श्री मेघ:श्याम सोनावणे
☆ दुखावणारी माणसं ! – सुश्री यशश्री भिडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
काल एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम संपल्यावर बाहेर पडताना थोडा अंधार होता. प्रत्येकजण आपापलं जेवण आटपून बाहेर पडत होता. तेवढ्यात एका व्यक्तीला एका प्रथितयश डॉक्टरांनी हाक मारून म्हटलं “अरे बाहेर अंधार आहे रे, सांभाळून ! बाहेरच्या काळोखासारखा असलेला तुझा चेहरा कुणाला दिसला नाही, तर आपटेल कुणीतरी तुझ्यावर !”
त्या व्यक्तीचा चेहरा एकदम पडला. चारचौघात त्याच्या रंगावरून बोलल्यामुळे मनातून खूप दुखावला गेला असावा ! काय मिळतं अशा कॉमेंट्स करून लोकांना काय माहित!!
एखाद्याच्या व्यंगावर हसणारे लोक पहिले की कीव येते अगदी त्यांची ! बरं, ही माणसे स्वतः अगदी सर्वगुणसंपन्न असतात असंही नाही. पण ते ज्या पद्धतीने दुसऱ्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवतात ना ते पाहिलं कि चिडचिड होते अगदी !!
ही अश्या प्रकारची माणसं. समोरच्याच्या मनाचा कधीही विचार करत नाहीत, आणि बोलून झालं की आपण काहीतरी फारच भारी काम केल्यासारखं स्वतःवर खुश होऊन हसत असतात, आणि ज्याला ऐकावं लागतं तो मात्र बिचारा खजील होतोच आणि स्वतःचा आत्मविश्वासही गमावून बसतो.
लहान मुलांना पटकन त्यांच्यातला दोष दाखवण्यात ह्या प्रकारची माणसं अगदी पटाईत असतात. एकदा मी आणि माझी लेक एका ठिकाणी गेले होते. एक ओळखीच्या बाई आपल्या नातीला घेऊन आलेल्या तिथे…. ‘कुठे असतेस, काय करतेस’ अशा जुजबी चौकश्या झाल्यावर माझ्या लेकीकडे बघून म्हणाल्या “अगंबाई, दातांची वेडीवाकडी ठेवण अगदी आईची घेतलेली दिसत्ये !”
त्या बाई सावळ्या होत्या तशीच त्यांची नातही सावळी दिसत होती. म्हणून मी लगेच म्हटलं “होय, खरंय तुमचं, काही मुलं आईची वाकड्या दातांची ठेवण घेतात आणि काही मुलं थेट आजीचाच रंग घेतात हो !” माझ्या बोलण्याचा रोख कळला त्या बाईंना ! राग येऊन निघून गेल्या तिथून!! बहुतेक परत कुणाला बोलणार नाहीत!!
ह्या वृत्तीची माणसं फक्त दुसऱ्याच्या व्यंगावरच बोट ठेवतात असं नाही, तर त्याची एखादी दुखरी नस माहित असेल तर अगदी आठवणीने तो विषय काढून बोलणारच. माहित असतं बरं का ह्या लोकांना कि, समोरच्या माणसाचा मुलगा काहीही न करता घरी बसलेला आहे, तरी विचारणार, “असतो कुठे हल्ली ? दिसला नाही बरेच दिवसात ! म्हटलं मोठ्ठी नोकरी लागलेली दिसत्ये !” हे ऐकून आधीच काळजीत असलेली ती माउली अजूनच दुःखी होते.
लग्न लवकर न ठरलेल्या, मूल लवकर न होणाऱ्या, परीक्षेत, व्यवसायात सतत अपयश येणाऱ्यांना तर ह्या विशिष्ट प्रकारची माणसं अगदी नको करून सोडतात !
रस्त्यात, समारंभात अगदी भाजी घेताना भेटलो आणि वेळ मिळाला तर तिथेसुद्धा तुम्हाला दुखावल्याशिवाय ही माणसं सोडत नाहीत !! आणि सगळ्यात जास्त वेळा टोमण्यांचा, चेष्टेचा सामना करावा लागतो तो माझ्यासारख्या जाडजूड माणसांना !!
फिट असावं आणि दिसावं असं कुणाला वाटत नाही? कुणालाही आपण बेगडी, कुरूप दिसावं असं वाटत नसतंच मुळी ! प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. पण शेवटी सगळंच काही आपल्या हातात नसतं ना!
माझ्यासारख्या जाड व्यक्तींना ऐकवले जाणारे कॉमन डायलॉग कोणते माहित्ये ? “हळू, हळू, खुर्ची मोडेल, बापरे भूकंप झाला कि काय, समोर बघून चाल, तुला काही नाही होणार ती गाडी मोडेल, घसरू नको, रस्त्यात खड्डा पडेल मोठा, जरा कमी जेव किंवा खा एखादी पुरी, काही नाही होणार १०० ग्रॅम वाढून सागराला काय फरक पडेल ?…” इ.इ.
कुणी अति बारीक असेल तर “फु केलं तरी उडशील, नुसती काठी असून काय उपयोग ! ताकद नको ?” इ इ.
हे सगळं जे बोलत असतात त्यांच्या आरोग्याची खरं तर बोंब असते. फिगर छान असते, पण गुढघे दुखत असतात, मणके दुखत असतात, जराशा कामाने दमायला होत असतं, पण हे सगळं दिसत नसतं.
दुसऱ्याला मूल होत नाही म्हणून त्यांना बोलणाऱ्यांची मुले जे दिवे लावत असतात, त्याचा प्रकाश त्यांना नंतर दिसणार असतो. परीक्षेत अपयश मिळणाऱ्या मुलांना बोलणाऱ्यांची स्वतः कधी शाळेत सुद्धा विशेष प्राविण्य मिळवलेलं नसतं. पण… बोलायचं… टोचायचं काम ही माणसं मनापासून करत असतात आणि त्यात त्यांना आनंद मिळत असतो हे विशेष !!
माझी चिपळूणची आजी (आईची आई ) नेहमी दासबोधातले दाखले द्यायची. तिचं वाचन आणि अभ्यास प्रचंड होता ह्या विषयावरचा. आमच्या एकदा गप्पा चालू होत्या तेव्हा ती म्हणाली “समर्थानी सांगितलेलं आहे, तसं वागावं म्हणजे काय तर ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ स्वतःहून कुणाला व्यंग दाखवून दुखावू नये, पण आपलं व्यंग काढून आपल्याला कुणी दुखावलं तर त्याचं व्यंग दाखवल्याशिवाय त्याला सोडू नये. ज्याचं त्याचं माप त्याच्या पदरात घालायचं. आपलं व्यंग दाखवलं म्हणून दुःखी व्हायचं नाही, उलट समोरच्याची कीव करून त्याला देव सद्बुद्धी देवो म्हणायचं…!
लेखिका : सुश्री यशश्री भिडे
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे .
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈