श्री सुनील देशपांडे
मनमंजुषेतून
☆ “कृष्ण चिंतन…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म. हा कुणा व्यक्तीचा जन्म नाही. किंबहुना व्यक्तीच्या निमित्ताने नवाच एक विचार पुढे आला आहे. व्यक्ती काल्पनिकही असू शकेल. पण व्यक्तीपेक्षा तो विचार खरा आणि महत्त्वाचा आहे. त्याचे तत्वज्ञान आणि त्याचे चरित्र यातून हा विचार आपल्यापुढे मांडता येतो असे मी मानतो.
लहानपणी श्रीकृष्णाने इंद्राच्या पूजेला विरोध करून गोवर्धनाची पूजा, गाई वासरांची पूजा करण्याचा विचार मांडला. म्हणजेच परंपरा कितीही जुनी असली तरी जे जुने आहे ते पवित्रच आहे असे न समजता, कालमानपरत्वे जुन्या परंपरांचा विचार टाकून दिला पाहिजे. कालमानानुसार जे नवे विचार आहेत त्यांचा अंगीकार केला पाहिजे. ( वाचा ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ — लेखक वि. दा. सावरकर) श्रीकृष्णाने गीता सांगितली, परंतु गीतेच्याद्वारे त्याने तत्वज्ञान सांगितले ते महत्त्वाचे.
‘मी सर्वकाही आहे, मी असे करतो, मी जगाचा आदि आहे, अंत ही आहे.’ असे तत्वज्ञान त्याने मांडले आहे असे वरकरणी वाटते. परंतु हे तत्त्वज्ञान म्हणजे ‘ मी-पणा ‘ नसून, ‘ मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार ‘ या प्रकारचे तत्त्वज्ञान मी मानतो. मी जो उपदेश करतो ते तत्वज्ञान मी स्वतः अंगिकारतो असे त्याचे म्हणणे आहे. मी म्हणजे कुणीही व्यक्ती. माझ्या दृष्टीने त्याचा अर्थ इतकाच की जेव्हा माझा जन्म झाला तेव्हाच या विश्वाची निर्मिती झाली. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या दृष्टीने या विश्वाचा अंत होणार आहे.
श्रीकृष्ण मानला जर विश्वाचा शासक, तर त्याचे असे म्हणणे की जो सर्वोच्च पदावर आहे तो तुम्हाला तुमच्या लढाईमध्ये कोणतीही सक्रिय मदत करणार नाही. तो फक्त तुम्हाला तत्वज्ञान सांगेल. कृष्ण म्हणतो ‘ न धरी शस्त्र करी मी, सांगेन युक्तीच्या गोष्टी चार ‘ म्हणजेच सर्वोच्च शासक हा तुम्हाला काही युक्तीच्या गोष्टी सांगेल परंतु तो स्वतः तुमच्या जीवनाच्या युद्धात तुमच्या बरोबर सामील होणार नाही. सक्रीय मदत करणार नाही. उलट त्याचे सैन्य हे तुमच्या विरोधात लढणार आहे. त्याच्या सैन्याला तुमच्या भल्याचं काहीही घेणं देणं नाही. हीच परिस्थिती आज आणि पूर्वीही दिसते आहे नाही का? शासन कोणतेही असो तुमच्या बाजूने लढणारे फक्त तुमचे चार पाच जण असतात जे खरे मनापासूनचे हितचिंतक आणि मित्र असतात. तेच फक्त तुम्हाला मदत करतील. पण लढणारे फक्त तुम्ही आहात. त्यामुळे सर्वोच्च शासकाने कोणत्याही प्रकारे सामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार केला असला तरी प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतःच लढायची आहे. ती लढाई लढण्यासाठी अंधश्रद्धांची झापडे आणि परंपरांच्या कुबड्या उपयोगाच्या नाहीत.
सकारात्मक विचार, जपलेली नाती आणि आयुष्यासाठी लढण्याची जिद्द हीच फक्त उपयोगाची आहे. मला वाटते हेच जीवनाचे तत्त्वज्ञान आपण अनुभवत आहोत. म्हणून हा आजच्या काळातील जगण्याचा महत्त्वाचा विचार आहे असे मला वाटते.
… राम-कृष्ण चरित्रातून अजूनही बरेच विचार आपल्याला जगण्यामध्ये समजून घ्यावे लागतील.
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈