श्री मकरंद पिंपुटकर
मनमंजुषेतून
☆ आईचा व्हॉट्सॲप… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
चार दिवस झाले होते, मी आईला फोनच केला नव्हता. हिंमतच होत नव्हती माझी, पण कधीतरी कळवावं लागणारच होतं. कारण त्याआधीच बाबांचा फोन आला, तर ते फारच भयंकर होणार होतं.
आज कळवू, उद्या कळवू म्हणत म्हणत इतके दिवस गेले, आजचाही दिवस गेला होता. अंथरुणावर पडून मी निद्रादेवीची आराधना करत होतो आणि तेवढ्यात व्हॉट्सॲप मेसेज आल्याची वर्दी देणारं पिंग वाजलं. गेले चार दिवस येणाऱ्या प्रत्येक फोनची रिंग आणि प्रत्येक मेसेजचं पिंग माझ्या काळजाचा ठोका चुकवत होतं – न जाणो बाबांचा फोन / मेसेज असला तर ?
पण आत्ता आईचा मेसेज होता.
“झोपला होतास का रे बाळा ?”— या परिस्थितीतही मी स्वतःशीच खुदकन हसलो. कॉलेजला जाणाऱ्या – हॉस्टेलला रहाणाऱ्या घोड्याला “बाळा” असं फक्त आईच म्हणू शकते.
“नाही ग, नुकताच पडत होतो.”
“चार दिवस झाले, फोन नाही तुझा, मेसेजही नाही. सगळं ठीक आहे ना रे ?”
” … “
“वाटलंच मला. काय झालं रे ? कुठं प्रेमाबिमात पडलास की काय ?”
“काहीतरी काय, आई ? तुझं आपलं काहीतरीच.”
“मग काय झालंय ? तू मेसेज टाकतोस का मी डायरेक्ट फोन करू ?”
“नाही, नाही. फोन नको करुस.”
— सगळं आटोपून बाबाही आता झोपायला येत असतील, किंवा already शेजारी झोपलेही असतील. आई माझ्याशी फोनवर बोलत आहे, म्हटल्यावर तेही बोलायला येणार आणि मग नको तो विषय निघणार …नकोच ते.
“आई, चार दिवसांपूर्वी पहिल्या सेमीस्टरचा रिझल्ट लागला.”
“हं, हं. आणि मग ?”
“आई, मला एका विषयात KT लागली आहे.”
“KT म्हणजे ?”
“KT म्हणजे मी त्या विषयात पास नाही झालो, आई. मी पुढच्या वर्गात जाईन, पण त्या विषयाची पुन्हा परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण व्हावं लागेल.”
— ‘पास नाही झालो’ हे ऐकल्यावर निशब्द होण्याची पाळी आता आईची होती. एका मोठ्ठ्या pause नंतर आईचा मेसेज आला —–
“काय झालं रे ? विषय अवघड जातोय का ? शिकवलेलं कळत नाहीये का लक्षात रहात नाहीये ?”
“तसं काहीच नाहीये, आई. उगाच मी काहीतरी खोटंनाटं सांगणार नाही की बहाणेबाजी करणार नाही. थोडा अभ्यास कमी पडला आणि मी ओव्हरकॉन्फिडन्समध्ये गेलो हीच खरी कारणं आहेत. पण तू काळजी नको करुस, बघ पुढच्या परीक्षेत याच विषयात अव्वल गुण आणतो की नाही ते ! अगदी तुझी शप्पथ. पण …”
“तू खरं सांगितलंस ते आवडलं मला. उगाच रूममेटला करोना झाला होता, किंवा तुलाच बरं नव्हतं असली सहज पचून जाईल अशी थाप नाही मारलीस तू. तुझी चूक तुला कळली आहे. ती परत करू नकोस. आणि काळजी घेत जा रे स्वतःची. .. आणि तू ‘पण …’ म्हणून वाक्य अर्धवट सोडलंस ते काय ?”
“आई, मी नक्की छान मार्कस् आणेन पुढच्या वेळी, पण, पण तू बाबांना सांभाळून घे. त्यांना काय सांगायचं, कसं सांगायचं, कधी सांगायचं ? मला तर काही सुचतच नाही बघ.”
आईने कसा लगेच विश्वास ठेवला (आता त्याला सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझी होती म्हणा). बाबा असते तर केवढं लेक्चर झाडलं असतं – परीक्षेचे गुण भविष्यासाठी कसे महत्त्वाचे आहेत, करिअर – वाढती महागाई – खर्च अशी त्यांची प्रवचनाची गाडी पटापटा पुढे सरकत गेली असती.
पण एक मात्र होतं बाबांचं, कधी – आम्ही किती खस्ता काढला तुमच्यासाठी, कसं पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला मोठं केलं – वगैरे कॅसेट नाही वाजवायचे ते. बोलायचे ते माझ्यापायीच्या चिंतेनेच बोलायचे, पण त्रास खूप करून घ्यायचे स्वतःलाच.
आईचं तसं नव्हतं. ती समजून घ्यायची मला. आता कसं तिला सांगितलं होतं, ती घेईल सांभाळून. मी निर्धास्त झालो होतो…..
“हां, बाबांना मी सांगते, समजावते. ती काळजी नको करुस तू. पण तू काळजी घेत जा. हे असं चार चार दिवस फोन केल्याशिवाय रहात जाऊ नकोस. चल, झोप आता.”
मी फोन ठेवला, आणि पटकन झोपी गेलो.
— —
“काय हो, झोप येत नाहीये का ? आणि माझ्या फोनशी काय करताय ?” आई बाबांना विचारत होती.
“अरे तू जागी झालीस वाटतं ? कुठं काय, गजर लावत होतो.”
— बाबा खोटं बोलले. लेकाचा चार दिवस फोन नाही आला तर केवढी कावरीबावरी झाली होती ती, नाही नाही ते विचार येत होते तिच्या मनात. पण फोन लावायला घाबरत होती.
बरं, हे महाशय बापाशी स्वतःहून बोलतील तर शपथ. बाप म्हणजे कर्दनकाळ अशीच त्यांची समजूत.
हे मेसेजचं बरं असतं. कोण टाईप करतंय कळत नाही.
बाबा स्वतःशीच हसले, लेकाच्या रिझल्टबद्दल उद्या आईची समजूत काढावी लागणार होती, त्याचं प्लॅनिंग करत तेही निद्रादेवीच्या अधीन झाले…..
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈