेशनबाहेर केलेली असते. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत वा-यावर सोडलं जात नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये पादचा-यांना फार महत्त्व दिलं आहे. रस्ता क्रॉस करण्यासाठी ‘सेल्फ ऑपरेटेड सिग्नल्स’ आहेत. या गोष्टी आम्हाला खूपच भावल्या. एखाद्याला कार रिव्हर्स घ्यायची असेल आणि तो रस्ता कितीही वाहता असेल, तरी त्याचं रिव्हर्स घेणं पूर्ण होईपर्यंत सर्व गाड्या थांबतात आणि कुणीही हॉर्न वाजवत नाहीत, हे विशेष. रस्ते आपल्याएवढेच, तरीही लहान-मोठी वाहनं बिनबोभाट जा-ये करत होती. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कठीण अशा परीक्षेला सामोरं जावं लागतं. पहिल्या फटक्यात लायसन्स मिळणारा अगदी विरळाच.

आपल्या घराबाहेर रस्त्यावर गाडी पार्क करायलाही वर्षाला ४० पौंड द्यावे लागतात. ठिकठिकाणी पार्किंगच्या सोयी केल्या आहेत. गर्दीच्या वेळी पैसे आणि एरवी फुकट! वीज आणि गॅस वापरण्यासाठी बिलिंगची पध्दत नाही, तर एक प्रीपेड कार्ड असतं आणि त्यात जेवढा टॉप अप तुम्ही केला असेल तेवढीच वीज आणि गॅस तुम्हाला वापरता येतो. केंटमधल्या ग्रेव्हज् एंड इथं आमचं वास्तव्य होतं. लंडनपासून रेल्वेनं एक ते दीड तासाच्या अंतरावर दक्षिणेला हे ठिकाण आहे. त्या शहरात कचरा संकलनाची अतिशय उत्तम सोय आहे. प्रत्येक भागासाठी आठवड्यातून एक ठराविक वार कचरा संकलनासाठी ठरवलेला असतो. दोन मोठ्या पेट्या त्यासाठी कौन्सिलतर्फे पुरवल्या जातात. एकात रिसायकल होणारा आणि दुस-यात रिसायकल न होणारा असं एकआड एक दर आठवड्यानं असं कचरा संकलन केलं जातं. रिसायकल होणा-या गोष्टींची आणि न होणा-या गोष्टींची यादी कौन्सिलतर्फे वेळोवेळी प्रसिध्द केली जाते.

इथं दैनंदिन जीवनातल्या ब-याच गोष्टी स्वत:च्या स्वत:ला कराव्या लागतात. नोकर-चाकर, मोलकरीण कुणी ठेवत नाहीत. कुणी ठेवलीच, तर त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्यामुळे भांडी घासणं, घराला रंग देणं, सायकलचं पंक्चर काढणं, सायकल आणि कारमध्ये हवा भरणं इत्यादी गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. एवढंच काय, तर पेट्रोल पंपावर पेट्रोलही आपल्यालाच भरायला लागतं. नंतर बिल दुकानात नेऊन द्यायचं. आशिषनं कार खरेदी केल्यावर दुस-याच दिवशी तो आणि निवेदिता पंपावर जाऊन पेट्रोल कसं भरायचं हे शिकून आले होते. घरात पाहुणे आल्यावर, आपल्याला जेवणानंतर भांडी घासताना पाहून तेही पहिल्या दिवसानंतर आपल्याला आपोआप मदत करू  लागतात.

इंग्लंडमधील अशा ब-याच गोष्टी आपल्याला भावतात. त्यांचं अप्रुप आपल्याला वाटतं. तरीही अखेर आपलं आपल्या मातीशी असलेलं घट्ट नातंच वरचढ ठरतं. तीन महिन्यातच आपल्याला मायदेशातील घराची आठवण येते आणि सहा महिने काढायचे असले, तरी काऊंटडाऊन तेव्हाच सुरु होतं, परतण्यासाठी ..…

         

 ©️ श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments