☆  मनमंजुषेतून : आठवणीतले जसराज…. – सुश्री आसावर केळकर-वाईकर

काहीवेळापूर्वी बातमी आली आणि मनानं खूप वर्षं मागं नेलं. अगदी शालेय वय होतं… नुकताच घरात टीव्ही आला होता आणि कुठलाही गाण्याचा कार्यक्रम त्यावर लागला कि वडिलांची हाक यायचीच… हातातलं काय असेल ते सोडून हाकेला ओ देत धावायचं आणि ‘बैस इथं.. ऐक नीट’ असं त्यांनी म्हणताच टीव्हीला डोळे लावून पाहाताना काय सुरू असेल ते सगळं कानात साठवायचा प्रयत्न करायचा… एकदा असाच टीव्हीवर कार्यक्रम सुरू झाला आणि पपांनी मला हाकारलं… मी धावत आले तर कुणीतरी मैफिलीची अगदी नुकतीच सुंदर सुरांत खूप सुरेल सुरुवात करत होतं आणि कॅमेरा त्याचवेळी फिरून प्रेक्षागृहातल्या पहिल्या रांगेत स्थानापन्न झालेल्या धोतर-झब्बा-खांद्यावर शेला अशी सुंदर वस्त्रं परिधान केलेल्या एका व्यक्तीवर स्थिरावला आणि वडिलांनी सांगितलं, ‘हे बघ… हे पंडित जसराज!’ ती त्यांच्या नावाची झालेली पहिली ओळख!

ते खुर्चीच्या हातावर कोपर टेकवून तर्जनी आणि मधलं बोट गालावर आणि उरलेली तीन बोटं हनुवटीवर ठेवून अतिशय कौतुकभरल्या नजरेनं एकाग्रपणे त्या गायकाकडं पाहात होते, त्याला ऐकत होते. पुन्हा कॅमेरा गायकाकडं वळला आणि जेमतेम वीस-बाविशीचा तो तरूण स्क्रीनवर दिसू लागला. काहीही ढिम्म कळत नसलेल्या लहानग्या वयातही एकूणच ‘सौंदर्याची व्याख्या’ माझ्या मनात रुजवण्यात त्या गायकाचे सूर आणि जसराजजींच्या चेहऱ्यावरच्या त्या सुखद भावांचा खूप मोठा सहभाग असावा असं आज वाटतं. मी अजून हातावर ताल देत मात्रा मोजत आलापाचे सूर त्यात बसवण्याच्या पायरीवरच होते तेव्हां… मात्र एखाद्या सुंदर सुरानं मनाला स्पर्श करून तिथं घर करायला वय, ज्ञान, समज काहीकाही आड येत नाही. तो शांतावणारा सूर आणि मैफिलीच्या सरत्या काही क्षणांमधे कॅमेऱ्यानं टिपलेला पं. जसराजजींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओसंडणारा क्षण ह्या गोष्टी तेव्हांपासून काळजात घर करून आहेत. नंतर कळलं कि तो युवा गायक म्हणजे ‘प्रतिजसराज’ म्हणून नावारुपाला येत असलेला त्यांचा पट्टशिष्य संजीव अभ्यंकर! आपण घडवलेलं सुंदर शिल्प आपल्या नजरेनं न्याहाळून त्याचा आनंद लुटण्यातलं सुख त्यादिवशी जसराजजींच्या डोळ्यांत दाटलं होतं. गुरू-शिष्याची जोडीही ‘त्यानं’ जमवावी लागते म्हणतात… ही जोडी अशा सर्वश्रेष्ठ जोड्यांपैकी एक म्हणायला हवी!

पुढं त्यांना ऐकताना तलम, मुलायम, लडिवाळ, मनाला खोलवर स्पर्श करणारा आणि महत्वाचं म्हणजे मन शांतावणारा सूर म्हणजे जसराजींचा सूर ही व्याख्याच मनावर कोरली गेली. पुढे काही दिवसांतच त्यांची ‘दिन की पूरिया’ ही कॅसेट आलेली आठवते. दुसऱ्या बाजूला ‘मुलतानी’ होता. ती कॅसेट कितीवेळा ऐकली असेल याची गणतीच नाही. अगदी शालेय वयात गाणं म्हणावं असं काही कळत नसताना, दिन की पुरिया आणि मुलतानीचे आरोह-अवरोहही माहीत नसताना किंबहुना रागांची ही नावंसुद्धा ऐकलेली नसताना फक्त सुरानं मोहून जाऊन कॅसेट पुन्हापुन्हा ऐकणं ही गोष्ट विलक्षणच म्हणायला हवी… ती ताकद त्या सुरांची होती, त्या लडिवाळ सुरानं मनावर घातलेल्या मोहिनीचा तो परिणाम होता!

त्यानंतर दोन-तीन वर्षांतच केव्हातरी आमच्या सांगलीच्या तरुणभारत ग्राउंडवर मोठा मंडप घातलेल्या भव्य स्टेजवरच्या मैफिलीत जसराजजींना तल्लीनतेनं गाताना डोळे भरून पाहिल्याचं आणि काना-मनात तो सूर खोलवर साठवून ठेवल्याचं आठवतं. सुरांत हरवून जाणं म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहाताना, त्यांना ऐकताना उमजत होतं. सुरांतली भावगर्भता हा मला भावलेला जसराजजींचा सगळ्यात मोठा पैलू! शास्त्रीय संगीत म्हटलं की बहुतांशीवेळा गळा नसणाऱ्या, संगीत न शिकणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात अकारणच त्याचं एक क्लिष्ट चित्र रंगवलं गेलेलं असतं. मात्र जसराजजींचं महत्तम योगदान म्हणजे दुसऱ्याला भावविभोर करणाऱ्या आपल्या सुरांनी त्यांनी अत्यंत सर्वसामान्य माणसाला शास्त्रीय संगीताची गोडी लावली.

त्यांच्या बंदिशींचा एक वेगळाच ढाचा आणि बहुतांशी बंदिशींचे कृष्णमय शब्द ऐकताना अक्षरश: भान हरपून जायचं. बंदिशीच्या शब्दांना न्याय देत रसाळपणे समोरच्या कोणत्याही वर्गवारीतल्या श्रोत्याला रसोत्पत्तीच्या परमोच्च बिंदूवर पोहोचलेल्या आपल्या सुरांनी न्हाऊ घालणे ही त्यांची खासियत! ही सगळी किमया म्हणजे दैवी देणगीला त्यांनी दिलेल्या अपार साधनेची जोड आणि त्याचं फलित होतं.

विचार करता जसराजजींचा भावगर्भ रससंपन्न सूर, किशोरीताईंची अफाट प्रतिभासंपन्न, विद्वत्तापूर्ण तरीही रसाळ गायकी, कुमारजींचा टोकदार सुरातील नक्षीदारपणे उभा केलेला राग, भीमसेनजींचा कमावलेला दमदार सूर अशा अनेक अद्भुत गोष्टींनी आमच्या पिढीचं संगीताचं वेड समृद्ध केलं आहे. आज काहीवेळेस स्टेजवर घडणाऱ्या काही गोष्टी मनास येत नाहीत तेव्हां त्याच्या मुळाशी कोणताच पूर्वग्रह, दुस्वास या गोष्टी नसून ह्या फक्त संगीताशी निष्ठावंत कलाकारांनी डोळ्यापुढं उभं केलेलं संगीताचं एक सुंदर, मनमोहक विश्व असतं, मनाच्या तळाशी जपून ठेवलेली ह्या कलाकारांच्या कलेनं प्रदान केलेली आत्मसुखाची अनुभूती ल्यायलेली रत्नप्रभा असते. असे संस्कार आमच्या पिढीच्या कानांवर झाले यापरते आमचं भाग्य ते काय असावं!? ह्या व्यक्तिमत्वांनी आमचं जगणं समृद्ध केलं… मनात अनेक जाणिवांची रुजवण ह्यांच्या कलेनं केली… डोळे मिटताक्षणी ह्यांच्या सुरांनी ‘त्याचं’ दर्शन घडवलं… अस्सलपण म्हणजे काय हे ह्यांच्या सुरांनी दाखवलं!

आज स्वर्गाच्या द्वारी सुशोभन असेल आणि साक्षात कृष्णपरमात्मा, त्यांचा कृष्णलल्ला त्यांच्या स्वागताला हजर असेल… त्यानं त्यांना मिठीत घेऊन आपुलकीनं स्वर्गात पाचारण केलं असेल आणि त्यांच्या रसाळ, भावगर्भ सुरांत ‘ओम्‌ नमो भगवते वासुदेवाय’ ऐकायला ‘तो’ आतुरला असेल! भगवद्गीतेतल्या ‘त्याच्याच’

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥

ह्य आत्म्याच्या व्याख्येनुसार तशाच आत्मीय सुराचं ‘त्यानं’च जसराजजींना दिलेलं वरदान तो आत्ता अंतरी अनुभवत असेल…!

शाममुरारी.. त्यांच्या सुरांच्या रूपानं कायमस्वरूपी आनंदाचा ठेवा आमच्याही आयुष्यात ठेवलास त्यासाठी तुझे अपार ऋण!

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

फोन : ०९००३२९०३२४

[email protected]

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments