श्री सदानंद आंबेकर
मनमंजुषेतून
☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –5 ☆ श्री सदानंद आंबेकर☆
२७ जून :: झाला जन्म सुफळ– झाले विठ्ठलाचे दर्शन – पंढरपुर : अंतर २२.३१ कि. मी.
आता तो दिवस उजाडला ज्याची प्रतीक्षा मला होती। खूप वर्ष आधी विद्यार्थी जीवनांत पंढरपुरला आलो होतो. पण आजची वेळ एकदम विशिष्ट होती। वारीचा अर्थ आम्हाला पहिल्या दिवशी सांगितला गेला होता, तो म्हणजे ‘ प्रतिकूलतेतून अनुकूलता शोधणे।’ आध्यात्म क्षेत्रात यालाच तितिक्षा, (तपस्या नाही बरं का) असे पण म्हणतात। तर इतके श्रम करून आज देवदर्शन होणार हे खास होते। आज आम्ही भंडीशेगाववरून काल जसे आलो तो मार्ग न धरता, गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे थेट पंढरपुर येईल असा रस्ता धरला। इथे गर्दी पण अजिबात नव्हती अन् सडक पण खूप छान पक्की होती। आसपास उसाची शेते, द्राक्षांचे बगीचे, टयूबवेलची स्वच्छ जलधार हे सगळं बघत सुमारे अकरा वाजता पांडुरंगाच्या नगरीत आलो।
आमच्या वेळापत्रकाप्रमाणे २७ते ३० ता.पर्यंत पंढरपुरला राहता येणार होतं. पण एक दिवसानंतर एकादशी होती. तेव्हा येथे लक्षावधी लोक असतील तर देवाचे दर्शन तर नाहीच, पण कळस दर्शनसुध्दा कठीण होणार होते. म्हणून आम्ही आजच देवळात जायचे ठरवले। यात्रा सूचनांप्रमाणे मला माहिती होते की वारकरी फक्त कळस – दर्शन करतात. पण आज तर कमी गर्दी असल्यामुळे देवळात जाणं शक्य होतं।
शहरात खूप आत जाऊन जेव्हा पहिल्यांदा देवळाच्या नावाचा बोर्ड लांबूनच दिसला तेव्हा माझी जी मनःस्थिति झाली ती शब्दात सांगू नाही शकणार। मला असे वाटले की मी काय करू शकलो। पुण्याहून पंढरपूरपर्यंत पायी – हे सत्य आहे ?????? असं वाटलं की मी काय प्राप्त केलं, काय मी एवरेस्टवर पोहोचलो ? मी हे करू शकलो तर ते कसं इत्यादि !! नंतर आम्ही लांबून जे मुखदर्शन होते ते करायचं ठरवलं कारण प्रत्यक्ष दर्शनाकरिता खूप तास लागतील अशी सूचना मिळाली। सुमारे दीड किमी लांब रांगेत उभे राहिलो. पण हे चांगलं होतं की ती रांग सतत चालत होती. त्यामुळे ठीक एक तासात आम्ही देवळाच्या आत होतो। प्रचंड गर्दीचा दाब असल्यामुळे क्षणार्धात आम्ही तिघांनी दर्शन घेतलं. पण विठ्ठलाच्या देवळात मला शिपायानी जो धक्का मारून बाहेत केलं त्यामुळे पहिल्यांदा मी देव प्रतिमा बघूच शकलो नाही. मग बाहेर आल्यावर माझ्या ताईनी पुन्हा आत जायला सांगितले। दारातून उलटं जाणं फार कठीण होतं. पण देवकृपा झाली, एका सेकंदाकरिता गर्दी एकदम थांबल्यासारखी झाली, दार मोकळे होते. मी पटकन् आत शिरलो आणि देवाचे अगदी मन भरून दर्शन घेतले आणि नंतर रखुमाईच्या देवळांत दर्शन घेतले।
बाहेर आल्यावर प्रसादाच्या वस्तू, आणि लोकांना आठवण म्हणून द्यायला देवप्रतिमा इत्यादि घेतल्या। देवळात आत काहीच नेणं शक्य नाही म्हणून हे सगळं नंतर घ्यावं लागलं। आता मन एकदम तृप्त होते। एक फार मोठं लक्ष्य प्राप्त केलं असा भाव मनात होता।
या नंतर आम्ही आमच्या आजच्या ठिकाणावर गेलो। ही पण एक भली मोठी शाळा होती. तेथे आमच्याशिवाय इतर अनेक दिंडया आल्या होत्या। संध्याकाळ व्हायला लागली होती नि काही वारकरी परतीच्या प्रवासावर निघत होते। आम्ही पण आपलं सामान व्यवस्थित एकत्र जमवून घेतलं, कारण आज रात्री आमची पण मुंबईकरिता गाडी होती। वेळ होती हरिपाठाची, त्याप्रमाणे सौ माईनी हरिपाठ घेतला आणि आता वेळ होती सगळयांशी बिदाई घ्यायची। किती तरी उच्चशिक्षित, उच्च पदस्थ वारकरी आले होते पण त्यांचं दोन हप्त्यांचं हे प्रेम, ती चोवीस तासांची साथ, आता कसं वेगळं व्हायचं ?? भरलेल्या मनानी मी सर्वाना भेटलो, वाटलं आपल्या आप्तजनांपासून लांब होतो आहे। सौ माईसाहेबांनी प्रसाद दिला, दिंडी प्रमुखांचा निरोप घेतला। आमच्या दिंडीत एक गृहस्थ सिडनीहून आले होते. त्यांना भेटलो तर त्यांनी सिडनी ला यावे आणि त्यांच्या घरीच थांबायचं असा प्रेमळ आग्रह केला। इतरांनीसुध्दा आपापल्या गावी यायचे आमंत्रण दिले। दिंडी व्यवस्थापन टीमच्या सर्व बंधुंना भेटून सर्वात शेवटी त्या शाळेला नमस्कार करून आम्ही स्टेशनकडे प्रस्थान केले।
शेवटी :: माझे मनोगत :
या यात्रेत काही गोष्टी मला आढळल्या, त्यांचा उल्लेख येथे करणे म्हणजे निंदा किंवा दोषदर्शन करणे नव्हेच.पण वारीसारख्या पवित्र कार्याच्याबाबतीत यात सुधारणा झाली तर उत्तम। रस्त्यात जिथे-जिथे गावात अन्न-जल आदिचे मोफत वाटप व्हायचे, तिथे दिसणारा प्रचंड कचरा, लोकांनी एक घास खाऊन फेकून दिलेल्या भरलेल्या पत्रावळींची घाण, हा अन्नाचा अनादर, जागोजागी रिकाम्या, अर्ध रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा कचरा, केळाची सालं, हे पाहून वाटायचं की हे सगळं आपण व्यवस्थित नाही करू शकत का ? दुसरे असे की तीर्थयात्रेमधे चालत असतांनासुध्दा तंबाखू आणि बीडी सिगरेटचा प्रचंड वापर… तो टाळू शकत नाही का ?
ज्या मार्गावरून माऊलींची पालखी येत आहे त्यावर सगळीकडे तंबाखूची पिचकारी असावी का? आमच्या दिंडीत सुध्दा मी एका वारकऱ्याला सिगरेटचा वापर करतांना बघितले। निदान दोन हप्ते तरी हे बंद ठेवावे, हे विचारणीय नाही का ? पुढे असे की पूर्ण प्रवासात प्रत्येक गावात मांसाहार आणि परमिट रूम ची सोया असणारी खूप हॉटेल्स दिसली। देवकृपेने मी भारतात खूप यात्रा केल्यात. पण ज्या प्रमाणात इथे ही सामिष हॉटेल दिसली तितकी इतर कुठे नाही दिसली. असं नाही की तिथं मांसाहार किंवा मद्यपान मुळीच होत नाही, पण इथे प्रमाण जास्त दिसलं। आपली संस्कृति तर देवदर्शनाच्या वेळी कांदा लसूण सुध्दा वर्ज्य करते- पण असो, ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे। मी नुसते जे पाहिले ते व्यक्त केले. आलोचना करण्याचा माझा हेतु अजिबात नाही। क्षमस्व !!
पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे तीर्थयात्रा, पुण्याईची संधी, सेवा-साधना करायची वेळ, असे मला वाटले। आता पुढल्या वर्षी मला जायला मिळते की नाही हे आज सांगणे कठीण आहे. पण या वेळेचा मधुर स्मृतींचा सुवास जीवनात दरवळत राहणार हे मात्र नक्की। दिंडीमधला तरुण वय ते सत्तर अधिक वर्षाच्या वारकऱ्यांचा स्नेह सतत मला जाणवत राहणार। ज्याला जमेल त्याने एकदा तरी हा अनुभव घ्यावा असा माझा विचार।
मी हे जे लेखन केले ते फक्त यात्रेची विस्तृत माहिती इतरांना मिळावी, आणि आठवणींचा संग्रह असावा याकरिता। लेखन किंचित मोठे झाले आहे, पण हा मोठ्ठा अनुभव कमी शब्दात तरी कसा लिहून होऊ शकणार? माझी मराठी येवढी उत्कृष्ट नाही, कारण मी मराठी असलो तरी, तीन पिढ्यांपासून हिंदी प्रांतातच माझे वास्तव्य झालेले आहे. तरी एक छोटासा प्रयत्न केला आहे तो गोड मानून घ्यावा ही विनंती। वर दिलेले रस्त्यांचे अंतर माझ्या गूगल एप चे आहेत, ते फक्त सांकेतिक मानावे।
वारीच्या पहिल्या दिवशी आळंदीत सौ माईंनी म्हटलेच होते की ‘ही यात्रा म्हणजे ईश्वराची, गुरुची कृपा, आई वडिलांची पुण्याई‘… म्हणून परमपिता विठ्ठल-रखुमाई, सर्व सहवारकरी बंधु भगिनी आणि ‘ संत विचार प्रबोधिनी दिंडी ‘ चे खूप आभार। ईश्वर आपणा सर्वांना खूप प्रसन्न, स्वस्थ आणि सुखी ठेवो ही प्रार्थना।
पुन्हां भेट होईल या आशेसोबत—नमस्कार।
जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरि।
इति——
– समाप्त –
© सदानंद आंबेकर
भोपाळ, मध्यप्रदेश
मोब. 8755756163