सुश्री प्रभा हर्षे
☆ काही राहून तर नाही ना गेलं…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
तीन महिन्याच्या बाळाला दाईपाशी ठेवून कामावर जाणाऱ्या आईला
दाईनं विचारलं ~ “ काही राहून तर नाही ना गेलं ? पर्स, किल्ल्या सगळं घेतलंत ना ?
— आता ती कशी हो, हो म्हणेल ?
पैशापाठी पळता-पळता, सगळं काही मिळविण्याच्या महत्वाकांक्षेपोटी —
ती जिच्यासाठी एवढा आटापिटा करतेय — तीच तर राहून गेलीय !
लग्नात नवऱ्यामुलीस सासरी पाठवताना – लग्नाचा हाॅल रिकामा करून देताना
मुलीच्या आत्यानं विचारलं ~ “ दादा, काही राहून तर नाही गेलं ना ? चेक कर जरा नीट..!
— बाप चेक करायला गेला, तर वधूच्या खोलीत काही फुलं सुकून पडलेली दिसली.
— सगळंच तर मागं राहून गेलंय…. २१ वर्षे जे नाव घेऊन आपण जिला लाडानं हाक मारत होतो,
… ते नाव तिथंच सुटून गेलंय, आणि …. त्या नावापुढे आतापर्यंत अभिमानानं जे नाव लागत होतं,
— ते नावही आता तिथंच राहून गेलंय.
“ दादा, बघितलंस ? काही मागे राहून तर नाही ना गेलं ?”
— बहिणीच्या या प्रश्नावर, भरून आलेले डोळे लपवत बाप काही बोलला तर नाही,
पण त्याच्या मनात विचार आला~
— सगळं काही तर इथंच राहून गेलंय .!
मोठी मनिषा मनी बाळगून मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं,
– आणि तो शिकून तिथंच सेटल झाला.
नातवाच्या जन्मावेळी मोठ्या मुश्किलीनं तीन महिन्यांचा व्हिसा मिळाला होता,
– आणि निघतेवेळी मुलानं विचारलं ~ “ बाबा सगळं काही चेक केलंय ना ?—
काही राहून तर नाही ना गेलं ?”
— काय सांगू त्याला, की आता…. “आता राहून जाण्यासारखं माझ्यापाशी उरलं तरी काय आहे ..!”
सेवानिवृत्तीचे दिवशी पी.ए. नं आठवण करून दिली ~
— “ चेक करून घ्या सर ..! काही राहून तर नाही ना गेलं ?”
– थोडं थांबलो, आणि मनात विचार आला, “ सगळं जीवन तर इथंच येण्या-जाण्यात निघून गेलं.
— आता आणखी काय राहून गेलं असणार आहे?”
स्मशानातून परतताना ….. मुलानं मान वळवली पुन्हा एकदा, चितेकडे पाहण्यासाठी …
— पित्याच्या चितेच्या भडकत्या आगीकडे पाहून त्याचं मन भरून आलं.
— धावतच तो गेला — पित्याच्या चेहऱ्याची एक झलक पाहण्याचा असफल प्रयत्न केला….
— आणि तो परतला……. मित्रानं विचारलं ~- “ काही राहून गेलं होतं कां रे ?”
— भरल्या डोळ्यांनी तो बोलला ~ “ नाही , काहीच नाही राहिलं आता — आणि जे काही राहून गेलंय,
ते नेहमीच माझ्या सोबत राहील !”
एकदा… थोडा वेळ काढून वाचा—कदाचित …जुना काळ आठवेल, डोळे भरून येतील, आणि
– आणि आज मन भरून जगण्याचं.. कारण मिळेल ..
मित्रांनो ! कुणास ठाऊक ? केव्हा या जीवनाची संध्याकाळ होईल…..
— असं काही होण्याआधी सर्वांना जवळ घ्या,
त्यांच्या पाठीवर हात फिरवा.
त्यांच्याशी प्रेमानं बोलून घ्या
जेणेकरुन काही राहून जाऊ नये ..!!!
लेखक : अज्ञात
संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈