श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ तोच चंद्रमा नभात… श्री मनोज मेहता ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे

कधीकाळी बाबूजींची अन् माझी ओळख तरी होईल का, हेच माहीत नव्हतं, मैत्री तर दूरच ! आणि अचानक डॉ. पुणतांबेकर यांनी १८ एप्रिल २००० रोजी, फर्मान सोडलं, “मनोज, बाबूजींची छायाचित्रं तूच काढायचीत, आपल्याला उद्या त्यांच्या घरी जायचे आहे.” आणि त्याप्रमाणे आम्ही सकाळी १० वाजता बाबूजींच्या घरी पोचलो. सोसायटीच्या नामफलकावर एकच नाव मराठीत होतं, ते म्हणजे………… ‘सुधीर फडके’.

डॉक्टरांच्या मागून मी जरा घाबरतच घरात प्रवेश केला आणि, ज्यांनी करोडो मराठी रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले, त्यांचे मला साक्षात  दर्शन  झाले. लेंगा – झब्बा, बुटकी मूर्ती, प्रसन्न चेहरा! मी  भारावून काही क्षण पहातच राहिलो. त्यांनी “पाणी घ्या”, असं म्हटल्यावर, मी भानावर आलो.

डॉक्टर आणि बाबूजींचं बोलणं सुरू झालं. आणि माझं काम झपाझप सुरू झालं. आत्ताच्या भाषेत कँडीड छायाचित्रं… पूर्ण रोल संपला. त्यांच्या गप्पा संपल्या व डॉ. पुणतांबेकर म्हणाले, “मनोज आता आमची छायाचित्रे काढ”. 

मी लगेच म्हणालो, “माझी छायाचित्रे काढून झालीत”. 

मी असं म्हणताच डॉक्टर अचंबित होणे स्वाभाविक होते, पण बाबूजींनाही कुतूहल वाटले. गप्पांच्या ओघात त्यांचे माझ्या हालचालींकडे लक्षच नव्हते. आम्ही मग चहा घेऊन डोंबिवलीत परतलो. 

दुसऱ्या दिवशी मी रंगीत छायाचित्रे घरीच डेव्हलप केले आणि डॉक्टरांना फोन करून बाबूजींचा क्रमांक घेतला. बाबूजींशी दूरध्वनीवर बोललो. ते म्हणाले, “अहो, मीच तुमचा क्रमांक मागणार होतो. बरं झालं तुम्हीच दूरध्वनी केला. उद्या येताय का माझ्या घरी, वेळ आहे का तुम्हाला?”

“अहो बाबूजी, मी यासाठीच फोन केला होता, येतो नक्की”, असे सांगून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दादरला त्यांच्या घरी पोहचलो. त्यांना नमस्कार केला, तेव्हा ते म्हणाले, “नमस्कार आई-बाबांना करायचा”.

छायाचित्रे हातात दिल्यावर, कधी एकदा ते उघडुन पाहू, अशी एखाद्या लहान मुलासारखी उत्सुकता दर्शवणारी बाबूजींची गंमत मी पाहिली. सगळी छायाचित्रे पाहून झाल्यावर मला म्हणाले, “इकडे या हो”. 

मी त्यांच्याजवळ गेल्यावर, त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्याला पकडून, माझ्या दोन्ही गालांचे गालगुच्चे घेतले. त्या क्षणाला मला माझा ‘सर्वोच्च बहुमान’ झाला असे वाटले. ते म्हणाले, “अहो, इतकी वर्ष कुठे होतात?”

त्यानंतर डोंबिवलीचे शिवसेनेचे धड़ाडीचे कार्यकर्ते नितिन मटंगे ह्यांनीही, ‘मला बाबूजींच्या गाण्यांच्या सूचीचे पुस्तक करायचे आहे, तूच बाबूजींची छायाचित्रे काढायचे’, असे म्हणून मला त्यांच्या घरी नेले. मला पाहताक्षणी बाबूजी नितिनला म्हणाले, “तुमच्या पुस्तकात माझे झक्कास छायाचित्र येणार”. असे बाबूजींनी म्हणताच, नितिन व वसंतराव वाळुंजकर हे उडालेच ! 

तद्नंतर वारंवार बाबूजींचा आणि माझा कधी प्रत्यक्ष, कधी दूरध्वनीवरून संवाद होणे तर कधी त्यांच्या घरी गप्पांचा फड कसा रंगत गेला हे कळलेच नाही. असे आमचे मैत्रीचे धागे जुळत गेले. 

डोंबिवलीचे बाबूजी, म्हणजे विनायक जोशी, यांचा दिल्लीत महाराष्ट्र मंडळातर्फे कार्यक्रम होता. विनायकचा हट्ट होता छायाचित्रे मनोजनेच काढावीत. हा हट्ट विनायकचा काल, आज व उद्याही असणारच. त्याने इतके अचानकच ठरवले आणि बाबूजींनाही तिथे पुरस्कार दिला जाणार होता.

बाबूजींबरोबर जाण्यास, श्रीधरजींना वेळ नव्हता, म्हणून त्यांनी मला विचारले, “मनोज, तुम्ही याल का माझ्याबरोबर दिल्लीला?” त्यांना मी छायाचित्रे काढायला तिथे येणार हे माहीत नव्हते. माझा तर आनंदच गगनात मावेना! आणि दिल्लीत त्या संपूर्ण सोहळ्यात मी एकटाच छायाचित्रकार ! 

महाराष्ट्र मंडळाचे मुख्य संयोजक श्री. हेजिब यांनी ७ केंद्रीय मंत्र्यांसमोर, श्री. लालकृष्ण आडवाणी ह्यांच्या हस्ते माझा सत्कार केला, तेव्हा बाबूजी म्हणाले, “मनोज, कॅमेरा द्या, मी तुमचं छायाचित्र काढतो.” केवढा हा माझा सन्मान. मला तर गगणाला गवसणी घातल्यासारखे वाटू लागले.

लगेच दोन महिन्यांनी बाबूजींना कलकत्ता येथे पुरस्कार समारंभासाठी जायचे होते. तेव्हाही बाबूजींनी आग्रहाने मला बरोबर नेले. तेव्हा मी बाबूजींना म्हटलं, “बाबूजी, तुमच्यामुळे हा योग आला.” तेव्हा लगेच ते म्हणाले, “तुमचे काम छान आहे, म्हणून सगळे तुम्हालाच बोलवतात.” कुठेही ते स्वतःला मोठेपणा घेत नसत. अशा दिलखुलास, सदाबहार, प्रेमळ पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

माझी व शंना नवरे काकांची ४५ वर्षांची मैत्री असूनही, शंना काकांनाही असूया वाटली. गमतीने म्हणाले, “मनोज, तुझी बाबूजींशी इतकी कशी रे मैत्री झाली ?”

बाबूजींना नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते,

“सूर गेले दूर आता, शब्द मागे राहीला, चंद्र होता साक्षीला… चंद्र होता साक्षीला….”

लेखक – श्री मनोज मेहता

डोंबिवली. मो. ९२२३४९५०४४ 

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments