श्री सदानंद आंबेकर
मनमंजुषेतून
☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –3 ☆ श्री सदानंद आंबेकर☆
१७ जून :: नदी तटावर – नीरा गाव : अंतर ७.४४ कि. मी.
रोजच्यापेक्षा आज आम्हांला थोडी सवलत मिळाली कारण आजचे आमचे अंतर फार कमी होते। येथे वाल्हे नावाच्या गावांत माऊलींची पालखी विश्राम घेते. पण आमचा मुक्काम नीरा गावात एका खूप मोठया शाळेत होता। फार मोठे भवन आणि अतिशय मोठं पटांगण। आत्तापर्यत आपापसांत ओळखी झाल्या होत्या त्याचा फायदा आम्हाला आज झाला। आमच्या दिंडीतील एका वारकरीताईचे माहेरघर त्या गावात होते, दिंडीची परवानगी घेऊन आम्ही काही जण तिथे राहिलो. आज विशेष थकवा नव्हता। संध्याकाळी प्रथेनुसार हरिपाठ व जेवण झाले। आज तर मोठयाश्या अंगणात झोपायची छान सोय होती। दुसरे दिवशी गावातल्या नीरा नदीत माउलींचे स्नान होते. त्यामुळे पालखीचे दर्शन, त्यांच्या अश्वांचे दर्शन आणि स्नानाचा सोहळा पहायला मिळाला।
१८ जून :: पुढील टप्पा लोणंद : अंतर ६.३१ कि.मी.
आजपण लोणंदपर्यंतचे अंतर अगदी कमी होते। आता चालण्याची इतकी सवय झाली होती की दहा बारा किलोमीटर अगदी सोपं वाटायचं। तिथे रेल्वे स्थानकाजवळ कांदेबाजारामधे सर्व दिंडयांचे मुकाम होते। येथे आज विशेष जेवण होते। स्वादिष्ट पुरण पोळी आणि सोबत आमटी। मन भरून जेवण झाले. मग मुंबईचे प्रसिध्द अभंग गायक श्री शंतनु हिर्लेकर यांचे, तबला संगतकार श्री प्रशांत पाध्ये यांच्या साथीने गायन झाले, यांनी शेवटी ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ‘ आणि महालक्ष्मीची कानडी स्तुती – ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा‘ ही अत्यंत सुरेख गायली, त्या नंतर हरिपाठ व प्रवचन सेवा। येथे आम्हाला माउलींच्या रथाचे चोपदार यांचे पण दर्शन झाले। त्यांच्या श्रीमुखातून वारीबद्दल ज्ञान मिळाले। येथे एक विशेष सोय पहायला मिळाली– पाणी बॉटलवाले लोक भरलेले खोके घेऊन आमच्या जवळ पाणी विकायला येत होते। गर्मी खूप असल्यामुळे त्यांची विक्री पण भरपूर झाली। १९ जूनला येथे विश्राम होता।
२०जून :: आता तरडगांव : अंतर २०.45 कि.मी.
इथपासून चालायचे अंतर पुन्हा वाढले होते. पण आता कसे झाले होते की १५-२० किमी ऐकलं की असं वाटायचं ‘ बस….. इतकंच अंतर ? ‘ आज मागच्या गावातून चालून आल्यावर मधेच एक नवीन अनुभव येणार होता। आज चांदोबाचा लिंब नावाच्या ठिकाणी रिंगण होणार होतं। मी पण वेळापत्रकात हे वाचले होते पण अर्थ काही समजला नव्हता. ते आज प्रत्यक्ष पहायचा मौका आला होता। त्या ठिकाणी आम्ही सकाळी साडेदहा वाजताच पोहोचलो. पण जिथे हे रिंगण होणार होतं तिथे खूप गर्दी होऊन गेली होती। आम्ही पण वाट पहात बसलो। अखेरीस, साडेतीन वाजण्याच्या सुमारास एकदम गर्दी वाढली अन् त्यानंतर हा सोहळा सुरू झाला। यात दोन अश्व सरळ मार्गावर धावतात. त्यात एकावर स्वार असतो नि दुसरा अश्व एकटाच असतो. असे मानतात की त्यावर स्वतः माऊली असतात। दोघे अश्व खूप जोरात धावतात, दोन चकरा मारतात अन् माउलींचा अश्व पुढे निघून जातो। हा सोहळा पाहिल्यावर पालखी पुढे निघाली नि आम्हीपण पुढील मार्गावर चालू लागलो। तरडगांव हे लहान खेडयासारखं गाव, तिथे थांबायची शाळा मेनरोड वर होती। शाळेची वास्तु अगदी जुनाट होती अन त्याचं बांधकाम चालू होतं। या वेळी इथे पुरुषांकरिता राहुटी म्हणजे टेंटमधे राहायची सोय होती. पण नंतर जागा कमी पडल्याने समोर एका डॉक्टरकडे त्याच्या गैरेजमधे सोय झाली। आज रात्री जेवणांत एकदम नवीन पदार्थ होता तो म्हणजे पाव भाजी।
उद्या खूप चालायचं होतं म्हणून गैरेजसमोर अंगणात सगळयांनी आपले बिछाने लावले व झोपी गेलो। हेच ते पहिलं ठिकाण जिथे पुढल्या दिवशी जीवनांत पहिल्यांदा प्लास्टिकच्या मोबाइल शौचालयांत जावं लागलं। पण हे पूर्वीच्या तांब्या नाहीतर बाटली घेऊन शेतांत किंवा रस्त्याच्या काठी अंधारात जाण्यापेक्षा सोईचं होतं। असो, हा ही एक नवा अनुभव। बस भीती ही वाटायची की
कुठं स्वच्छ भारतवाले कार्यकर्ते आम्हाला पकडू नयेत.
२१ जून :: ऐतिहासिक स्थळ फलटण : अंतर २५ .६४ कि.मी.
आज सकाळी का कुणास ठाऊक, पण सगळे दिंडी-यात्री अंधार असतांनाच म्हणजे सूर्योदय होण्याआधीच मार्गी लागले। आम्ही पण चालताचालता सूर्योदय पाहिला। फलटणपर्यंत उन्हाचे चटके तर सहन केले, पण आजची विश्रांतीची जागा म्हणजे मुथोजी महाविद्यालय शोधता शोधता फार थकवा आला। प्रत्येक माणूस त्याला विचारलं की वेगळाच रस्ता सांगायचा। त्यातच पालखी येत असल्या- -मुळे रस्ताभर खूप गर्दी होती। कसेतरी आपल्या स्थळावर पोहोचलो। हेही खूप मोठे संस्थान होते। फलटण शहरसुद्धा मोठं ठिकाण आहे। तिथे शिवरायांचे सासरघर आहे। एक मोठ्ठा महाल, अनेक प्राचीन देवळं आदि असल्याचे कळले, पण वेळ कुठे होता। इथे एक दोन इतर दिंड्या अन् एन सी सी चे कैडेट्स थांबले असल्यामुळे कॉलेजच्या पटांगणातसुध्दा भरपूर लोक झोपले होते। सकाळी पुन्हा पी वी सी चे पोर्टेबल शौचालय–ते पण चांगले लांब लावले होते,अन् नंतर टैंकरखाली पाण्याच्या बॉटलने आंघोळ, कारण आपली बादली अजून कुठे तरी असायची ! नंतर स्वल्पाहार घेऊन पुढची यात्रा सुरू केली। आज पण खूप लांब चालायचे होते, अन् आता अर्धी यात्रा झाल्यामुळे लोकांनी उरलेल्या वेळेचा हिशेब करायला सुरवात केली होती।
– क्रमशः भाग तिसरा…
© सदानंद आंबेकर
भोपाळ, मध्यप्रदेश
मोब. 8755756163