सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
मनमंजुषेतून
☆ – आधुनिक गार्गी – मैत्रेयी… भाग-1 – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
कविश्रेष्ठ इंदिरा संत
विदुषी दुर्गाबाई भागवत
कविश्रेष्ठ इंदिरा संत आणि विदुषी दुर्गाबाई भागवत ही साहित्य क्षेत्रातली दोन उत्तुंग शिखरं ! या दोघींना पाहिलं, की मला नेहमी डॉ. आनंदी गोपाळ जोशी आणि पंडिता रमाबाई यांची आठवण होई. दोघीही तेजस्विनी, प्रखर स्वाभिमानी, ज्ञानी, मनस्वी आणि कर्तृत्ववान स्त्रिया ! परंतु दोघींनाही एकमेकींविषयी प्रचंड प्रेम आणि आदर ! दोघी एकमेकींपासून शरीराने दूर, पण मनाने एकमेकींना भेटण्याची असीम
ओढ ! जीवनाविषयी या दोघींना अपार कुतूहल, उत्सुकता आणि प्रेम !
इंदिराबाई आणि दुर्गाबाई या खरंतर माझ्या आजी शोभतील, अशा वयाच्या. पण या दोघींचा मला स्नेह, सौहार्द, आशीर्वाद लाभला आणि माझं भाग्य मला ऐश्वर्यवंत करून गेलं! इंदिरा आणि दुर्गा लक्ष्मीचीच नावं. दोघी सात्त्विक आणि निर्मळ मनाच्या. साधं असणं, साधं वागणं, साधं बोलणं दोघींची सहजप्रवृत्ती ! या द्वयींच्या सहवासात वाटायचं, जणू प्राजक्ताच्या झाडाखाली मी बसलेय आणि धुंद गंधाच्या प्राजक्ताचा माझ्यावर अभिषेक होतोय ! यांच्याकडून किती टिपू आणि काय काय टिपू असं व्हायचं. ज्ञान टिपून घ्यायच्या बाबतीत दोघींचीही हीच अवस्था….
‘मी भुकेला सर्वदाचा, भूक माझी फार मोठी,
मंदिरी या बैसलो मी, घेऊनिया ताट वाटी
ज्ञानमेवा रोज खातो, भूक माझी वाढताहे
सेवितो आकंठ तरीही, मी भुकेला राहताहे…’
वयाच्या नव्वदीतही, दुर्गाबाई त्यांच्या शरीराला न पेलवणाऱ्या वजनाच्या ग्रंथाचे भाषांतर करण्यात गर्क ! ‘मला अजून भरपूर काम करायचंय’ ही प्रचंड उमेद ! जगातली सर्वांत ‘आनंदयात्री मीच’ ही भावना ! दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ ! जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा वाढदिवसासारखाच साजरा करावा आणि ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे’ हे जीवनाचं तत्त्व ! ९०व्या वर्षीही बाईंची बुद्धी तल्लख ! आणीबाणीविरुद्ध जनजागृती करताना, त्यांनी दुर्गेचा अवतार धारण केला होता, हे सर्वश्रुत आहेच. प्रखर सूर्याचं तेज त्यांच्या वाणीत होतं, तर मृदुभाषी इंदिरेच्या लेखनात चंद्रकिरणांकुरांची ‘शांताकार शीतलता’ होती. दोघींच्या नात्याची वीण मात्र जाईजुईच्या गुंफलेल्या गजऱ्यासारखी घट्ट होती !
‘ प्रत्येक साहित्यकृतीच्या निर्मितीत वाचकाचा, मूळ निर्मात्याइतकाच सहभाग असतो,’ अशी दुर्गाबाईंची श्रद्धा होती. ‘ खरी डोळस मेहनत वाया जात नाही. प्रत्येक अभ्यासकाने किंवा संग्राहकाने आपली कुशाग्र बुद्धी पणाला लावून, स्वतःच्या दृष्टिकोनातून आपली कृती साध्य करावी. प्रत्येकाची कुवत मर्यादित असते. पण एखाद्याने ती सीमारेषेपर्यंत ताणली तर स्वतंत्र कृती निर्माण होते आणि कर्त्याला अपार मानसिक समाधान देते;’ असे त्यांना वाटे. दुर्गाबाईंच्या अशा अनुभवांचा मला कविता गायनात खूप उपयोग झाला..
दुर्गाबाईंना कर्मकांडापेक्षा ‘कर्मयोग’ महत्त्वाचा वाटे. ध्यासी हे प्यासी, पर्यायाने कर्मयोगीच असतात. त्यांची पिपासा जगाला कल्याणकारीच असते. आपलं काम निष्ठेनं, भक्तीनं केलं तरी खूप झालं. परखड तसेच विचारपरिप्लुत व लालित्यपूर्ण लेखन करणार्या दुर्गाबाईंनी, आपल्या लेखनात अगदी पाककृतींपासून ते साहित्यसंस्कृती, समाजकारण, वैचारिक लेखन, राजकारण, प्राचीन इतिहास, अशा अनेक प्रांतांत लीलया संचार केला.
दुर्गाबाईंचे स्त्रीविषयक तर्कशुद्ध विचार आजच्या आणि उद्याच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरू शकतील. त्यांना ‘स्त्रीमुक्ती’ चळवळीचे अतिरेकीपण मान्य नव्हते. एकदा तर त्या मला म्हणाल्या, “अगं पद्मजा, रात्री अपरात्री दार वाजलं तर प्रथम आपण घरातल्या पुरुषासच पुढे पाठवतो ना?” पण स्वतःच्या हिंमतीवर जगणार्या कर्तृत्ववान स्त्रियांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. कामाठीपुऱ्यातल्या स्त्रियांसाठी काम करताना अनेकदा त्यांना शिव्याशापांनाही सामोरे जावे लागले. स्त्रीच्या आयुष्यातील निराशा, अडचणी, त्यांनी अचूक हेरल्या होत्या.
इंदिराबाईंनाही स्त्रीची ही व्यथा व्याकूळ करते. एका अल्पाक्षरी कवितेत हे ‘वैश्विक सत्य’ त्या अगदी सहजपणे मांडतात…
‘काय बाई सांगू कथा, क्षण विसावा भेटतो,
गुलबाशीच्या फुलासंगे, पुन्हा दीस उगवतो…
काय बाई सांगू कथा, पाणी आणून डोळ्यांत
एवढेच बोलली ती, घागरीला हात देत….’
इंदिराबाईंच्या मते कविता वाचन म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद लुटणे नव्हे. कविता वाचनात वाचकही निर्मितीक्षम असतो, असायला हवा. तरच त्या कवितेतील सूक्ष्म असलेले, मोलाचे काही उलगडता येईल.
इंदिराबाईंच्या काव्याविषयी कविवर्य ग्रेस यांनी मला एकदा पत्रात लिहिले होते,
‘दिन डूबा, तारे मुरझाए,
झिसक झिसक गई रैन,
बैठी सूना पंथ निहारूँ,
झरझर बरसत नैन…’
मीरेची एकट एकाकी विरही वेदना, मराठीत अस्सल आत्मतत्त्वाच्या करांगुलीवर जर कोणी तोलून धरली असेल तर ती इंदिराबाईंनीच !
‘दुखियारी प्रेमरी, दुखड़ा रो मूल,
हिलमिल बात बनावत मोसो,
हिवडवा (हृदयात) में लगता है सूल.’
“इंदिराबाईंच्या वेदनेचा हा काटा, पद्मजाबाई तुमच्या गळ्याला गायिका म्हणून नक्कीच झोंबला असणार….” — ग्रेस.
“चाकूने किंवा सुरीच्या टोकाने मनगटावर घाव करावेत आणि त्यातून आलेल्या रक्ताच्या थेंबाकडे बघत रहावं, तशा या माझ्या कविता आहेत..” अशी प्रतिक्रिया स्वतःच्या कवितेकडे पाहताना फक्त इंदिराबाईच लिहू शकतात. त्यांची कविता आत्मस्पर्शी व आत्मभान असलेली आहे. ती वाचतानासुद्धा दुर्गाबाईंच्या लेखनासारखी चित्ररूपच कायम डोळ्यांसमोर येते.
इंदिरा अक्कांचं खास वैशिष्ट्य म्हणजे, निसर्गातील कुठल्याही ‘अजीव’ गोष्टीतही त्यांना ‘चैतन्य’ दिसतं. निसर्गावर तर दोघींचंही प्रचंड प्रेम ! दुर्गाबाईंच्या ‘ऋतुचक्र’, ‘निसर्गोत्सव’, ‘दुपानी’ किंवा इतर लेखनातही हा निसर्ग जिवंत उभा राहतो. अक्कांच्या संवेदनशील मनानं ‘वंशकुसुम’ हा संग्रह तर चक्क पारिजातकाच्या फुलाला वाहिलाय. फुलपाखरू जसं अलगद फुलावर बसावं, तशी त्यांची कविता एखाद्या दवबिंदूप्रमाणे तरल आहे. ‘ दवबिंदूला स्पर्श करताच तो फुटून जाईल की काय या भीतीनं कवितेतील ‘कवितापण’ जपायचा मी प्रयत्न करते, कारण प्रत्येक कविता हे कवीचं बाळच असतं.’.. ही त्यांची हळुवार तरल भावना.
पती ना. मा. संत निवर्तल्यावर अक्कांनी व्रतस्थपणे लिहिलेली एक कविता…
‘कसे केव्हा कलंडते, माझ्या मनाचे आभाळ
आणि चंद्र चांदण्यांचा दूर पोचतो ओहळ…
पेट घेई मध्यरात्र, पेटे काळोखाचे जळ
दिवसाच्या राखेमध्ये, उभी तुळस वेल्हाळ….’
यातील ‘तुळस वेल्हाळ’ हे शब्द म्हणजे अक्कांचा ऑटोग्राफच जणू ! अशा या सत्त्वशील योगिनींचा मला सुगंधी सहवास लाभला, हे माझे महत्भाग्यच !
— क्रमशः भाग पहिला.
© सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈