श्री मेघ:श्याम सोनावणे
मनमंजुषेतून
☆ देवत्व… लेखिका – सुश्री रश्मी लाहोटी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆
“पाळी नाही आली.”
“लघवी तपासली का?”
“नाही.”
“झोप टेबलवर.”
तपासणी झाली. नवऱ्याला आत बोलवायला सांगितलं. दहा बारा महिन्याचं बाळ अगदी काळजीपूर्वक सांभाळत तो आत आला.
खूपदा दिसणारं हे चित्र. कुटुंबनियोजनाची काळजी घेण्यात अजूनही बरीच जनता उदासीन असते. काही हजार मोजले की मोकळं ! हा सोप्पा पण चुकीचा समज.
“अडीच महिने झालेत.”
“हो, पाडायचं.”
“आधी काळजी घ्यायची की मग.”
“ ….”
“आधीचं काय?”
“मोठा मुलगा पाच वर्षांचा, अन् ही मुलगी दहा महिन्यांची !”
“ॲापरेशन करून टाकायचं असतं… किमान लवकर तरी यायचं, मोठा गर्भ पाडायचा म्हणजे तिला त्रास होणारच की !”
“आम्हाला ठेवायचंच होतं, म्हणून इतकं लांबलं.”
“इतकं लहान बाळ असून ठेवायचं होतं?” आता आईच्या कडेवर विसावलेल्या गुटगुटीत मुलीकडे पहात विचारलं.
“हे भावाचं आहे. भाऊ चार महिन्यांपूर्वी ॲक्सिडेंटमधे गेला. त्याची बायको दोन महिन्यापूर्वी बाळाला टाकून गेली, त्यामुळे हे आता आमचंच. म्हणून आता तिसरं नको.” नवरा बाळाच्या केसात हात फिरवत म्हणाला.
“हिला मंजूर आहे का?” बायकोकडे पहात विचारलं.
“हिनेच सुचवलंय…” नवरा तिच्याकडे कौतुकाने पहात म्हणाला.
“आताचा भावनेच्या भरात केलेला विचार कायम राहील का नंतरही?” सर्वसाधारण प्रश्न आणि शंका!
“विचार बदलू नये अन् बारकीवर अन्याय होऊ नये म्हणूनच हे पाडायचं अन् लगेच ॲापरेशन करायचंय. कारण तीन तीन लेकरं पोसण्याइतकी ऐपत नाही आमची.” तिचं पोरीचा गालगुच्चा घेत ठाम उत्तर !
आपल्या आजूबाजूलाच कितीतरी अगदी साधीसुधी दिसणारी, पण खूप मोठ्या उंचीवरची माणसं आपल्याला पहायला मिळतात ! देव फक्त मंदिरातच विराजमान असतो असं थोडंच आहे !! देवत्व असं कितीतरी लोकांच्या मनात आणि वागणुकीतही दिसतं कधीकधी आणि आपल्या मनाचं मोरपीस करतं !!!
लेखिका : सुश्री रश्मी लाहोटी
प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈