सुश्री मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ “टेक ऑफ…” – लेखक : श्री उमेश कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
हा टेक ऑफचा क्षण लांबून बघताना मला तरी आतून कुठून तरी भारावून जायला होतं… माझ्या नकळत ‘माझा भारत देश’ हा अभिमान उचंबळून येतो… आतून भरुन येतं… डोळे ओले होतात…
माझं जर हे असं होत असेल तर या प्रोजेक्ट मधे गेली तीन चार वर्षे अव्याहतपणे झोकून देऊन काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना, अभियंत्यांना काय होत असेल…
एका बाजूला १४५ कोटी लोकांकडून अपेक्षांचं ओझं… दुसरीकडे अतिशय क्लिष्ट आणि वेगवेगळ्या विषयांवरचे इंजिनियरिंग … इंजिनियरिंग स्ट्रीम्सचं इंटरलिंकींग… विविध तऱ्हेच्या मानसिकतेंचं सिन्क्रोनायझेशन… एकमेकांशी इंटरफेसिंग… स्वतःच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या, घरगुती जबाबदाऱ्या… वेळोवेळी येणारे अप-डाऊन्स, प्रॉब्लेम्स, प्रेशर्स… वगैरे वगैरे… सांभाळणं आणि जमवून घेणं !
आणि हे सगळं सांभाळून अखेरीस हा निरोपाचा… टेक ऑफचा क्षण येतो…
लॉन्चिंग पॅड तयारच असतं… सगळं सेटिंग झालेलं असतं… काऊंट डाऊन सुरु होतं… फ्यूएलिंग होतं… कंट्रोल रुममध्ये एक अनामिक शांतता असते… फक्त रिपोर्टिंगचे आवाज ऐकू येत असतात… ‘सिस्टीम इनिशिएटेड’…. ‘सिस्टीम ॲक्टिव्हेटेड’… ‘ऑल चेक्स नॉर्मल’… तरीही सर्वांचे चेहरे दडपणाखाली असतात… आपापल्या पद्धतीने प्रार्थना सुरु असतात… काऊंट डाऊन संपत आलेला असतो… आणि झिरो होतो…
इग्निशन ॲक्टिव्हेट होतं… अग्निचे लोळ उसळतात… आणि सगळे बंध तडातड तोडून ते निमिषार्धात आकाशात झेपावतं…. सरसर वेगानं पुढं पुढं झेपावत… पहिली स्टेज ओलांडत दुसऱ्या स्टेजमधून तिसऱ्यात जातं… क्रायोजेनिक इंजिन सुरु होतं आणि मग ते ठरवून दिलेल्या ट्रॅजेक्टरीत स्थापित होत होत ठिपका ठिपका होत दिसेनासं होतं आणि मग इकडं कंट्रोल रुममध्ये उरतं फक्त समोरच्या स्क्रीनवर एक ट्रॅजेक्टरी आणि त्यातून पुढे पुढे सरकणारा एक इवलासा ठिपका… हे एवढंच काय ते त्याचं अस्तित्व…
सगळ्यांचे चेहरे हलके होतात… थोडं थोडं हसू तिथं उमलायला लागतं… एकमेकांचं अभिनंदन केलं जातं…
एवढं आपण केलेलं आज लाखो किलोमीटर लांब निघालेय… लांबचा पल्ला आहे… ते तिथं लांब आणि आपण इथं बसून त्यावर नियंत्रण ठेवायचं… कसं जमत असेल ना हे सगळं ?
या सगळ्या मंडळींना ग्रेट म्हणायलाच हवं…
आणि मग याच क्षणी त्यांना ‘पूर्णत्वा’चा अनुभव मिळत असेल ना !
पूर्णात पूर्ण ते हेच असणारेय !
एकदा त्या शास्त्रज्ञांना भेटून हे विचारायलाच हवे…
खात्री आहे, ते हेच सांगतील…
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते…
लेखक : श्री उमेश कुलकर्णी
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈