श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ मैना खेर… अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

(महिना अखेर)

आमच्या लहानपणी मैना खेरने स्वत:चा असा दबदबा निर्माण केलेला होता. आम्हा भावंडांच्या कोणत्याही मागणीला आई बाबांचं एकच उत्तर यायचं, ” शू:$$, आता नाही हं! मैना खेर आहे.”

मग हळूहळू समजायला लागलं की, बाबांच्या पगाराच्या आधीच या मैना खेर मॅडम येतात. त्या फार कडक आहेत. त्या असल्या की पापडसुद्धा तळायची  परवानगी आईला नसते. मग भजी, वडे यांची बातच सोडा. कोणतंही वाणसामान आणायची मुभा नसते. अगदी खेळताना पडलो, धडपडलो तरी आईला आमच्या पडण्यापेक्षा मैना खेर असताना आम्ही का पडलो, याचंच दु:ख व्हायचं.

बाकी मैना खेर आहे म्हणून शाळा लवकर सुटण्याचं सुखही मिळायचं म्हणा.

मैना खेर आणि रद्दी, भंगारवाला यांचंही काहीतरी कनेक्शन होतं. हे लोक हमखास यावेळी चाळीत हजेरी लावायचे. घरोघरच्या होम मिनिस्टर कसोशीनं व्यवहार करायच्या. अगदी दहा-वीस पैसे मिळाले तरी केवढा आनंद झळकायचा त्यांच्या चेहऱ्यावर! 

महिन्याचा शेवटचा आठवडा हा मैना खेरबाईंच्या दहशतीचा असायचा.

कालांतराने पगाराची पेमेंटस् झाली. एक तारखेचा मुहूर्तही पेमेंटसाठी उरला नाही. घरातल्या चार माणसांचे पैसे महिन्याच्या वेगवेगळ्या आठवड्यात मिळायला लागले आणि मैनाबाई म्हाताऱ्या झाल्या.

व्यावसायिकांना तर त्यांचं काहीच वाटेनासं झालं.

माझ्या एका व्यावसायिक मित्राच्या यशाचा आनंद साजरा करायला आम्ही कुटुंबिय हाॅटेलमधे निघालो, ती तारीख सव्वीस होती. योगायोगाने माझी वृद्ध आई माझ्याकडे आलेली होती. तिलाही मी तयार व्हायला सांगितलं तर,

“अगं,काय ही उधळमाधळ? मैनाखेर असताना?” असं ती दहादा तरी कुरकुरली. असो.

आम्ही नाही तरी कोणी तरी आपल्याला अजून वचकून आहे या विचारानं मैनाबाईही गहिवरल्या असतील नक्कीच !!

या निमित्त काळाच्या ओघात अगदीच विस्मरणात गेलेल्या मैना खेरबाईंच्या आठवणी जागवल्या गेल्या. या बाई आपल्यातून केंव्हा निघून गेल्या हे कळलेच नाही. गेल्या काही दशकातील झालेल्या अनेक बऱ्यावाईट उलथापालथींपैकी ही एक घटना. 

बहुधा आजच्या तरुण मुलामुलींना या मैना खेरबाई भेटल्याही नसाव्यात किंवा दिवाळीला केले जाणारे फराळाचे पदार्थ, दिवाळीच्याच मुहूर्तावर केले जात होते, घरच्या सर्वांना वर्षातून एकदाच नवे कपडे घेतले जात होते, या गोष्टीची जाणीवसुद्धा होत नसेल.

लेखक – अज्ञात. 

प्रस्तुती : सुहास सोहोनी. 

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments