सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “नमामि देवि नर्मदे…” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

कधीतरी शाळकरी वयात दुर्गाबाई भागवतांचा ‘महेश्वरची महाश्वेता’ हा अहिल्यादेवी होळकरांवरचा लेख वाचनात आला आणि मी पार भारावून गेले. देवी अहिल्याबाईंचं सोज्वळ, शालीन व्यक्तिमत्व, व्यक्तिगत आयुष्य एकामागोमाग एक अंगावर कोसळणाऱ्या डोंगराएवढ्या दुःखांनी चिणून गेलेलं असतानाही त्यांनी केवळ इंदूर संस्थानच्या रयतेवरच नव्हे, तर पूर्ण भारतातल्या गरीब, पीडित जनतेवर धरलेला आपल्या मायेचा पदर, देवासाठी, हिंदूधर्मासाठी करून ठेवलेली कामे, आणि त्यांची व्रतस्थ राहणी, सगळ्यांनीच माझ्या कोवळ्या मनावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासूनच अहिल्याबाई आणि त्यांचे लाडके महेश्वर मनात घर करून बसले होते. कुणीतरी दिलेलं मोरपीस जपून पुस्तकाच्या पानांमध्ये ठेवावं तसं मनात जपून ठेवलेलं. महेश्वरच्या विस्तीर्ण दगडी बांधीव घाटांच्या पायऱ्यानां हळुवार गुदगुल्या करणारी नर्मदा,  महेश्वरमध्येच विणलेल्या महेश्वरी साडीइतका नितळ, झुळझुळीत नर्मदेचा विशाल प्रवाह, शुभ्र साडीतली अहिल्याबाईंची कृश मूर्ती, त्यांच्या हातातलं बेलपत्राने सुशोभित झालेलं शिवलिंग, सारं काही न बघताही माझ्या मनात खोल रुतून बसलेलं होतं. पुढे पाच वर्षांपूर्वी मी महेश्वरला पहिल्यांदा गेले तेव्हा मला खूप वर्षांनी माहेरी गेल्याचा आनंद झाला होता. 

इंदूर. मल्हारराव होळकरांनी आपल्या कर्तबगारीने उभारलेलं तत्कालीन मध्य भारतातलं एक इवलंसं संस्थान. मल्हाररावांना एकच मुलगा, अहिल्याबाईंचा नवरा खंडेराव   होळकर. कुंभेरीच्या लढाईत खंडेराव तोफेचा गोळा वर्मी लागून मृत्यू पावले. तत्कालीन प्रचलित चालीरीतींप्रमाणे अहिल्याबाई त्यांच्यामागे सती जायला निघाल्या तेव्हा मल्हाररावांनी डोळ्यात पाणी आणून त्यांना मागे खेचलं. अहिल्याबाईंचा वकूब त्यांना माहिती होता. पुढे पूर्ण राजकारभार मल्हाररावांनी आपल्या ह्या कर्तबगार सुनेच्या हाती दिला. अहिल्याबाईंनी सासऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आपलं इंदूर संस्थान तर उत्तम प्रकारे सांभाळलंच, पण त्यांच्या पदराची सावली फार मोठी होती. देशभरातल्या हिंदू जनतेसाठी अहिल्याबाईंनी जे काम करून ठेवलंय तसं काम क्वचितच दुसऱ्या कुठल्या भारतीय राजा किंवा राणीने केलं असेल. 

धर्मांध मुसलमानी आक्रमकांनी हिंदू मंदिरे उध्वस्त केली होती. त्यांनी घातलेले घाव केवळ दगडांच्या भिंतीवर पडले नव्हते तर त्या घावांनी हिंदूंची मनेही छिन्न-विछिन्न करून टाकली होती. जेव्हा अहिल्यादेवीनी सोमनाथ आणि काशीला नवीन शिवालये बांधण्याचा घाट घातला तेव्हा त्या नुसती दगड मातीच्या इमारती उभारत नव्हत्या , त्या उभारत होत्या सर्वसामान्य हिंदूंची हिंमत. सततच्या पराभवांनी गांडुळासारख्या लिबलिबीत झालेल्या सामान्य हिंदू समाजमनाला अहिल्याबाई फिरून एकवार सामर्थ्याचा फणा काढायला डिवचत होत्या, शिकवत होत्या.

अगदी आजही भारताचा नकाशा बघितला तर अहिल्याबाईंच्या पाऊलखुणा तुम्हाला जागोजागी दिसतील. त्यांनी बांधलेल्या नदीवरच्या घाटांवर अजूनही भारतातले लोक तीर्थस्नानाला जातात. काशी-सोमनाथ पासून ते गयेमध्ये त्यांनी घडवलेल्या, जीर्णोद्धार केलेल्या मंदिरांमध्ये आजही हिंदू दर्शनासाठी रांगा लावतात. त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा आपल्याला हिमालयामध्ये बद्रिकेदार ते दक्षिणेत रामेश्वरम पर्यंत सापडतील. त्या धर्मशाळा अजूनही थकलेल्या, गांजलेल्या हिंदू यात्रेकरूंना आश्रय देतात. हे सगळं प्रचंड काम अहिल्याबाईंनी केलं ते आपल्या अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या कारकिर्दीत, स्वतः व्रतस्थ राहून, आपल्या वैयक्तिक गरजा अत्यंत कमी करून. आपल्या खासगी मिळकतीतला पैसानपैसा वापरून अहिल्याबाईनी धर्मासाठी हे डोंगराएवढं काम केलं. 

औरंगझेबाने त्याच्या अखेरच्या दिवसात स्वतः टोप्या विणून आणि कुरणाच्या प्रती हाताने लिहून स्वतःच्या कफनापुरते पैसे जमवले होते ह्याचे गोडवे आपण खूपदा ऐकलेत, पण अहिल्याबाई कित्येक वर्षे एकभुक्त राहिल्या, राणी असताना काठ-पदर नसलेल्या साध्या पांढऱ्या माहेश्वरी सुती साडीखेरीज कधी त्यांच्या अंगाला दुसरं वस्त्र लागलं नाही. एका रुद्राक्षांच्या माळेखेरीज त्यांनी कधी दुसरा दागिना अंगावर ल्यायला नाही. त्यांचा महेश्वर मधला वाडा ‘राजवाडा’ म्हणून घेण्यासारखा कधी भव्य-दिव्य आणि दिमाखदार दिसला नाही. हे सगळं करून अहिल्याबाईंनी जो पैसा वाचवला तो सगळाच्या सगळा देवळांची बांधकामं, नदीवरचे घाट, धर्मशाळा इत्यादी धर्मकार्यात खर्च केला हा इतिहास किती जणांना माहित आहे?

गेल्या आठवड्यात परत एकदा महेश्वरला जायचा योग आला. माहेश्वरी साड्या कश्या विणतात ते बघायला तामिळनाडूच्या को-ऑप्टेक्स चे एमडी वेंकटेश नरसिंहन ह्यांनी आयोजित केलेल्या दौऱ्याचा एक भाग म्हणून आम्ही काही समानधर्मी लोक महेश्वरला गेलो होतो. माझी ह्याआधीची पहिली महेश्वर वारी भर उन्हाळ्यात होती त्यामुळे नर्मदेचा प्रवाह थोडा क्षीण झालेला आणि धापा टाकायला लावणारी निमाडची गरमी. ह्यावेळी मात्र आम्ही महेश्वरचा सुखद हिंवाळा मनसोक्त अनुभवला. ह्यावर्षी पाऊस खूप झाला त्यामुळे नर्मदेचा प्रवाह खूपच विशाल आणि विस्तीर्ण भासत होता. आम्ही घाटावर पोचलो तेव्हा सरती संध्याकाळ होती, उन्हे नुकतीच कलायला लागली होती. नर्मदेपारच्या गावांमधले लोक बाजारहाट करून आपापल्या गांवी परत निघाले होते. नर्मदेचा प्रवाह शांत वहात होता. आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो त्या ठिकाणी कधीतरी अहिल्यादेवीही उभ्या राहिल्या असतील ह्या विचारानेच माझ्या अंगावर काटा आला. आजही महेश्वर वासियांसाठी अहिल्याबाई ‘रानी माँ’ आहेत. त्यांचं अस्तित्व आजही आपल्याला महेश्वरमध्ये जाणवतं. 

बघता बघता सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकायला लागला. प्रवाहात उभा असलेला एक मोठा खडक प्रदीप्त झाल्यासारखा दिसत होता, दूरवर गांवकऱ्यानी भरलेल्या बोटी संथपणे नर्मदेचा प्रवाह कापत पलीकडे चालल्या होत्या. आता सूर्याचा रसरशीत लालभडक गोल अलगद नदीच्या प्रवाहाला टेकला होता, जणू आई नर्मदेच्या कपाळावरचा ठसठशीत कुंकवाचा टिळा. आता घाटावरची गर्दी कमी झाली होती. प्रवाहाच्या अगदी जवळ, घाटाच्या शेवटच्या पायरीवर एक बाई उभ्या राहून मावळत्या सूर्याला अर्घ्यदान करत होत्या. सगळीकडे नीरव शांतता, फक्त नर्मदेच्या मंद वाहत्या लाटांचा आवाज आणि आमचे दीर्घ श्वास. अंगावर शिरशिरीच आली एकदम.

तेवढ्यात पूजेची तयारी असलेले तबक घेऊन एक गुरुजी आले. रोजच्या नित्य नर्मदाआरतीची वेळ झाली होती. ही आरती म्हणजे ऋषिकेशच्या किंवा वाराणसीच्या गंगा आरतीसारखी दिमाखदार नव्हे, अगदी साधी सुधी, घरगुती, अगदी अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वासारखी सोज्वळ आणि शांत. आरती करणारे एक गुरुजी, त्यांच्या मागे टाळ वाजवणारे दुसरे आणि मागे कोरसमध्ये गाणारा एक तिसरा तरुण. बस एवढंच. फक्त तीन माणसं आणि आमचा ग्रुप. आरती झाली आणि त्या गुरुजींनी स्वच्छ स्वरात आदी शंकराचार्यांचे नर्मदाष्टक म्हणायला सुरवात केली. 

सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं

द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम् ।

कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे

त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे… 

मंतरलेली संध्याकाळ होती ती, आदी शंकराचार्यांचे अलौकिक शब्द, नर्मदामैय्याचा चिरंतन प्रवाह, देवी अहिल्याबाईंचा आशीर्वाद, नर्मदेच्या प्रवाहाबरोबर वाहत चाललेले द्रोणांचे दिवे आणि मंत्रमुग्ध होऊन ऐकणारे आम्ही. आयुष्यात काही क्षण असे येतात की ते अनुभवताना जिणं सार्थक झाल्यासारखं वाटतं. नर्मदेकाठची ती संध्याकाळ तशी होती. 

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments