श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

(— म्हणून ‘एखादी तरी स्मितरेषा…’ असे म्हणावे लागते.) इथून पुढे —-

पण आपण जर खळखळून हसलो तर त्याचे अनेक फायदे होतात. चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळून चेहरा प्रसन्न दिसतो. हृदय, फुफ्फुसानाही अधिक प्राणवायू मिळतो, व्यायाम होतो. असं म्हणतात की चालणाऱ्याचं नशीब चालतं, बसणाऱ्याचं नशीब बसून राहतं. त्याच धर्तीवर हसणाऱ्याचं नशीबही हसतं, रडणाऱ्याचं नशीबही रडतं असं म्हणायला हरकत नाही. हसतमुख असणारी माणसं संकटांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात. 

नॉर्मन कझिन्स या नावाचा एक पत्रकार होता. तो एका दुर्धर आजाराने बिछान्याला खिळून होता. रुग्णालयात त्याच्यावर अनेक प्रकारचे उपचार सुरु होते. अनेक प्रकारची वेदनाशामक औषधें घ्यावी लागत होती. त्याशिवाय त्याला झोप लागत नव्हती. एक दिवस त्याने चार्ली चॅप्लिनचा चित्रपट बघितला. तो खळखळून हसला. त्याला असे आढळून आले की त्या दिवशी त्याला वेदनाशामक औषधांशिवाय झोप लागली. मग त्याने विनोदी साहित्य वाचायला सुरुवात केली. औषधोपचारांच्या जोडीला रोज तो खळखळून हसू लागला आणि काय आश्चर्य ! काही दिवसांनी तो पूर्ववत बरा झाला. त्याची वेदनाशामक औषधे थांबली. तो पूर्ववत सगळी कामे करू लागला. आपल्या अनाटॉमी ऑफ इलनेस या पुस्तकात त्याने ही सगळी माहिती लिहून ठेवली आहे. त्याला असे आढळून आले की आपण जेव्हा हसतो तेव्हा आपल्या शरीरात एन्डॉर्फिन नावाचा एक स्त्राव स्त्रवतो. हे एन्डॉर्फिन वेदना शांत करण्याचे कार्य करते. मनाची मरगळ दूर करते आणि आपल्याला ताजेतवाने वाटते. खळखळून हसण्याने रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण वाढते. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ सिगमंड फ्राईड यांनीही हसण्याचे फायदे सांगताना हसण्यामुळे मनातील राग, द्वेष, ताण तणाव यासारख्या नकारात्मक भावना नष्ट होतात असे म्हटले आहे. हसण्याबद्दल लिहिताना नॉर्मन कझिन्स म्हणतो, ‘ हसणं हे एखाद्या ब्लॉकिंग एजंटसारखं आहे. ते जणू बुलेटप्रूफ जाकीट आहे. नकारात्मक भावनांपासून ते तुमचं रक्षण करतं. ‘ 

विनोदी चित्रपट, विनोदी नाटके यांना लोकांची कायमच पसंती असते ती यामुळेच. तास दोन तास खळखळून हसल्याने मनातली मरगळ निघून जाते, नकारात्मक भावनांचा निचरा होतॊ आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागते. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, मार्क ट्वेन यांच्यासारख्या लेखकांचे विनोदी साहित्य म्हणजे अक्षय आनंदाचा ठेवा आहे. मधुकर तोरडमल हे विलक्षण ताकदीचे कलाकार होते. त्यांच्या ‘ तरुण तुर्क म्हातारे अर्क ‘ या नाटकातील ‘ ह हा हि ही ‘ ची बाराखडी कमालीची मजा आणते. त्यातून वेगळा विनोद, वेगळा अर्थ निर्माण होतो. प्रत्यक्ष जीवनातही आपल्याला या ‘ ह ‘ च्या बाराखडीचा वापर करणारे पुष्कळ लोक भेटतात. त्यांचं बोलणं ऐकताना मोठी मजा येते. प्रसंगी स्वतःच्या चुकांवरही हसता आले पाहिजे. अशी माणसे मनाने निर्मळ असतात. 

पूर्वी आमच्याकडे एक दूधवाला दूध घालण्यासाठी यायचा. तो ‘ दूध घ्या ‘ म्हणायच्या ऐवजी त्याच्या खर्जातल्या आवाजात  ‘ चला, भांडं घ्या ‘ असं म्हणायचा. मला त्याची खूप गंमत वाटायची. आमच्याकडे भांड्याधुण्यासाठी येणाऱ्या बाई बाहेरच उभ्या राहून फक्त ‘ ताईsss ‘ असा आवाज देतात. मग आपण समजून घ्यायचं की त्यांना भांडीधुणी करायची आहेत. कधी कधी एखाद्या ठिकाणी स्फोटक किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि अशा वेळी कोणी एखादा हलकाफुलका विनोद केला तर वातावरणातील तणाव लगेच निवळायला मदत होते. आमच्या शाळेत घडलेला एक किस्सा आहे. एकदा वार्षिक परीक्षा सुरु असताना झालेल्या पेपर्सचे गट्ठे तपासण्यासाठी शिक्षकांना वाटप करण्यात येत होते. विद्यार्थी आणि वर्गसंख्या वाढल्याने एका शिक्षिकेला तपासण्यासाठी जास्त पेपर्स दिले गेले. साहजिकच त्या चिडल्या. तेथे असणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि त्यांचे दोन दोन शब्द झाले. वातावरण तापले. त्या शिक्षिका रागाने त्या अधिकाऱ्याला विचारू लागल्या, एवढे पेपर्स मी कसे तपासायचे ? ‘ एक ज्येष्ठ पण मिश्किल शिक्षक तिथे हजर होते. ते म्हणाले, ‘ लाल पेनने तपासा…’ आणि एकदम हास्याचा स्फोट झाला. तणावपूर्ण वातावरण क्षणात निवळले आणि गंमत म्हणजे त्या शिक्षिकाही हास्यात सामील झाल्या. 

हसण्याची क्रिया ही अशी एक क्रिया आहे की ज्यामध्ये आपल्या मेंदूचा डावा आणि उजवा भाग एकाच वेळी काम करतात. आपण ऐकलेली गोष्ट किंवा वाचलेली गोष्ट मेंदूचा डावा भाग समजून घेतो. उजवा भाग ती गोष्ट गंभीर आहे की विनोदी याची छाननी करतो. विनोदी गोष्ट असेल तर आपल्याला हसू येते. अशा रीतीने शरीराचे सर्व अवयव जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा ते काम उत्तम होते. व्यायाम, हसणे, चालणे यासारख्या गोष्टीत आपल्या शरीरातील सर्व अवयवांचा सुरेख समन्वय घडतो. आरोग्यासाठी जसा उत्तम आहार आणि व्यायाम महत्वाचा तसाच निरोगी मनासाठी हास्योपचारही महत्वाचा. 

सखी शेजारिणी तू हसत राहा या गीतात ते सखी शेजारणीला उद्देशून म्हटले असले तरी ते आपल्या सगळ्यांसाठी पण आहे असे समजायला हरकत नाही. ‘ प्रकाशातले तारे तुम्ही ‘ या कवितेत कवी उमाकांत काणेकर म्हणतात, ‘ रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. ‘ पुढे ते म्हणतात, ‘ सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता…’ खरंच मागचा सगळा गुंता, समस्या टाकून देऊन हसता आले पाहिजे म्हणजे ‘ आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा ‘ अशी स्थिती प्राप्त होईल. 

– समाप्त – 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments