सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –4 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
शाळेमध्ये असल्यापासून अनेक स्पर्धांमध्ये मला बक्षीसं मिळत होती. सुरूवातीला अर्थातच वक्तृत्व स्पर्धेमध्ये. शाळेतली एक आठवण अजूनही माझ्या लक्षात चांगली राहिले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर केले होते. माझा नंबर ही आला होता, कितवा ते आत्ता आठवत नाही. पण बक्षीस समारंभ सुरू झाल्यावर माझे नाव पुकारले गेले. मी खाली ग्राउंड वर बसले होते. मी उठून उभी राहिले आणि मैत्रिणी बरोबर स्टेज कडे जाणार तोच बक्षीस देणारे प्रमुख पाहुणे मला म्हणाले, थांब तू बोलू नको मीच खाली येतो. आणि आश्चर्य म्हणजे स्टेजवरून प्रमुख पाहुणे माझ्यासाठी खाली आले आणि माझी पाठ थोपटून त्यांनी मला बक्षीस दिले. त्यांच्या या मोठेपणाची अजूनही मला आठवण येते.
अशीच एक कॉलेजमधली आठवण. त्यावेळी गॅदरिंग मध्ये माझे नृत्य ठरलेलेच असायचे. एफ वाय ला असताना बक्षीस वितरणासाठी माननीय शिवाजीराव भोसले यांना कॉलेजमध्ये बोलावले होते. त्यावेळी मला तीन_चार बक्षिसे मिळाली होती. माझे ठरलेले वक्तृत्व, कथाकथन, कॉलेजमध्ये अंताक्षरी स्पर्धा होती. आमच्या ग्रुपचे प्रमुख मीच होते. त्यामध्ये वेगवेगळे राऊंड झाले. आमच्या ग्रुप चा पहिला नंबर आला. शिवाय मला प्रश्नमंजुषा मध्ये बक्षीस मिळाले होते. स्टेजवर घेण्यासाठी मी तीन-चार दा गेले होते. गॅदरिंग असल्यामुळे साडी नेसली होते. त्यावेळी शिवाजीराव भोसले सरांनी माझे कौतुक केले आणी म्हणाले,”किती बक्षीस मिळवलीस ग”. अजूनही त्यांचा तो आवाज, कौतुकाचे बोल माझ्या कानात आहेत. त्यांनी दिलेली शाबासकी माझ्या डोळ्यांना ना न दिसता ही मला जाणवली. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये अर्धा भाग ते माझ्यावरच बोलले. माझ्यावर एक छोटीशी कविता सुद्धा केली आणि ती म्हणूनही दाखवली. मला त्याचे शब्द आठवत नाहीत. पण अर्थ आठवतो आहे. परमेश्वर मला म्हणतोय, तुझे डोळे माझ्याकडे आहेत, पण माझं लक्ष तुझ्याकडे आहे. हा मोठा आशय अजूनही माझ्या लक्षात आहे. त्याचा गर्भितार्थ मी कधीच विसरणार नाही.
२००७ च्या एप्रिल मध्ये, रंगशारदा मिरज तिथे मुंबईच्या लोकांनी योगाचे शिबिर घेतले होते. केला मी जात होते. शेवटच्या दिवशी गप्पांमध्ये मी नृत्य शिकते, विशारदची परीक्षा देणार आहे, असं त्यांना सांगितल्यावर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. जुलैमध्ये त्यांचा मला फोन आला. गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबईला एका कार्यक्रमात नाच करशील का असे विचारले. येण्या-जाण्याचा खर्च आम्ही करतो. बाबांनी होकार दिला. खरंतर माझ्या मनात शंका होती. मुंबईच्या स्टेजवर माझे कसं होईल ही भिती होती, माझाच मला अंदाज नव्हता. पण काय सांग त्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. नाचाचे पूर्ण गाणे संपेपर्यंत टाळ्या थांबल्या नाहीत. माझा मेकअप, आत्मविश्वास यामुळे त्यांना मी अंध आहे, हे पटतच नव्हतं. कितीतरी बायकांनी नंतर माझा हात हातात घेऊन, गालावरून हात फिरवून, अगदी डोळ्यांना हात लावून खात्री करून घेतली. त्यावेळी मुंबई गाजवली. कितीतरी संस्थांमार्फत मला बक्षीस मिळाली.
आणखी एक अनुभव सांगते. सांगलीमध्ये अपंग सेवा केंद्रातर्फे माझा एक कार्यक्रम झाला. तो पाहायला वालचंद कॉलेजचे रिटायर्ड जोगळेकर सर आले होते. त्यावेळी ते 80 वर्षांचे असतील. माझा नाच झाल्यावर मुद्दाम मला भेटून ते म्हणाले,”छान नृत्य केलेस.अग, आम्हाला रस्त्यावरूनही नीट चालता येत नाही.”त्यांचं हे कौतुक ऐकून उत्साह वाढला आणि आपण काही कमी नाही हे जाणवले. नुसतं सहानुभूती म्हणून ते बोलत नव्हते, हे त्यांच्या शब्दातून कळले.
या माझ्या नृत्यासाठी माझ्या मैत्रिणी, शिक्षिका आणि माझी आई या सगळ्यांचे खूपच सहकार्य आणि मदत मिळत होती. माझी ड्रेपरी दागिने घालणे , मेकअप करणे यासाठी त्यांची मदत मोलाची होती. स्टेजवर जाऊन उभ करायलाही कोणी तरी मैत्रीण लागायची. नृत्याचे फोटो आले की त्याच मला वर्णन करून सांगायच्या. असे ते शाळा कॉलेजचे रम्य दिवस होते.
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈