सुश्री मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ “मराठी …”… कवी – माणिक कौलगुड ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
नवरसयुक्त सालंकृत मराठी माझी
वैभवशाली शालीन मराठी माझी
वसे हृदयसिंहासनी मराठी माझी
माय मराठी माझी सखी साजणी ।।
ज्ञानियांनी कौतुके जी मिरविली
शब्दकळा झळके गीतेची वैखरी
सुरवंद्य गीर्वाण वाणी तव जननी
माय मराठी माझी सखी साजणी ।।
कधी बोलते आर्त बोली तुकयाची
कधी रोखठोक रामदासी स्वभावे
भावव्याकूळ नामदेवाची गाऱ्हाणी
माय मराठी माझी सखी साजणी ।।
लेखणीच होई खड्ग विनायकाचे
धार केसरीची विलायतेस भिववी
हळवी मृदुल काळजाची दिवाणी
माय मराठी माझी सखी साजणी ।।
विश्व एक होता भेटती मातृभगिनी
ज्ञानगुरू असो कोणी पूजनीय ती
आपपर भाव नसे साऱ्या गुणखनी
माय मराठी माझी सखी साजणी ।।
कवी : माणिक कौलगुड.
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈