श्री अमोल अनंत केळकर

??

|| थोडं मनातलं – सलणारं, बोचणारं ||लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

दरवर्षी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी आम्ही अनेक विद्यार्थी घेऊन रायगडी जातो अन् गडावरचा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करुन खाली घेऊन येतो. या उपक्रमाचं हे सोळावं वर्ष होतं.. गेली पंधरा वर्षं हे व्रत आम्ही सगळे नित्यनेमाने करतो आहोत. माझे अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी यात आनंदानं सहभागी होत असतात. एक दीड महिना आधीपासूनच आमच्या या स्वच्छता अभियानाच्या तयारीची सुरुवात होते. मे महिन्यात आमच्यापैकी काहीजण गडावर येऊन नीट पाहणी करून जातात आणि मग अधिक कचरा जिथं जिथं असेल तिथून तो हलवण्याचं नियोजन सुरु होतं. सगळ्या नोंदी विद्यार्थ्यांचा गट करत असतो. मी फक्त निमित्तमात्र असतो. स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संस्कार याच वयात मुलांच्या व्यक्तिमत्वावर कोरला गेला तर त्याचे उत्तम परिणाम समाजात दिसून येतात. 

कोण आहेत ही मुलं मुली? ज्यांच्या पायाशी सगळी सुखं लोळण घेत आहेत, अशा कुटुंबातली ही मुलं. पण पुण्याहून निघून पायथ्यापासून ते वरच्या बालेकिल्ल्यापर्यंत प्लॅस्टिकच्या बाटल्या, त्यांची टोपणे, पिशव्या, फाटकी तुटकी पादत्राणे, प्लॅस्टिकचे चमचे, ग्लास, चहाचे कप, कागदी प्लेट्स, द्रोण, पत्रावळी अशा कितीतरी प्रकारचा कचरा गोळा करायचा, तो व्यवस्थित पॅक करून त्याची नोंद करायची आणि तो गडाखाली पाठवायचा हे काम तसं पहायला गेलं तर मुळीच सोपं नाही. “हे असलं काम मी का करु?” आणि “बाकी लोकं वाट्टेल तसे वागतात त्याचा कचरा मीच का उचलायचा?” असे प्रश्न मनात येऊ न देता काम करत रहायचं, हे किशोरवयीन गटासाठी कठीण असतं. दोन दिवस सफाई कामगाराच्या भूमिकेत राहण्यापेक्षा ॲडलॅब्स इमॅजिका’ला गेली असती तर कुणाला त्यात काहीही गैर वाटलं नसतं, अशा वयातली ही मुलं..! पण त्यांनी प्रेरित होऊन हे काम करावं, यातच खऱ्या महाराष्ट्रधर्माचं दर्शन घडतं..! 

रात्री पावणे दोन वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि महादरवाजा ओलांडून पहिली प्लॅस्टिकची बाटली उचलली ती पहाटे चार वाजता.. तिथून आमचे हात कचरा उचलण्यात जे गुंतून गेले ते शेवटची बॅग दुपारी बारा वाजता भरेपर्यंत अखंड काम करत होते..! आम्ही नेलेल्या बॅग्ज आणि पुन्हा वरती घेतलेल्या काही जम्बो बॅग्ज असा मिळून जवळपास तीन ट्रक खचाखच भरतील इतका कचरा गोळा करण्याचं काम आम्ही केलं..!

आपल्याकडं हे एक भारी असतं बघा. कचरा करणाऱ्यांनाही कुणी विचारत नाही अन् कचरा गोळा करण्याचं काम करणाऱ्यांचीही दखल कुणी घेत नाही. हजारो लोक गडावर होते, कुणी हुल्लडबाजी करत होते, कुणी तलवारी घेऊन नाचत होते, कुणी पारंपरिक पद्धतीच्या पोशाखात सजूनधजून आले होते. हौशे नवशे गवशे सगळे होते. पण, “चला, मीही तुमच्यासोबत काम करतो” असं एकही जण म्हणाला नाही. उलट, अनेकांना खरोखरच आम्ही सफाई कामगार वाटलो. त्यांनी शिट्टी वाजवून आम्हाला बोलावलं अन् त्यांच्या उष्ट्या खरकट्या पत्रावळी उचलायला लावल्या..! आदल्या दिवशी गडावर कुणीतरी पॅक फूड वाटलं होतं. ते उष्टं, सडलेलं, माशा घोंगावणारं जेवण जागोजागी तसंच पडलेलं होतं. कुणीतरी एक गृहस्थ आम्हाला “अरे मुलांनो, ते खरकटं अन्न सुध्दा उचला रे” असं सांगत होते. त्यांच्या हातात बिस्किटांचा पुडा होता. आम्हाला सांगताना त्यांनी बिस्किटे खाल्ली अन् रिकामा प्लॅस्टिकचा कागद तिथंच टाकून निघून गेले…! 

दोन जण तटावर बसून दाढी करत होते. इतक्या उंचावर येऊन थंडगार हवेचा आनंद घेत घेत दाढी करणं म्हणजे सुख असणार.. दाढ्या आटोपल्यावर उभयतांनी आपापली रेझर्स तटावरून खालच्या दरीत फेकून दिली..! 

आर ओ’चा प्लांट होळीच्या माळावर बसवण्यात आला होता. काही महाभाग ते पाणी घेऊन आडोशाला जाऊन पोट रिकामं करण्यासाठी वापरत होते. चार-पाच जणांनी आर ओ’चं पाणी बादल्यांमध्ये भरुन घेतलं आणि हत्ती तलावापाशी जाऊन चक्क आंघोळी केल्या..! 

आपल्या समाजातल्या लोकांच्या बुद्धीची आभाळं अशी फाटलेली आहेत. कुठं कुठं आणि किती ठिगळं लावायची? 

“एक जमाना असा होता की, आम्हाला हीच कामं हे लोकं करायला लावत होते, आता यांच्यावर ही वेळ आली” असं म्हणून एकमेकांच्या हातांवर टाळ्या देऊन छद्मीपणानं हसणारं सुध्दा एक टोळकं आमच्या मागं होतं. मी फक्त ऐकत होतो. पण मागं वळून पाहत नव्हतो. सावरकर, टिळक, पेशवे अशा अनेक विशिष्ट लोकांविषयी येथेच्छ टिंगलटवाळी चालली होती. माझे डोळे लाल झाले होते, पाण्यानं भरले होते. “आज कचरा उचलायला लावलाय, उद्या नासवलं पाहिजे”, हे शब्द कानांवर पडले, मग मात्र मी मागं वळून त्यांच्याकडं बघितलं. डोळ्यांत डोळे घालून बघितलं. अठरा वीस वर्षं वयाची पोरं होती ती. माझा चेहरा बघूनच त्यांच्या पोटात कळ आली असावी. पुढच्या क्षणाला तिथून सगळे पळून गेले..! असो. 

यावेळी आमच्या गटानं केवळ गडाची स्वच्छताच केली असं नाही. गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या दहा कातकरी कुटुंबांसाठी आम्ही भरपूर साहित्य गोळा करुन आणलं होतं. कपडे, भांडी, खेळणी, धान्य, तेल, चहा- साखर, धान्य साठवण्यासाठी डबे, पाणी साठवण्यासाठीचे बॅरल असं पुष्कळ साहित्य तिथल्या परिवारांना दिलं. जवळपास दोनशे किलोहून अधिक धान्य दिलं. त्यात गहू, ज्वारी, तांदळाची पोती, तूर आणि मुगाची डाळ, तिखट, मीठ, हळद, जिरे, मोहरी असं सगळं सामान होतं. जवळपास पन्नास कुटुंबाकडून मुलांनी हे सगळं गोळा केलं होतं. कपड्यांमध्ये साड्या होत्या, पुरुषांसाठी शर्ट्स, पँट, जीन्स, टी शर्ट, रेनकोट, मोठ्यांसाठी स्वेटर्स, लहान मुलांसाठी कपडे आणि स्वेटर्स, बेडशीट्स, चादरी, ब्लँकेट्स, सतरंज्या असं सामान दिलं. हे गोळा करण्यासाठी मुलं घरोघरी फिरली. लोकांनीही मुलांना चांगला प्रतिसाद दिला. या सगळ्या मुलांच्या पालकांनी यात आर्थिक बाबतीत सक्रियता दाखवली. 

चाळीस-चाळीस वर्षं वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही अशा दुर्गम भागात ही कुटुंबं राहत आहेत. कुणाही राजकीय नेत्याला त्यांच्याकडं बघायला सवड नाही. आता ऑगस्ट महिन्यात या दहा कुटुंबांसाठी आम्ही सोलार दिवे घेऊन जाणार आहोत, असा संकल्प केला आहे. इच्छा तेथे मार्ग…! आमच्या या संकल्पाला नक्की यश येईल. 

आज रायगडाचे तट अन् खालचे कडे प्लॅस्टिकनं भरून गेले आहेत. प्रचंड कचरा पडला आहे. तो भारतीय नागरिकांनीच केला आहे, यात शंका नाही. मराठी साम्राज्याची राजधानी प्लॅस्टिकच्या विळख्यात अडकत चालली आहे. रायगडाचं पक्षीजीवन, वन्य प्राणीजीवन दिवसेंदिवस खराब होत चाललं आहे. कुणाचंच तिकडं लक्ष नाही. येणाऱ्या कुणालाही त्याविषयी आस्था नाही. (रायगडावर सावली देणाऱ्या झाडांची नितांत गरज आहे. पुरातत्व खात्याच्या नियमांनुसार कदाचित जमिनीत झाडं लावता येणार नाहीत. पण मोठमोठ्या आकाराच्या आकर्षक कुंड्यांमध्ये निश्चित लावता येतील. महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांना सोबत घेऊन हा विषय उत्तम करता येईल. पण इच्छाशक्ती नाही.)  ‘भ’ आणि ‘मा’ च्या भाषेत बोलणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी नाही.  माणसांना ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी वावरण्याचं भान नसतं, हेच सत्य आहे. हा केवळ कपड्यांच्या बाबतीतल्या आचारसंहितेचा मुद्दा नाही. आपली वाणीसुध्दा नियंत्रित असणं आवश्यक आहे. पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी यातला फरक आजही लोकांना कळत नसेल तर,आजवरचं सगळं औपचारिक शिक्षण निरुपयोगीच आहे,असं मान्य करावं लागेल. नियमांच्या पाट्या लावून उपयोग होत नाही, किंवा दंड करुन उपयोग होत नाही. “स्वयंशिस्त” आणि “तारतम्य” हे दोन गुण अविरतपणे शिकवत राहण्याची गरज आहे. महाराजांच्या गडकोटांची आजची परिस्थिती चिंताजनक असली तरीही, स्वतः छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नीतीचं समग्र दर्शन घडवणारं आज्ञापत्र मात्र आजही उपलब्ध आहे. 

शिवाजीमहाराजांचं आज्ञापत्र हा केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नाही. तो प्रत्यक्ष आचरण करण्याचा विषय आहे. आज्ञापत्र शाळांमधून मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. त्याचा अभ्यास मुलांनी केला पाहिजे. आज्ञापत्राचे प्रशिक्षण वर्ग, अभ्यास वर्ग झाले पाहिजेत. मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रावर आधारित ज्ञान परिक्षा महाराष्ट्रात सुरु व्हायला हवी. कारण, त्यातून शिकावं असं प्रचंड आहे. 

लिहिण्यासारखं खूप काही आहे. व्यक्त करण्यासारखे अनुभव खूप आहेत. पण व्यक्त होण्यालाही शेवटी चौकट असतेच. ज्याला बदल घडवून आणण्याची इच्छा आहे, त्यानं अखंड कृतिशील राहिलंच पाहिजे. 

“आचारशीळ विचारशीळ | दानशीळ धर्मशीळ | सर्वज्ञपणें सुशीळ | सकळां ठायीं ||” असं शिवाजीमहाराजांचं वर्णन आहे. त्याचंच आचरण करण्याची गरज आहे. 

|| अधिक काय लिहावें, सर्व सूज्ञ आहेति ||

|| मर्यादेयं विराजते ||

लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

संग्राहक : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments