सौ. उज्ज्वला केळकर
मनमंजुषेतून
☆ शिवरात्र आणि ऊसाचा रस – सुश्री विनीता क्षीरसागर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
पूर्वी शिवरात्र आणि उसाचा रस हे जणू समीकरणच ठरलेले होते. म्हणून लहानपणी आम्ही अगदी वाट बघत बसायचो, शिवरात्रीची….!
पूर्वी उपवासाचे पदार्थ अगदी पोटभर असे मोठी एकादशी, शिवरात्र, अशा मोठ्या उपवासालाच मिळायचे………….! नाहीतर एरवी मोठ्या माणसांना फराळासाठी केले की एकेक घास हातावर मिळायचा…….! आता कसे आपण एरवी सुध्दा साबुदाणा खिचडी करतो..! किंवा बाहेर हॉटेलमध्येसुध्दा खिचडी, साबुदाणा वडे इ… सगळे काही मिळते……! पूर्वी अगदी आई, आजी राजगिऱ्याच्या लाह्या सुध्दा घरी फोडायच्या……!
शिवरात्रीला आजीबरोबर सगळ्यांनी रामेश्वर मंदिरात जायचे….. आल्यावर साबुदाण्याची खिचडी, बटाटा भाजी, कवठाची पाट्यावर वाटलेली चटणी, घरी केलेल्या तळलेल्या पापड्या, खाडिलकरांकडून विकत आणलेले ताक, रताळयाचे गुळाच्या पाकातले काप ह्यावर अगदी पंगत मांडून यथेच्छ ताव मारायचा एवढेच होते…!
नंतर दुपारी सगळी मोठी मंडळी डाराडूर पंढरपूर म्हणून झोपून जायची………..! घरातली लहान मुले मात्र केव्हांच एकदाचे साडे चार वाजून जातायत ह्याची वाट बघत घड्याळ बघत बसायची……! कारण दुपारी पाच वाजून गेले की घरी उसाचा रस आणायचाच हे शिवरात्रीला ठरले असायचे…..! तोही एक कार्यक्रम च असायचा….! स्टीलची एखादी मोठी लोटी घेऊन गुऱ्हाळात जायचे, जाताना बर्फासाठी एखादा मोठा कापडी रूमाल किंवा पिशवी घेऊन जायची……! त्या वेळी आमच्या घराच्या जवळ म्हणजे धर्म चैतन्याच्या कोपर्यावर एक गुऱ्हाळ सुरू झालेले असायचे. तट्टे ठोकून केलेल्या भिंतभर रंगीबेरंगी कॅलेंडर्स, देवांची चित्रे लावलेल्या त्या गुऱ्हाळात जायला खूप छान वाटायचे……..! आई त्याला गेल्या बरोबर “ताजा काढून देरे बाबा रस” म्हणून बजावायची….. तसेच न विसरता त्यात आले लिंबू टाकायला सांगायची……….! त्याचा रस चक्रातून काढणे……., भुश्श्यातला तरटात गुंडाळलेला बर्फ फोडणे हे जवळून बघायला खूप मजा वाटायची…..! त्या वेळी फ्रीज नव्हते म्हणून बर्फ बाहेरून च विकत घ्यावा लागे……………! गुऱ्हाळात सुध्दा बर्फाचे वेगळे पैसे द्यावे लागत……! … असे सगळे करून एकदाचा रस घरी यायचा……….! घरातले चहाचे कप रसासाठी सज्ज असायचे….! बर्फ पाण्याने स्वच्छ धुवून फोडून झाला की रसाचे कप भरून सगळयांना रसाचा वाटप व्हायचा……!..
….. रस पिऊन मन तृप्त व्हायचे व आता खरी शिवरात्र साजरी झाली असे वाटायचे………! दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर “काल आमच्या कडे उसाचा रस आणला होता.” हे न चुकता सांगण्यात एक धन्यता वाटायची…………! कारण पूर्वी उसाचा रस पिणे ही सुध्दा एक चैनच वाटायची……..! बैलाच्या चरकावरचा रस पिण्यासाठी आम्ही सगळे… घरातले लोक लक्ष्मी रोड जवळच्या इलेक्ट्रिक आॉफीसजवळच्या गुऱ्हाळात जायचो…….! ते सुध्दा सगळ्यांच्या वार्षिक परीक्षा झाल्यावर बरं का………!
लेखिका : सुश्री विनीता क्षीरसागर
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170 ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈