डाॅ. शुभा गोखले
अल्प परिचय
शालेय शिक्षण: मराठी माध्यमातून हुजूरपागा, पुणे
M.Sc. आणि Ph.D. (Physics), पुणे विद्यापीठ
LLM (Intellectual Property Rights -IPR), Turin University, Italy
इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालयात भौतिकशास्त्र प्राध्यापिका
छंद: निसर्ग निरीक्षण, शास्त्रीय संगीत श्रवण, मराठी-इंग्रजी ललित वाचन, फोटोग्राफी, Facebook blogger
मनमंजुषेतून
☆ सापेक्ष दृष्टीकोन… ☆ डाॅ. शुभा गोखले ☆
एखादी मुलगी आणि मुलगा यांना टाळ्या देत हसतखेळत भेळ खाताना पाहून बहुतेक कपाळांवर ‘ काय हा थिल्लरपणा ‘ – असं म्हणणाऱ्या आठ्या उमटतात. पण त्याचवेळेला एका कोपऱ्यात उभे असलेले त्यांचे आई-बाबा, नुकतीच दृष्टी मिळालेल्या आपल्या धाकट्या बहिणीला भेळ खायला घालत, समोरच्या समुद्रात वेगाने जाणाऱ्या मोटर-बोटी दाखवणाऱ्या आणि एकमेकांना टाळ्या देऊन एन्जॉय करणाऱ्या दादाचं कौतुकच करत असतात…. म्हणजेच पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर सगळं अवलंबून असतं!
तसंच काहीसं गेले काही आठवडे WA/FB व इतर माध्यमांतून आपल्यावर भडिमार होणाऱ्या गुरू-शुक्र युतीचं ! ……. सूर्यापासून ७८ कोटी किलोमीटर वरचा गुरू हा आकारानी सगळ्यात मोठा असलेला भाऊ, तर ११ कोटी किलोमीटर वर असणारा शुक्र … हे दोघेही आपापल्या कक्षांमधून आपापल्या वेगाने सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतात ! गुरूला एका परिक्रमेला साधारण ११. ८ वर्षं, तर शुक्राला केवळ २२५ दिवस लागतात…. असे परस्परांशी फारसा संबंध नसलेले ग्रह आपला क्रम आक्रमित असताना, त्या दोघांनाही कल्पनाही नाहीये, की सूर्यापासून १५ कोटी किलोमीटर वर असलेल्या आपल्या पृथ्वी नावाच्या बहिणीवर वास्तव्य करणारे माणूस नावाचे प्राणीमात्र त्यांच्याकडे दुर्बिणी रोखून बसले आहेत !
कारण काय …
… तर पृथ्वीवरून या दोघांच्या आपापल्या कक्षांमधल्या आजच्या स्थिती अशा रीतीने एका सरळ रेषेत आल्यात की वाटतंय, ते एकमेकांच्या खूप जवळ आलेत. यालाच विज्ञानात ‘ युती ‘ असे म्हणतात. ही स्थिती फक्त पृथ्वीच्या आजच्या सापेक्ष स्थानामुळे दिसतेय. अवकाशातल्या इतर कुठल्याही बिंदूवरून ते दोघे अगदी सुट्टे-सुट्टे दिसतील.
म्हणूनच म्हटलं दृष्टीचा-कोन महत्वाचा ! …. पटतंय का?
(फोटो सौजन्य : डॉ. गौरी दळवी, फ्लोरिडा. )
© डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈