श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

(धावायचे आणि आपल्याला लक्ष असलेले अंतर धाऊन पुरे करून अंतिम रेषा गाठणे हेच खरे असते. … आता पुढे)

त्याचदिवशी आमच्या गिरगावातल्या ठाकूरद्वार नाक्यावरचे  इराणी हॉटेल ” सनशाईन ” चा शेवटचा दिवस होता. त्यानंतर ते हॉटेल कायमचे बंद होणार होते. आमच्या लहानपणीच्या कडक ब्रून मस्का पाव आणि मावा सामोसाच्या आठवणी त्या हॉटेलशी निगडित होत्या त्यामुळे माझ्या मित्रांबरोबर मॅरेथॉन मेडल मिळाल्याचे सेलिब्रेशन हे ठाकूरद्वारच्या सनशाइन इराण्याकडेच झाले.

४८ व्या मेडल साठी  १० डिसेंबर २०२२ अभिजित भोसले, निखिल पोवार आणि मी असे आम्ही तिघे जण गोव्याला गेलो. ज्या ठिकाणी मी माझे पहिले मॅरेथॉन मेडल कमविले होते तेथे मधली कोरोनाची २ वर्षे सोडली तर दरवर्षी मी धावायला जात आलो आहे. अभिजित आणि निखिल पोवार  ह्यांनी १० कि मी मध्ये भाग घेतला होता तर. मी २१ कि मी मॅरेथॉन धावलो. गोव्याचा धावण्याचा मार्ग हा चढ उताराचा असल्याने आणि तेथील हवेतली आद्रता जास्त असल्याने, तेथे धावताना चांगली वेळ देणं खूप कठीण असते तरीही मी ती  मॅरेथॉन २ तास ५२ मिनिटात धाऊन पुरी करून माझे ४८ वे मॅरेथॉन मेडल मिळविले.

आता पुढची मॅरेथॉन १५ जानेवारी २०२३ ला होती ती, आपल्या भारतातली १ नंबरची मॅरेथॉन म्हणजेच टाटा मुंबई मॅरेथॉन. त्या मॅरेथॉनसाठी धावायला खूप जण उत्सुक असतात पण सगळ्यांनाच धावायला मिळतेच असे नसते. त्याचे रजिस्ट्रेशन खूप आधी करायला लागते. ह्या नावाजलेल्या मॅरेथॉनसाठी ह्यावर्षी जवळ जवळ ५५००० जणांनी भाग घेतला होता. ह्या मॅरेथॉन मार्गात एक केम्प्स कॉर्नरचा ब्रिज काय तो चढ लागतो बाकी सरळ रस्ता, समुद्र किनारा, वांद्रे सी लिंक आणि हवेतील गारठा ह्यामुळे ह्या मॅरेथॉनला धावायला खूप मजा येते. धावण्याच्या मार्गात आम्हा रनर्सना चिअर अप करायला दुतर्फा खूप माणसे उभी असतात त्यामुळे धावायला जोर ही येतो. ह्यावर्षी वातावरणात अती थंडावा असल्याने आम्हां सगळ्या रनर्सना ह्या मॅरेथॉनचा चांगल्या तऱ्हेने आनंद घेता आला त्यामुळे हे माझे २१ कि मी धाऊन ४९ वे मॅरेथॉन मेडल मी २ तास ३२ मिनटात मिळविले. तेथेच गिरगांव  चौपाटीच्या आयडियल हॉटेल मध्ये नेहमी प्रमाणेच माझ्या काही गिरगावातल्या मित्रांबरोबर सेलिब्रेशन करून माझ्या ५० व्या मॅरेथॉन मेडल साठी सगळ्या मित्रांच्या शुभेच्छा घेतल्या.

आता वेध लागले ते माझ्या ५० व्या मॅरेथॉनचे. १२ फेब्रुवारी २०२३ ला हिरानंदानी ठाणे हाल्फ मॅरेथॉन होती. माझे होम पीच. ह्यावेळेला गेल्या महिन्यांत माझ्याबरोबर गोव्याला धावलेला माझा मित्र निखिल पोवार हा ही धावणार होता. गोव्याला त्याची पहिलीच मॅरेथॉन तो दहा कि मी धावला होता पण हिरानंदानी मॅरेथॉनसाठी त्यांनी माझ्या आग्रहात्सव २१ कि. मी.मध्ये सहभाग घेतला होता. ही मॅरेथॉन हिरानंदानी इस्टेट पासून चालू होऊन ब्रह्माण्ड वरून हायवे क्रॉस करून खेवरा सर्कल, उपवन ते थेट येऊर डोंगरच्या पायथ्याशी जाऊन परत फिरते. तसे  बघायला गेलो तर ह्या मॅरेथॉनचा मार्ग चढणीचा असल्याने मॅरेथॉनची चांगली वेळ नोंदवणे कठीण असते. पहाटे ५.३० ला मिलिंद सोमण ह्याने मॅरेथॉनला फ्लॅग दाखवून धावायला सुरवात झाली. निखिल आणि मी बरोबरीने धावत होतो. दोघेही एकमेकांना साथ देत होतो. काही वेळेला मी पुढे गेलो तर निखिल मागून त्याचा वेग वाढवून माझ्या बरोबर धावत होता. आम्ही दोघेही १६ कि मी पर्यंत पुरते दमलो होतो. निखिल तरुण वयाचा तिशीतला जरी असला तरी त्याच्याकडे धावण्याचा अनुभव कमी होता तर माझ्याकडे धावण्याचा दांडगा अनुभव जरी असला तरी वाढीव वयाचा अडसर होत होता. शेवटचे दोन किमी खूप थकायला झाले होते तरीही ही माझी ५० वी मॅरेथॉन मी २ तास २९ मिनिटांत पूर्ण केली आणि माझे ५० वे मेडल माझ्या गळ्यात पडले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पहिला आला तरच जिंकला असे नसते तर स्वतःचा चांगला परफॉर्मन्स देणे म्हणजे जिंकल्यासारखेच असते आणि तो मी माझ्या ५० व्या मॅरेथॉनला दिला होता.

हे ५० वे मेडल म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातली मोठी कमाई आहे. माझी ही सगळी ५० मेडल म्हणजे माझ्या तिजोरीतली नाही तर भिंतीवर प्रदर्शित केलेली माझी अनमोल संपत्ती आहे, जिची कधीही, कोणीही किंमत करू शकत नाही तसेच ती कोणीही माझ्यापासून चोरून किंवा हिरावून घेऊ शकत नाही. मॅरेथॉनचा ५० मेडलचा एक टप्पा मी पार केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच  १३ फेब्रुवारील मला ६२ वर्षे पूर्ण होणार होती त्याच्या एक दिवस आधी देवानेच मला मोठे बक्षीस मिळवून दिले होते, अर्थात ह्या मध्ये माझे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी आणि रेषा चा हातभार खूप आहे. तुमचे माझ्यावरचे प्रेम आणि तुम्ही मला देत असलेले प्रोत्साहन, ह्यामुळेच मला धावायला अजून ऊर्जा मिळते.

… असेच माझ्यावरचे प्रेम तुमचे द्विगुणित होऊ दे आणि माझ्या धावण्यासाठी तुम्ही देत असलेले प्रोत्साहन मला मिळत राहिले  तर पुढच्या पाच वर्षात माझे १०० वे मॅरेथॉन मेडल नक्की माझ्या गळ्यात असेल ह्याची मला खात्री आहे.

— समाप्त — 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments