सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
☆ ‘शब्दभेट… कृतज्ञतेची‘ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
तसं बघायला गेलं तर मी कोणी फार महान व्यक्ती वगैरे नाही की मी स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहावं आणि लोकांनी ते कौतुकानं वाचावं. पण शहापूरसारख्या आदिवासी भागात जगण्यासाठी रोजची तारेवरची कसरत करत, मी LIC सारख्या नामांकित वित्तीय संस्थेतून मॅनेजर पदावरून निवृत्त होणं, हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप मोठं यश आहे.
माझ्या या यशात वाटेकरी असलेल्या माझ्या कुटुंबियांइतकाच अनेक जणांचा हातभार, सहकार्य या प्रवासात लाभलं. कोणतेही नातेसंबंध नसताना, निःस्वार्थ वृत्तीने मदत करणारी अनेक माणसं भेटली, या साऱ्यांविषयी मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना आहे आणि आजीवन राहील. आणि ती व्यक्त करण्यासाठीच हा लेखनप्रपंच !
तर अशाच एका व्यक्तीबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती व्यक्ती म्हणजे शीलामामी ! शीला शिवराम लेले. ही वर्षाची, म्हणजे माझ्या मैत्रिणीची मामी बरं का ! राजामामा, मामी त्यांची दोन मुलं-स्वाती – सचिन आणि वर्षाचे आजी-आजोबा अशी सहा माणसं या कुटुंबात होती. आधी हे भिवंडीला राहायचे, नंतर ठाण्यात, नौपाड्यात आले. बहुतेक मामाचं मुंबईत ऑफिस आणि मुलांच्या शिक्षणाची सोय म्हणून आले असावेत. मामीचं घर तसं लहानच, म्हणजे स्वैपाकघर आणि बाहेर एक खोली. तिथेच लागून जिना होता.
रानडे म्हणजे शीलामामीचं माहेर ! या रानड्यांच्या घरातच वरच्या मजल्यावर लेले कुटुंब राहात होतं. स्वैपाकघराला लागून आणखी एक खोली होती ती रानड्यांच्या वापरात होती. त्यांच्या बाहेरच्या बंदिस्त व्हरांड्यातून वरती यायला दुसरा जिना होता. स्वैपाकघरातच एका सेटीवर वर्षाचे आजोबा झोपलेले असायचे. त्यांचं वय नव्वदच्या आसपास असेल. त्यांचं सगळं बिछान्यावरच करावं लागायचं. शीलामामीच करायची सगळं, तेही विनातक्रार ! बाहेरच्या खोलीत सेटीवर वर्षाची आजी, त्याही पंच्याऐंशीच्या आसपास ! जेमतेम स्वतःचं स्वतः आवरायच्या. त्यांची तब्येतही नरम-गरम असायची.
सकाळी मामाचा डबा, मुलांची शाळा आणि बाकी सगळं घरकाम, मामी हसतमुखाने करायची. शिवाय इतर कलाकुसरीची कामंही हौसेने चालू असायची. रूखवताच्या वस्तू, मोत्यांची महिरप इत्यादि…
तर या घराशी माझा संबंध आला तो १९८१ पासून. शहापूरच्या ग. वि. खाडे विद्यालयातून एस. एस. सी. झाल्यावर आम्ही दोघींनी अकरावीला मुलुंड काॅलेज ऑफ काॅमर्सला प्रवेश घेतला. अकरावी – बारावी आमची काॅलेजची वेळ दुपारी १.४५ ते ५.४५. शहापूरहून बसने आसनगाव ला यायचं आणि मग ११ वाजताची गाडी पकडून काॅलेजला जायचं. गाडी १२.३५ ला मुलुंडला आणि १२.४० ला आम्ही काॅलेजमध्ये पोचायचे. मग एक तास बहुतेक लेडीजरूममध्ये डबा खाऊन आणि नंतर बसून काढायचो. म्हणून मग अधून-मधून आम्ही दोघी मामीकडे जायला लागलो.
मुलुंडच्या अलीकडचे स्टेशन ठाणे आणि स्टेशनपासून शाॅर्टकटनी दहा मिनिटात मामीच्या घरी ! अर्धा तास तिथे बसून परत ठाणे स्टेशन आणि काॅलेजला ! मामी नेहमीच हसतमुखाने स्वागत करायची. वडी, लाडू, शंकरपाळे, बिस्किट काहीतरी खाऊ नेहमीच हातावर ठेवायची. घरून आणलेली डब्यातली पोळीभाजी खायला बसलो तर नंतर गरम-गरम वरण-भात खायला लावायची. चाचणी परीक्षा असो की वार्षिक, आम्ही दोघी कायम मामीकडे राहायला जायचो.
शहापूर – आसनगावहून मुंबईकडे जायला, त्यावेळी अगदी मोजक्या गाड्या होत्या. एक गाडी गेली की तीन तासांचा विराम. एकदा बस लेट झाल्याने आमची सकाळची गाडी चुकली आणि त्यामुळे प्रिलिमचा पेपर देता आला नाही. त्यावेळी इतर वाहनांनी रस्त्यामार्गे जाणं अवघडच होतं आणि शिवाय खिशालाही परवडलं नसतं. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी आम्ही दोघी ठाण्यात दाखल व्हायचो. स्वैपाकघराला लागून असलेली वैद्यांची खोली मग परीक्षा संपेपर्यंत आम्हाला दिलेली असायची. आणि त्याबद्दल रानडे कुटुंबियांनीही कधी नापसंती व्यक्त केल्याचं मी ऐकलं/अनुभवलं नाही.
रात्री जागून अभ्यास असो, पहाटे लवकर उठून करायचा असो, मामी सेवेला तत्पर असायची. चहा-खाणं, जेवण आपुलकीनं हातात आणून द्यायची. आणि याबाबतीत वर्षात आणि माझ्यात कधीच कोणताच भेदभाव नसायचा हं ! वर्षा तिच्या सख्ख्या नणंदेची मुलगी, तिची भाची, तिचं कोडकौतुक केलं तर एकवेळ समजण्यासारखं आहे. पण मी त्या भाचीची मैत्रीण, तरीही माझेही अगदी तस्सेच लाड केले जायचे. कुठले ऋणानुबंध असतात हो हे ! खालच्या रानडेआजी देखील काहीतरी गोडधोड मुद्दाम आणून द्यायच्या आम्हाला. वर्षाची आई आणि मामी, या नणंद-भावजयीचं नातं हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा ! इतकं समजूतदारपणाचं, आपुलकीचं नातं खरंच दुर्मिळ आहे.
आम्ही एस. वाय. बी. काॅमला असतानाच वर्षाचं लग्न झालं. वर्षाच्या लग्नाच्या आधीच तिची आई अंथरुणाला खिळली. कित्येक महिने हाॅस्पिटलमध्येच होती. लग्नालाही उपस्थित राहू शकली नाही. पण मामा-मामींनी खंबीरपणे उभं राहून सगळं व्यवस्थित पार पाडलं. लग्नानंतर थोड्याच दिवसात वर्षाचे बाबा अचानक गेले. पुढे काही दिवसांनी आईही गेली. वर्षाचं माहेरपण, बाळंतपण हे देखील मामींनीच केलं, आणि तेही अगदी पोटच्या लेकीप्रमाणे, हे मी स्वतः बघितलं आहे.
काॅलेज संपलं. नोकरी, लग्न, संसार या व्यापात मीही गुरफटले. मामीही मुलांचे संसार, नातवंडं यात रमलेली. त्यामुळे वारंवार भेट काही होत नाही. वर्षाकडेच तिची विचारपूस करते. पण मागच्या वर्षी आमची वर्षाकडे भेट झाली. माझा कवितासंग्रह अलवार तिला भेट दिला. तिच्या डोळ्यातलं कौतुक आणि गळामिठी, न बोलता खूप खूप देऊन गेली.
आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण मातृवत निःस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करणारी मामी मला कायमच वंदनीय आहे.
अधिक मासानिमित्त या आगळ्यावेगळ्या प्रेममूर्तीला साक्षात दंडवत. आणि ही शब्दभेट- —- कृतज्ञतेची !
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈