सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ कथा आमच्या मैत्रीची- मैत्रिणीची… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
जवळपास तीन वर्षे होत आली मीनाला भेटून ! मी आणि अलका तिला भेटून आलो आणि आठ दहा दिवसातच मीना गेल्याचे कळले आम्हाला! तिचे ते टपोरे डोळे डोळ्यासमोरून जाईनात! त्या डोळ्यात तेव्हा ना ओळखण्याची खूण होती, ना आमच्या अस्तित्वाची जाणीव! ना स्पर्शाची! तरीपण ती मनात कुठेतरी हलली असेल, तिला व्यक्त करता आलं नाही तरी!
मीना आमची लहानपणापासूनची जिवलग मैत्रीण! शोभा, अलका, मीना आणि मी! चौघींची खूप गट्टी होती. मीना आणि मी किती वर्ष शाळेत एका बाकावर बसत होतो. हसत – खिदळत होतो, भांडत होतो, आणि पुन्हा गळ्यात गळे घालत होतो. दुर्दैवाने आम्ही नववीत असतानाच तिचे वडील गेले आणि मीना आपल्या आईबरोबर पुण्याला आपल्या मोठ्या भावाकडे शिफ्ट झाली. मॅट्रिक झाल्यानंतर एस्. पी. कॉलेजला शिक्षण घेत असतानाच ती डेक्कन वर एका लायब्ररीत पार्ट टाइम जॉब करत होती. आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचा स्वभाव होता तिचा! त्या काळात ती आणि मी भेटत होतोच. ग्रॅज्युएशन नंतर दोघींचीही लग्न एकदमच ठरली. अगदी रुखवताची तयारी सुद्धा दोघींनी मिळूनच केली!
लग्न झाली आणि आम्ही आपापल्या संसारात गुरफटलो! कधीतरी खुशालीचे पत्र जाई एवढेच! तिला दोन मुलगे, मला एक मुलगा आणि एक मुलगी.. संसार गाडी रुळावरून चालू होती. आणि अचानक एक दिवस मीनाला ब्रेन ट्यूमर निघाल्याचे कळले. तिचे मोठे ऑपरेशन झाले. त्यातून ती सही सलामत बाहेर पडली! पण दुर्दैवाने तिच्या मिस्टरांना हार्ट अटॅक येऊन ते अकस्मात गेले. दोन लहान मुले घेऊन मीना पुण्यात सासरच्या घरी परत आली. हे सगळे कळल्यावर खूप वाईट वाटले. तिला आता स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे होते. म्हणून तिने मूकबधिर शिक्षणाचा कोर्स केला आणि नोकरीला सुरुवात केली. नोकरीचे ठिकाण लांब होते, पण सासू-सासर्यांच्या आधाराने तिने आपली नोकरी सुरू केली. यथावकाश मुलांची शिक्षणं झाली. नोकरीतून रिटायरमेंट घेऊन मुलांसह आनंदाने राहायची स्वप्ने मीना बघू लागली. मोठ्या मुलाचे लग्न झाले. त्याने सहकार नगर मध्ये फ्लॅट घेतला. आता सुखाचे दिवस आले होते. मध्यंतरीच्या काळात मी एकदा तिला भेटून आले.
धाकटा मुलगा इंजिनियर होऊन दिल्लीला नोकरीला लागला होता. मीना त्याच्याबरोबर दिल्लीला गेली. पण काय झाले कोण जाणे ?पुन्हा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. ट्रीटमेंट चालू होती, पण आता तिला खूपच त्रास होत होता. म्हणून ती पुण्याला मोठ्या मुलाकडे आली, पण त्यानंतर तिने अंथरूणच धरले. मी आणि अलका तिला भेटायला गेलो. पण ती आता जाणीव नेणीवेच्या पलीकडे होती.
तिच्याकडे बघून खूप काही आठवत होते. ते शाळेचे दिवस, खूप खळखळून हसणे, बडबड करणे, दंगा करणे, हे सगळे आठवले, पण आता त्यातले काहीच नव्हते !ती आम्हाला ओळखत सुद्धा नव्हती. रत्नागिरीचे फाटक हायस्कूल ही आमची शाळा! लहानपणापासून आम्ही एका वर्गात, एका बाकावर! शाळेच्या स्नेहसंमेलनात प्रत्येक गोष्टीत भाग घ्यायचा उत्साह! खेळात, नाचात, नाटकात सगळीकडे भाग घ्यायचा. रत्नागिरी गाव लहान, त्यामुळे सगळेच एकमेकांच्या ओळखीचे !कुणाच्या बहिणीचा, मावशीचा, वहिनीचा कुठलाही कार्यक्रम असू दे आमची तिथे हजेरी असायची! विशेष करून मंगळागौर जागवायला आवडायची. रात्रभर जागायचं, पहाटे घरी यायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन रात्री किती मजा केली, याची चर्चा करायची. असे मजेचे दिवस होते ते!
आम्हा सर्व मैत्रिणींचे केस लांब होते. रत्नागिरीत फुले भरपूर !त्यामुळे रोज डोक्यात फुलांचा गजरा किंवा फुले असंतच! परीक्षेच्या दिवसात कैऱ्यांच्या फोडी तिखट मीठ लावून शाळेत आणायच्या आणि सगळ्यांनी त्या आंबट चिंबट गप्पा मारत खायच्या. मधल्या सुट्टीचा डबा तर वर्ग चालू असतानाच संपायचा! उन्हाळ्याच्या सुट्टीत रोज बंदरावर जाऊन भेळ खायची आणि सूर्यास्त झाला की घरी यायचे, असे फुलपाखरी दिवस होते ते!
मीना आमची जिवाभावाची मैत्रीण! रत्नागिरीत असेपर्यंत केलेल्या या गमती जमती ती पुण्याला गेली तरी आम्ही जेव्हा एकत्र भेटत असू तेव्हा चवी चवीने बोलल्या जायच्या! ती वर्षे मागे पडली. सगळ्या जणी बोहल्यावर चढलो आणि वेगवेगळ्या दिशेला, वेगवेगळ्या घरात नांदायला गेलो. मुले बाळे झाली. संसारात रमलो, पण ते लहानपणचे दिवस काही स्मरणातून गेले नव्हते! वेळ मिळेल तेव्हा आम्ही एकत्र येत होतो. तीच मीना आजारी आहे असं कळतात मी आणि अलका तिला भेटायला गेलो. तिच्याशी जरा बोलता येईल असे वाटत होते, पण कसचे काय, तिची अवस्था बघून अक्षरशः भडभडून आले! तिच्या सुनेने तिला आम्ही मैत्रिणी आलोय हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या डोळ्यात आम्हाला ती ओळख पटण्याची खूण दिसेना. खूप वाईट वाटले. तिला भेटून आल्यानंतर काही दिवसातच ती गेल्याचे कळले, पण डोळ्यासमोरून तिचे ते टपोरे डोळे जाईनात !आता तीन वर्षे होतील पण आज मीनाच्या आठवणीने मन भरून आले. नकळत डोळे पाणावले. “मैत्री” म्हणजे काय ते जाणवते आता! इतके वय झाले तरी हा रेशीम बंध तुटत नाही… हीच खरी मैत्री !
(वरील लेख लिहून काही वर्षे झाली, पण अजूनही “मैत्री” म्हंटले की ही माझी जिवाभावाची मैत्रीण आठवते. लहानपणीची ती मैत्री काळजातील असते हेच खरे)
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈