सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ सावित्री… लेखिका : सुश्री मानसी काणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

यंदाची वटपौर्णिमा आता जवळ आलीय. यादिवशी प्रथेप्रमाणे वटसावित्रीची कथा वाचताना, दरवर्षी सावित्री मला नव्याने समजत जाते. खरं तर ही एक पुराण कथा! भोळ्या भाबड्या पतीभक्तीपरायण बायकांनी ती ऐकायची आणि श्रद्धेने माथा टेकवायचा.पतीचे प्राण यमाकडून परत आणणं म्हणजे का सोपी गोष्ट आहे? याबरोबरच सासऱ्यांचं अंधत्व दूर करणं, त्यांचं गेलेलं राज्य परत मिळवणं, आपल्या निपुत्रिक पित्यासाठी पुत्र लाभाचा वर मिळवणं…. हे सगळं त्या सावित्रीने केलं. आज तर्काच्या कसोटीवर घासून पाहिली तर यातली एकही गोष्ट आपल्याला पटणार नाही कदाचित.पण तरीही मी या कथेतले नवे नवे अर्थ शोधत राहते…आणि एका क्षणी मला समजतं ,की कोणतीही गोष्ट विपरीत परिस्थितीशी झगडून, आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा उपयोग करून, विनम्र भावाने, कधी विनवणी करून मिळवणं आणि मिळवलेल्या गोष्टीचा उपयोग संपूर्ण कुटुंबासाठी होईल, हे पाहणं म्हणजेच सावित्री असणं, सावित्री होणं !

सावित्री म्हणजे कोणी राजकन्या, राणी किंवा वनवासिनी नाही,तर प्रत्येक स्त्री म्हणजे सावित्री ! स्त्रीत्वाचं प्रखर तेज म्हणजे सावित्री! सत्यवान, वटवृक्ष किंवा यमधर्म ….हे सगळं निमित्तमात्र. अविरत प्रयत्न, आणि यशाचा ध्यास म्हणजे सावित्री !

सावित्री बुद्धिमान होती. पतिनिष्ठा, पातिव्रत्य, कर्तव्य, धर्म या बाबतीतली आपली मतं तिनं यमाला सांगितली. वेळप्रसंगी त्याची स्तुती केली आणि त्यामुळे प्रसन्न झालेल्या यमा कडून वेगवेगळे वर मिळवले. तिला केवळ आपल्या पतीचे प्राण नको होते ,तर त्यानं उत्तम प्रतीचं आयुष्य जगावं,असं वाटत होतं .मग आधी तिनं आपलं राज्य परत मिळवलं .मग सासऱ्यांची दृष्टी परत मिळवून राज्यकारभाराची व्यवस्था नीट राहील असं पाहिलं.पित्यासाठी पुत्र मागून त्याच्या राज्याचा भविष्यकाळ सुरक्षित केला. सत्यवानाचे प्राण परत नाही मिळाले तर पतीशिवाय आपणही जिवंत राहणार नाही म्हणून, आपल्याशिवाय जगणाऱ्या आपल्या लोकांसाठी तिनं हे वर मिळवले. मग यमाने सत्यवानाच्या प्राणाखेरीज कोणताही वर मागण्यास सांगितल्यावर मोठ्या चतुराईनं सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत, असा वर मागितला.आणि हा वर खरा होण्यासाठी यमाला सत्यवानाचे प्राण परत द्यावेच लागले.हा एक प्रकारचा गनिमी कावाच होता आणि या युद्धात ती जिंकली.

माझ्या आजूबाजूला असंख्य स्त्रिया वावरत असतात. आपल्या मनाला मुरड घालून मुलाबाळांच्या भवितव्यासाठी अनेक घरी उजाडल्यापासून मावळेपर्यंत धुणीभांडी, केरफरशी करणारी माझी कामवाली,जीवनाशी तिची  सुरू असलेली लढाई, मुलींना चांगलं सासर मिळवून देणं, त्यांची बाळंतपण करणं, मुलानं शिकावं म्हणून तिचा चाललेला अट्टाहास,हे सगळं मी रोज पाहते.तीस वर्षे नवऱ्याच्या दुर्धर आजारासह सर्व संसारिक जबाबदाऱ्या उत्तम पार पाडणाऱ्या माझ्या जिवलग मैत्रिणीचा संघर्ष मी पाहिला आहे. त्यासाठी अनेक सुखाच्या क्षणांचा तिने केलेला त्याग माझ्या डोळ्यासमोर आहे. अकाली गेलेल्या नवऱ्याच्या माघारी त्याची उरलेली जबाबदारी रात्रंदिवस कष्ट करून पार पडणारी माझी वहिनी तर माझ्यासमोरच आहे. या सर्वजणींना मी पाहते ,तेव्हा या  त्या सावित्रीपेक्षा कणभर ही कमी नाहीत, याबद्दल माझी खात्री पटते. आज नवऱ्याच्या बरोबरीने कष्ट करणाऱ्या मुली त्यांच्या ताणतणावाचा अर्धा भाग आपल्या खांद्यावर पेलतात, म्हणजेच त्या त्यांचं आयुष्य वाढवितात. मतिमंद, अपंग मुलांना मोठं करणाऱ्या मातांच्या कौतुकासाठी तर शब्दच अपुरे पडावेत.ज्या चिकाटीनं सत्यवानाचे प्राण परत मिळेपर्यंत सावित्री यमाच्या मागोमाग चालत राहिली, त्याच चिकाटीनं त्या इच्छित साध्य गाठण्यासाठी मुलांबरोबर रोज अग्निदिव्य करीत असतात.

सध्या सगळ्याच पुराणकथांना भाकडकथा समजण्याचा काळ आहे. त्यातले दृष्टांत काल्पनिक समजले जातात. पण, थोड्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना  आधुनिक काळाशी जोडलं तर सत्ययुग,  द्वापारयुगातल्या या गोष्टी आजही लागू पडताना आपल्याला दिसतात. पुराणकालीन स्त्री सत्वाच्या, तपाच्या बळावर उभी असेल, तर आजची स्त्रीसुद्धा बुद्धी सामर्थ्याच्या आणि परिश्रमांच्या जोरावर आकाशाला गवसणी घालते आहे. आपल्याला जे हवे ते अविरत प्रयत्नांनी मिळवते आहे. आपल्या यशाने कुळाचे नाव वाढवते आहे. कोणतीही जबाबदारी स्वबळावर पार पाडण्याची ही कुवत म्हणजेच तर हे सावित्रीपण आहे.  आणि त्यासाठीचे प्रयत्न म्हणजेच वटसावित्रीचं व्रत आहे !

लेखिका : सुश्री मानसी काणे

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments