सुश्री मृणालिनी चितळे
☆ “तिचं मंगलपण…” भाग-1 ☆ सुश्री मृणालिनी चितळे ☆
गणितज्ञ डॉ. मंगल नारळीकर ! विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची पत्नी. माझी आत्ते नणंद. माझ्यापेखा पंधरा वर्षांनी मोठी, परंतु तिच्याशी गप्पा मारताना, ना कधी तिच्या बुध्दिमत्तेचं आणि प्रसिद्धीचं वलय आड येतं, ना वयातील अंतर. गप्पांच्या ओघात आपण मैत्रीच्या पातळीवर कधी उतरतो हे कळत नाही. हा माझ्या एकटीचा नाही, तर तिच्या सहवासात येणाऱ्या अनेकांचा अनुभव. नुकतीच १७ मे रोजी वयाची ८० वर्षे तिनं पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने तिच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची एक झलक.
गणित म्हणलं की भल्याभल्या हुशार लोकांना धडकी भरते, परंतु गणिताविषयी जन्मजात प्रेम असणाऱ्या मंगलताईसारख्या व्यक्तींच्या दृष्टीनं गणित म्हणजे नुसती आकडेमोड नसते तर पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी वहिवाट असते. या संबंधीची तिच्या लहानपणची एक आठवण. एकदा हौसेनं ती पुऱ्या तळायला बसली होती. तिला कुणीतरी काही विचारलं असता ती पटकन म्हणाली, “मध्ये बोलू नकोस, माझे आकडे चुकतात. पुरी तेलात टाकल्यावर सहा आकडे मोजून झाले की मी उलटते आणि बारा आकडे मोजून झाले की तेलातून काढते. त्यामुळे सगळ्या पुऱ्या टम्म फुगतात आणि पाहिजे तेवढ्या खमंग होतात.” आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी अंकगणितामध्ये बसवायची आणि अचूक पद्धतीनं करायची तिला अशी लहानपणापासून आवड होती.
मंगलताई ही पूर्वाश्रमीची मंगल राजवाडे. शालेय जिवनापासून अनेक बक्षिसे मिळवत ती एम.ए. झाली. मुंबई विद्यापिठात सर्वप्रथम आली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) या संस्थेमध्ये तिनं संशोधनाला सुरवात केली, परंतु तिच्या करिअरला यू टर्न मिळाला तो १९६६ साली जयंतरावांशी झालेल्या विवाहामुळे. जयंतरावांनी तरुण वयात फ्रेड हॉईल यांच्याबरोबर केलेल्या संशोधनामुळे जगप्रसिध्द शास्त्रज्ञ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत होते. लग्नानंतर केंब्रिजमध्ये तिनं संसाराचे प्राथमिक धडे गिरवताना गणित विषयातील अध्ययन चालू ठेवले. तिची हुशारी बघून चर्चिल कॉलेजमध्ये टीचिंग फेलोशिपसाठी तिचं नाव सुचवलं गेलं, परंतु जयंतरावांना विविध देशांमध्ये व्याख्याते म्हणून निमंत्रित केलं जात असल्याने हा प्रस्ताव तिनं नाकारला. पुढे १९७२ साली भारतात परत येण्याचा निर्णय दोघांनी मिळून एकमताने घेतला. त्यामागे आपल्या मातृभूमीविषयी वाटणारं प्रेम तर होतंच शिवाय आपल्या वृध्द आईवडलांची जबाबदारी घ्यायला हवी ही जाणीव होती आणि आपल्या मुलींवर भारतीय संस्कार व्हावेत अशी इच्छाही. भारतात आल्यावर जयंतरावांनी टीआयएफआरमध्ये संशोधन आणि अध्यापनाचे काम सुरु केले. मंगलताईनं तिचं पीएच. डी. चे काम हाती घेतलं. १९८१ साली संश्लेषात्मक अंक सिध्दांत या विषयात पीएच. डी. मिळवली आणि पदव्युत्तर आणि एम. फिल.च्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे काम सुरू केलं. अनेक संशोधनात्मक लेख लिहिले. शालेय विद्यार्थ्यांसाठी गणितगप्पा, गणिताच्या सोप्या वाटा यासारखी पुस्तकं लिहिली. ही झाली तिची औपचारिक ओळख. कुणाही कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या व्यक्तीची असते अशी; परंतु मंगलताईचं वैशिष्ट्य असं की गणितामुळे आत्मसात केलेलं तर्कशास्त्र आणि जयंतरावांच्या सानिध्यात वृध्दिंगत झालेला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तिनं जपला.
स्वयंपाकघर नव्हे प्रयोगशाळा
अनेकदा वेगवेगळ्या देशांत राहायची संधी मिळाल्यामुळे तेथील पाककृती तिनं शिकून घेतल्या. त्या जशाच्या तशा बनविण्यात ती वाकबगार आहे. चाळीस वर्षांपूर्वी तिच्या विदेशी पाककृतीसाठी लागणारे मालमसाले सहजगत्या उपलब्ध व्हायचे नाहीत. तेव्हा त्यांच्या योग्य देशी पर्याय तिनं निवडले. मॅपल सिरप ऐवजी वेगवेगळ्या स्वादाची काकवी. ओरॅगॅनोऐवजी ओव्याची ताजी पानं तर चीजकेकसाठी पनीर. ‘हर्बल टी’ बनविण्यासाठी बागेतील फुलापानांचा वापर ती करते, तेव्हा ते खाण्यायोग्य आहेत यांची शहानिशा केल्यावरच. घरच्या कुंडीत वाढलेली मोहरीची कोवळी रोपं सँण्डविच आणि सॅलेडमध्ये घातल्यावर स्वाद वाढविणारी कशी ठरतात याचा अनुभव मी तिच्याकडे घेतला आहे. बटाटेवड्याचं सारण हरबरा डाळीच्या पिठात बुडवून तळण्याऐवजी उडदाची डाळ भिजवून, वाटून त्याच्या पिठात बुडवून तिनं तळले तेव्हा वड्यांची चव अफलातून लागत होती. कुठेतरी वाचलेले किंवा कुणाकडे तरी खाल्लेले पदार्थ लक्षात ठेवून त्यात यथायोग्य बदल करण्याची प्रयोगशीलता तिच्याकडे आहे. रोजचा स्वयंपाक करताना किंवा पाहुण्यांसाठी बनवतानाही त्यामध्ये पिष्ठ, प्रथिन, स्निग्ध पदार्थांचा समतोल साधण्याचा तिचा प्रयत्न असतो. ठरावीक मोसमात मिळणारी फळं वर्षभर खायला मिळावीत यासाठी त्यावर शास्त्रीय पद्धतीनं प्रक्रिया करण्यात ती पटाईत आहे. एकदा तिच्या नेहमीच्या फळवाल्यानं ती मोठ्या प्रमाणात संत्री कशासाठी नेते म्हणून कुतूहलानं विचारलं. तेव्हा संत्र्यापासून बनवलेल्या मार्मालेडची बाटली तिनं त्याच्या मुलांसाठी भेट दिली. एवढंच नाही तर बियांमधील पेप्टीनचं महत्त्व त्याला सांगायला ती विसरली नसणार. कच्च्या पालेभाज्यांचा वापर करताना त्या पूर्णपणे निर्जंतुक करण्यासाठी पोटॅशियम परमँगनेटचा वापर ती करते. पोटॅशियम पाण्यात टाकलं की पाण्यातील प्राणवायू शोषून घेते. त्यामुळे त्या पाण्यात भाज्या बुडवून ठेवल्या की कीड मरून जाते, शिवाय पोषण मूल्य अबाधित राहते हे त्यामागचं शास्त्र! करोना काळात घराघरातून सॅनिटायझरने भाज्या, फळे धुतली गेली नि करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तशी ही कृती विस्मृतीत गेली. मंगलताई मात्र कटाक्षाने स्वयंपाकघरातील विज्ञान कायम आचरणात आणत आहे.
— क्रमशः भाग पहिला
© सुश्री मृणालिनी चितळे
मोबाईल ९८२२३०१७५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈