मनमंजुषेतून
☆ “विठ्ठल ! विठ्ठल !” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆
विठोबा. मला मनापासून आवडतो.अगदी लहान असल्यापासनं. कमरेवर हात ठेवून उभा ठाकलेला.. .गालातल्या गालात खुदकन् हसणारा. काळासावळा.साधासुधा. आपला देव वाटतो.
पंढरपूरला गेलो की सहज भेटायचा. आपुलकीनं बोलणार. ‘ काय, कसा काय झाला प्रवास ? यावेळी अधिकात येणं झालं. जरा गर्दी आहे. चालायचंच. सगळी आपलीच तर माणसं. असं करा.उद्या सक्काळी सक्काळी या. काकडआरतीला. मग निवांत बोलू.’ मला पटायचं.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पाचच्या सुमारास मी एकटाच मंदिरात जायचो. फारशी गर्दी नसायचीच. विठोबा निवांत भेटायचा. वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटायचं. काकडआरती चाललेली. धूप उदबत्तीचा सुगंध. सगळं अदभुत. एवढ्या गर्दीतसुद्धा विठोबा माझ्याकडेच बघायचा. डोळ्यातल्या डोळ्यात हसायचा. “अरे वा ! आज सकाळी सकाळी दर्शन. वा ! वा! आनंद वाटला. काय कसा काय चाललाय अभ्यास ? तेवढं गणिताकडे लक्ष द्या. पुढच्या वेळी याल तेव्हा पाढे पाठ पाहिजेत हं तीसपर्यंत. जरा लिहायची सवय ठेवा. आम्ही पाठीशी आहोतच.तरीही तुम्ही मेहनतीत कमी पडता कामा नये. बाकी अक्षर छान आहे हो तुमचं…”
मला भारी वाटायचं. “तीसपर्यंत पाढे नक्की पाठ करतो. गाॅडप्राॅमीस.” मी गाॅडप्राॅमीस म्हणलं की विठोबा गालातल्या गालात गोड हसायचा. “बरं बरं..”
देवाशपथ सांगतो. लहान असताना विठोबाशी असं सहज चॅटींग व्हायचं. माझे आजी आजोबा. पालघरला रहायचे. दरवर्षी दोघंही वारीला जायचे. चातुर्मासात चार महिने पंढरपूरला जाऊन रहायचे. दरवर्षी आम्हीही जायचो पंढरपूरला. साधारण 80 ते 85 चा सुमार असेल. चार पाच वर्ष सलग जाणं झालं पंढरपूरला. तेव्हा महापूजा असायच्या. आजोबांच्या पंढरपूरात ओळखी फार. माझे दोन्ही मामा मामी, आई बाबा सगळ्यांना महापूजेचा मान मिळाला. गाभाऱ्यातला विठोबा आणखीनच जवळचा झाला. हिरव्याकाळ्या तुळशीची माळ काय छान शोभून दिसायची विठोबाला. त्याच्या कपाळावरचं ते गंध. दूध दह्यानं घातलेली आंघोळ. विठोबाच्या चेहऱ्यावरील अलौकिक तेज. त्याचे ते अलंकार. लगोलग हात जोडले जायचे. असं वाटायचं पूजा संपूच नये कधी….
पंढरपूरला आजी आजोबा बांगड धर्मशाळेत रहायचे. धर्मशाळा नावालाच. अतिशय उत्तम सोय. सेल्फ कंटेन्ड रूम्स. भल्यामोठ्या. दोन खोल्यात आजीआजोबांचा संसार मांडलेला असायचा. गॅसपासून सगळी सोय. आम्ही गेलो की दोन खोल्या अजून मिळायच्या. प्रत्येक खोलीसमोर रूमएवढीच भलीमोठी गॅलरी. तीन चार मजली मोठी इमारत. नवीनच बांधलेली. अतिशय लख्ख स्वच्छ. धुडगूस घालायला पुरेपूर स्कोप. समोरचा वाहता रस्ता. गॅलरीत रेलिंगला टेकून रस्त्यावरची गंमत बघायला मला जाम आवडायचं. ही जागा मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर. पंढरपूरला गेलो की दोन दिवस रहाणं व्हायचंच व्हायचं. सकाळी महापूजा आवरली की दिवस मोकळा. मी चौथी पाचवीत असेन तेव्हा.
सक्काळी सक्काळी जाग यायची. लाऊडस्पीकरवर भीमसेन आण्णांचा आवाज कानी पडायचा. “माझे माहेर पंढरी…”. आपण युगानुयुगे पंढरपूरला रहातोय इतकं प्रसन्न वाटायचं. सगळं आवरून मी शून्य मिनिटात तयार व्हायचो. मग आजोबांबरोबर चंद्रभागेतीरी. बोटीत बसायला मिळावं ही प्रामाणिक इच्छा. मी पडलो नगरवाला. पाऊस, पाणी, नदी, बोटींग या गोष्टी परग्रहावरल्या वाटायच्या. नदी पाण्यानं टम्म फुगलेली. माझी बोटींगची इच्छा विठोबा, थ्रू आजोबा सहज पूर्ण करायचा. चूळूक चूळूक आवाज , ओल्या पाण्याचा हवाहवासा वास, घाटांवर विसावलेली असंख्य कळसांच्या भाऊगर्दीत हरवलेली पंढरी. अलंकापुरी. हे स्वर्गसुख बघायला दोन डोळे पुरायचे नाहीत.
चंद्रभागेला भेटून पुन्हा बांगड धर्मशाळेत परतायचं. तोवर आजीचा स्वयंपाक झालेला असायचा. जेवण झालं की मी पुन्हा गुल. तेव्हाही पंढरपूरात गर्दी असायचीच. तरीही आजच्याइतकी नाही. भलीमोठी दर्शनरांग, दर्शनमंडप वगैरे नसायचं. दिवसातून ईन्फाईनाईट टाईम्स मी मंदिरात जायचो. दहा पंधरा मिनिटात सहज दर्शन व्हायचं. विठोबाशी मैत्र जुळायचं. कंटाळा आला की नामदेवाच्या पायरीपाशी जाऊन बसायचो.
मला आठवतंय, एके दिवशी सकाळी नामदेवपायरीपाशी गेलेलो. एक वारकरी नाचत होता. हातात चिपळ्या. गळ्यात वीणा आणि तुळशीच्या माळा. कपाळी गंध. कुठलातरी अभंग म्हणत होता. दिवसभरात चार पाच वेळा चकरा झाल्या माझ्या तिथं. प्रत्येक वेळी तो भेटला. भान हरपून नाचणारा. मला रहावलं नाही. सुसाट धर्मशाळेत गेलो. आजीला सगळं सांगितलं. ” सकाळपासून नाचतोय बिचारा. जेवला सुद्धा नाही गं.” आजी खुदकन् हसली. “तोच खरा विठोबा. जा नमस्कार करून ये त्याला.” मी रिवर्स गिअरमधे पुन्हा मंदिरात. त्याला वाकून नमस्कार केला. तो मनापासून हसला. मला कवेत घेतलं. गळ्यातली तुळशीची माळ माझ्या गळ्यात घातली. धन्य. धन्य. काय सांगू राव? त्याच्या डोळ्यात विठोबा हसत होता.
धर्मशाळेत मॅनेजरची खोली होती. विठोबा, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि इतर अनेक संतांच्या तसबिरी होत्या. वीस पंचवीस असतील. मॅनेजरकडे मोठ्ठी सहाण होती. गंध उगाळायला अर्धा तास सहज लागायचा. मग प्रत्येक तसबिरीला गंध लावणं., जुना हार काढून ताजा हार घालणं, उदबत्ती लावणं. मला हे सगळं बघायला खूप आवडायचं. मॅनेजर माझी परीक्षा घ्यायचे. संतांची मांदियाळी मी बरोबर ओळखायचो. मॅनेजर खूष. बक्षीस म्हणून विठोबाला हार मी घालायचो. बत्तासा मिळायचा. मला भारी वाटायचं.
धर्मशाळेत खालच्या मजल्यावर कुठलेतरी कीर्तनकारबुवा आलेले असायचे. सकाळी त्यांची पूजा आटोपली की रियाज असायचा. मी जाऊन बसायचो. रात्री त्यांचं मंदिरात किर्तन असायचं. साथीदार तयारीचे… मृदुंगाला शाई लावली जायची. टाळ चिपळ्यांचा आवाज घुमायचा. बुवांची रसाळ वाणी. प्रेमळ चेहरा. लाईव्ह परफाॅर्मन्स. श्रोता मी एकटाच. कीर्तन मस्त रंगायचं. माझा चेहरा बघून बुवा खूष व्हायचे. सहज शेजारी लक्ष जायचं. वाटायचं विठोबाच शेजारी बसून प्रसन्न चित्ताने कीर्तन ऐकतोय. भारीच.
दुसऱ्या मजल्यावर एक चित्रकार असायचे. संस्थानाच्या कामासाठी आलेले. महाभारत, रामायण, विठोबाची अप्रतिम चित्रं काढायचे. एकदम जिवंत. भल्यामोठ्या कॅन्व्हासवर. मी गुपचूप तिथं जाऊन बसायचो. तासन्तास. हरवून जायचो. मोठा कसबी कलाकार. तासाभरानं त्यांचं माझ्याकडे लक्ष जायचं. मी पटकन् विचारायचो, ” इतकी छान चित्रं कशी काय काढता ?” ते नुसतेच हसायचे. “मी नाही काढत. विठोबाच रंगवून घेतो माझ्याकडनं.”. झालं. मला कमरेवरचे हात काढून, ब्रश घेवून चित्र रंगवणारा विठोबा दिसू लागायचा. नंतर कळायचं. त्यांनीच काढलेली अप्रतिम चित्रं मंदिरात लावली आहेत. त्यांचं म्हणणं पटायचं.
पंढरपुरातले दोन दिवस शून्य मिनिटात संपून जायचे. दोन दिवसात ईन्फाईनाईट टाईम्स, ईन्फाईनाईट रूपात विठोबा भेटायचा. जड पावलांनी टांग्यात बसायचं. स्टॅन्डवर पोचलो की नगरची गाडी तयारच असायची. टिंग टिंग. डबलबेल. खिडकीतून बाहेर लक्ष जायचं. “या पुन्हा पुढच्यावर्षी…” विठोबा हात हलवून निरोप द्यायचा. डोळ्यात चंद्रभागा दाटून यायची.
नंतर पुन्हा फारसं पंढरपूरला जाणं झालं नाही. आज ठरवून पासोड्या विठोबाला भेटलो. विठोबा ओळखीचा हसला.
“काय चाललंय ? झाले का पाढे पाठ ?” .मी जीभ चावली.
“बरं…बरं. असू देत.एकदा हेडआॅफीसला जावून या.”
“नक्की…”.मी पंढरपूरचं प्लॅनिंग करायला लागतो.
विठ्ठल ! विठ्ठल…||
© श्री कौस्तुभ केळकर नगरवाला
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈