श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ सोनेरी शिक्षा… सुश्री संजीवनी बोकील☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मधली सुट्टी झाली होती. डबे खाणं संपवून काही मुलं खेळायला लागली होती. हॉलच्या पायरीवर बसलेल्या मायाकडून वडापाव घेण्यासाठी गर्दी झाली होती. मुलींचे घोळके कट्ट्यावर बसून गप्पा मारू लागले होते.मधली सुट्टी देते तो आनंदविसावा सगळ्या पटांगणात पसरून राहिला होता.
स्टाफरूममध्ये आम्हा टीचर्सच्या गप्पा रंगात आल्या होत्या.चहाच्या कपाबरोबर काही राजकारणाच्या गप्पाही तोंडी लावल्या जात होत्या. मीही चहा संपवून कपाटातल्या माझ्या कप्प्यातून प्रगतीपुस्तके काढून घ्यायला उठले होते एवढ्यात पाचवीतली एक मुलगी रडत रडत आत आली. “बोकील बाई कुठेत?” असं विचारत. तिच्या हातात एक चेपलेला लहानसा अल्युमिनियमचा डबा होता. मी तिला घेऊन बाहेर गेले. बाहेरच्या पायरीवर बसले, तिला शेजारी बसवलं.तिचे हुंदके थांबत नव्हते. तिला शांत करायचा प्रयत्न करीतच मी तिच्या रडण्याचं कारणही विचारायचा प्रयत्न करत होते. पाचवीतली ही मुलगी माझ्याकडे का आलीय ते मला कळत नव्हतं कारण छोट्या वर्गांना मी कधीच शिकवत नव्हते.
हळूहळू तिचे हुंदके थांबले आणि तिने हातातला डबा माझ्यापुढे धरला. तो डबा सगळीकडून चेपला होता. कारण विचारल्यावर मला कळले की ती पटांगणाच्या कडेच्या कट्ट्यावर डबा खायला बसली होती आणि खाऊन झाल्यावर खेळायच्या नादात डबा तिथेच विसरली .नंतर आणायला गेली तेव्हा काही मुले तिच्या डब्याचा फूटबॉल करून खेळत होती. तिच्या डब्याची ही अवस्था ज्यांच्यामुळे झाली होती ती माझ्या वर्गातील ,दहावीतील मुले होती. म्हणून ती तक्रार घेऊन माझ्याकडे आली होती.
हे सांगतानाच तिने तो डबा माझ्या हातात दिला आणि त्याची अवस्था बघून मी खरोखर शहारले. “आता माझी आई मला मारेल बाई, मी आईला काय सांगू?” असं म्हणून ती परत स्फुंदू लागली. मी तो डबा माझ्याकडे घेतला. तिला म्हटले,” आईला सांग की डबा बोकील बाईंकडे आहे आणि जमले तर उद्या संध्याकाळी मला भेटायला या. मग मी त्यांना सगळं सांगेन.”
प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतलेली पाहून पोरीचं टेन्शन सरबतातल्या बर्फासारखं विरघळून गेलं आणि ती डोळे पुसून उड्या मारत जिना चढून तिच्या वर्गात गेली.
माझ्या वर्गावर माझा शेवटचा तास होता. वर्गात जाऊन तो डबा मी टेबलावर ठेवला आणि खुर्चीत बसले. नेहमीप्रमाणे सामूहिक कविता म्हणून झाल्या. आज बाई खुर्चीत कशा बसल्यात याचं आश्चर्य सगळ्या चेह-यांवर दिसत होतं. टेबलवर ठेवलेला डबा पाहून काही मुलं चपापून खाली माना घालून बसलेली माझ्या नजरेला दिसत होती.
कविता संपल्यावर मी डब्याकडे बोट दाखवून म्हटलं ,” हा पराक्रम ज्यांनी केला आहे त्यांनी शाळा सुटल्यावर मला स्टाफ रूमच्या बाहेर भेटायचं आहे. माझा विश्वास आहे की यात सामील असलेले सगळे जण तिथे येतील.”
मुलांच्या हातून घडतात त्या बव्हंशी चुका असतात,गुन्हे नाहीत हा माझा विश्वास होता. योग्य पद्धतीने हाताळले तर चुका सुधारू शकतात हा माझा अनुभव होता आणि अजूनही आहे. कधी कधी चुका अनवधानानेही होतात. मुलांना त्यांची बाजू आधी मांडू द्यायला हवी.मग काय तो न्यायनिवाडा! आवाज चढवून डाफरण्याऎवजी, आपण कुठे चुकलो हे मुलांना आतून स्वत:ला कळायला,पटायला,मान्य व्हायला हवं. ते झालं की मग सुधारणेचा मार्ग आपोआप पायाखाली येतो ही माझी श्रद्धा आहे. मुलांच्या चुकीचा पंचनामा भर वर्गात करण्यासारखी घोडचूक नाही आणि मूठभर मुलांना झापण्यात वर्गाचा वेळ वाया घालवण्यासारखा मूर्खपणा नाही असं माझं दृढ मत आहे.त्यानुसारच सारं काही झालं.
शाळा सुटली.स्टाफरूम ब-यापॆकी रिकामी झाली मग मी बाहेर उभ्या असलेल्या पाच जणांना आत बोलावलं,डबा दाखवला आणि हे तुम्हीच केलंत का विचारलं .ते कबूल झाले पण त्यांचं म्हणणं होतं की डबा तिथे खाली पडला होता. मी म्हटलं,”तुम्ही तो उचलून ऑफिस मध्ये का ठेवला नाहीत? या गोष्टीने मला फार दु: ख झालं की माझ्या वर्गातल्या मुलांनी हे वाईट कृत्य करावं.तुम्ही डब्याला नव्हे, एका गरीब माणसाच्या कष्टांना लाथ मारलीत. हा डबा खरेदी करायला जी रक्कम लागली असेल ती त्याने घाम गाळून मिळवली असेल त्या मेहनतीचा तुम्ही अपमान केलात. अरे,एखाद्या गोष्टीला चुकून पाय लागला तरी नमस्कार करायची आपली पद्धत! आणि इथे अन्नाला लाथा मारल्यात तुम्ही?
मला भीती या गोष्टीची वाटते की आज एका निर्जीव गोष्टीचा असा छळ करणारे तुम्ही उद्या कॉलेजमध्ये एखाद्या सजीव व्यक्तीचाही गंमत म्हणून असा छळ करायला मागेपुढे बघणार नाहीत. तुम्ही रॅगिंग करणारे बनाल याचीच तर ही लक्षणे नाहीत? इतका दुष्टपणा आला कुठून? वर्षभर माझ्या हाताखाली शिकलेली मुलं असं दुष्कृत्य करत असतील तर तुमच्याऎवजी शिक्षा मीच घ्यायला हवी.”
माझं शेवटचं वाक्य ऎकल्यावर मुले हलली. सगळ्यांच्याच तोंडून ‘ सॉरी बाई,तुम्ही आम्हाला वाटेल ती शिक्षा करा पण असं नका म्हणू’ असे पश्चात्तापाचे अस्सल उद्गार निघू लागले.
मी म्हटलं,” तुम्हाला शिक्षा करून त्या बिचारीचा डबा परत मिळणार आहे का?” मुलं क्षणभर गप्प बसली मग एकजण म्हणाला ,
“आम्ही भरून देऊ तिचा डबा.”
” कसा? पालकांकडून पॆसे घेऊन? मग तुमच्या चुकीची शिक्षा पालकांना झाली.”
” नाही बाई आम्ही काम करू काही तरी.”
मी म्हटलं ,” ठीक आहे पण तुम्ही या सगळ्याची कल्पना आधी पालकांना दिली पाहिजे. त्यांची परवानगी घेऊनच पुढे काय ते करायचं. मान्य आहे.?”सगळ्यांनी माना डोलावल्या. ” आणि एक,आठवडाभर माझ्याशी बोलायचं नाही.” त्यांचे चेहरे पार उतरले. ही शिक्षा कदाचित त्यांना मोठी वाटली असावी.
तो शुक्रवारचा दिवस होता. मंगळवारी सकाळी त्या मुलीची आई मला भेटायला आली. सोमवारी मुलांनी त्या मुलीला तिच्या डब्यापेक्षा चांगला डबा छान प्रेझेंटेशन पेपरमध्ये गुंडाळून दिला होता. त्यासाठी पॆसे कुठून आणलेत असे ती त्यांना आज विचारायला आली होती. तिला कळले ते असे की त्यांच्यापॆकी एकाच्या काकांचे जवळच लहानसे घर होते. घराभोवती वाढलेले गवत काढून बाग स्वच्छ करायचे काम माळ्याऎवजी मुलांनी रविवारी केले होते.मुले १५-१६ वर्षांची होती त्यामुळे काही अडचण नव्हती. अल्युमिनियमचा डबा काही फारसा महाग नव्हता. तेवढे पॆसे सहज मिळवता आले होते त्यांना तास- दोन तास काम केल्यावर.
मी वर्गात गेले तर टेबलवर रंगीत कागदात गुंडाळून एक पेन ठेवले होते. ” हे काय आहे “विचारल्यावर एकाने उभे राहून सांगितले की-” डबा घेऊन झाल्यावर पॆसे उरले. मग त्यातून आम्ही तुमच्यासाठी हे पेन आणले.”
“माझ्यासाठी? कशाला? माझा काय संबंध? मला नको बाबा हे.” मी असं झटकून टाकताच पाचांचे चेहरे गोरेमोरे झाले. एकजण उठून हळूच म्हणाला,” मॅम तुम्ही या पेनने रोज प्रेजेंटी मांडा. तुमच्या हातात हे पेन बघून आम्हाला आमच्या चुकीची रोज आठवण येईल आणि परत अशी चूक आमच्या हातून होणार नाही.”मग जरासा धीर चेपला पांडवांचा आणि दुसरा म्हणाला,” बाई,आता तुम्ही आमच्याशी बोलणार ना?”
ते प्रामाणिक,भाबडे शब्द ऎकून मला भरून आले. मग “बाई, उघडा ना पेन.” असा आग्रह सुरू झाला.सोनेरी रंगाच्या त्या पेनने मी रोज हजेरी मांडली.तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी सोनेरी होऊन गेला
लेखिका :- सुश्री संजीवनी बोकील
प्रस्तुती : श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈