सौ. रेखा दयानंद हिरेमठ
मनमंजुषेतून
☆ – एका सुंदर जीवनपटाचे साक्षीदार होताना… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆
माझ्या घरट्यात त्यांचं घरटं ……..
दोन वर्षे उलटली आता या गोष्टीला. १७ ऑगस्ट २०२१ ते ४ सप्टेंबर २०२१ दरम्यानच्या काळात आम्ही एक सुंदर जीवनपट अनुभवला. कुतूहल, दया, काळजी,बालपण,पालकत्व, उत्साह ,भीती,आनंद अशा अनेक भावनांनी युक्त असा तो काळ होता आमच्यासाठी.
२२ तारखेला मी आमच्या घराच्या गॅलरीमधल्या हँगीग कुंडीमध्ये पक्षी बसलेला पाहिला. गॅलरीचे दार उघडल्यावर भुर्रकन उडून गेला. साधा नेहमीचाच प्रसंग, त्यामुळे मी लक्ष दिले नाही. तो पक्षी जोडीने अधून मधून दर्शन देत राहतच होता. या जोडीने मला अजिबात थांगपत्ता न लागू देता हँगिंग कुंडीमध्ये त्याचा प्रशस्त बंगलाच बनवून टाकला होता. सहज शंका आली म्हणून स्टूलवर चढून पाहिले तर सुंदर जीवांची वाट पाहत असणारं एक सुरेख घरटं तयार होतं. म्हटलं चला एक सुंदर अनुभव मिळेल आता. आणि त्या घरट्याचा मोबाईलमध्ये फोटो काढला.
आता माझ्यातील मातृत्व जागे झाले, कारण ही कुंडी होती, त्यालाच लागून ग्रीलमध्ये कपडे वाळत घालायची दोरी बांधली होती. कपडे वाळत घालताना, काढताना त्या दोरीमुळे ती कुंडी हलत होती. धक्का लागून पक्षांची अंडी किंवा पक्षांचे पिल्लू खाली पडेल याची भीती जाणवली. त्यामुळे ती दोरी सोडून थोडीशी खाली बांधावी, जेणेकरून त्या पक्षांना त्रास होणार नाही असा विचार मनात येताच मी लगेचच अंमलबजावणीसाठी स्टूलवर चढून दोरी सोडू लागले. दोन मिनीटे देखील झाली नसतील तोवर ते दोन्ही पक्षी काही केल्या मला तेथे हात लावून देत नव्हते. मी मग ‘ थोडा वेळ जाऊ दे. मग पुन्हा आपले कार्य
साधू ‘असा विचार करून मोर्चा किचनकडे वळवला. पक्षी जवळपास नाहीत याचा अंदाज घेऊन पुन्हा मोहीमेवर रुजू झाले.
त्या दोरीच्या दोनतीन गाठी सोडून होईपर्यंत काहीतरी क्षेपणास्त्राप्रमाणे माझ्याकडे झेपावत आहे असे वाटले. तो पक्षी अक्षरश: सूर मारून येऊन मला हुसकावून लावत होता. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोपर्यंत हा कुठून आला कळलेच नाही. एकदम स्टूलवरचा एक पाय हलून तोल जाऊन मी पडते की काय असे वाटत असताना माझ्या प्रिय ग्रीलने मला वाचवले आणि पुन्हा एका short break साठी मी थांबले. ती दोरी सोडून खाली पुन्हा बांधण्याच्या पाच मिनिटांच्या कामाला अनेक व्यत्ययाने मला दोन तास लागले. पण शेवटी मोहीम फत्तेच केली. आणि एक आत्मिक समाधान मिळाले.
आता रोज उठल्याउठल्या स्टूलवर चढून पक्षाच्या घरटयाचं अवलोकन सुरु झालं. मी आणि माझा मुलगा रोज न चुकता हे काम उठल्याउठल्या करत असू. अर्थातच घरमालक आणि घरमालकीणबाई जवळपास नसताना.थोड्या दिवसांच्या प्रतिक्षेनंतर घरट्यामध्ये एक अंडं आम्हाला दिसलं. दुसऱ्या दिवशी दुसरे आणि तिसऱ्या दिवशी तिसरे अशी तीन अंडी त्यांच्या घरट्यात विराजमान झालेली बघून मन अगदी लहान मुलां प्रमाणे बागडू लागलं. झाले. आता आतुरता होती त्या नवीन पिल्लांची. मग रोज न चुकता आमच्याकडून फोटोसेशन चालू झालं. अकरा दिवसांनी एका अंड्यातून एका पिल्लाचे आगमन झाले. बाराव्या दिवशी तीनही जिवांची हालचाल बघून खूप आनंद झाला.
ती गोंडस पिल्ले वाढताना बघणे म्हणजे एक अतिशय आनंददायी अनुभव होता. एका जीवनपटाचे आम्ही साक्षीदार झालो होतो. रोजच ते उत्सुकतेने घरटयात बघणे आम्ही आनंदाने करत होतोच. पण एक बालपण मी स्वत: देखील अनुभवत होते. अशातच एके दिवशी पक्षीणबाई रस्ता चुकून चक्क घरातच आल्या. अचानक तिचे असे घरात येणे मला एकदम घाबरवूनच गेले.. मी चटकन आधी पंखा चालू नाही ना हे चेक केले. तिच्या बाहेर पडण्यासाठीच्या घिरटया चालू होत्या पण तिला बाहेर जाण्याचा मार्ग काही सापडेना. ती किचनमधून बाहेर हॉलमध्ये आली. पण खिडकी बंद असल्याने बाहेर जाता येईना. मग खिडकी उघडल्यानंतर भुर्रकन उडून गेली. पण दोन मिनीटे घरात उच्छाद मांडला होता तिने. तेव्हापासून गॅलरीचं दार जास्त वेळ उघडून ठेवलेच नाही.
जसजशी अंड्यांमधून पिल्ले बाहेर येऊ लागली तसतशी ही पक्षाची जोडी आक्रमक होऊ लागली. गॅलरी म्हणजे आमचं साम्राज्य आहे आणि इथे कोणीही पाऊल ठेवायचं नाही असा धमकीवजा इशारा आम्हाला मिळू लागला. आम्ही मात्र आमच्याच घरात (गॅलरीत ) चोरासारखं वावरू लागलो. कपडे वाळत घालताना तर घरट्यापासून लांबच घालायचे. जरा म्हणून घरटयाच्या जवळ कोणी दिसले की कुठूनही ही जोडी प्रगट व्हायची. आता फोटो काढणंही खूप अवघड झाले होते. मी आणि माझा मुलगा हे दिव्य कसेबसे म्हणजे एकाने पहारा द्यायचा आणि दुसऱ्याने फोटो काढायचा असे करत होतो.
तर अशा रीतीने आमचं सहजीवन चालू होतं. यात खूप भावलेली एक गोष्ट म्हणजे पक्षी जेव्हा जेव्हा पिलांना खाऊ घेऊन येत तेव्हा जर आम्ही कोणी तिथे असू तर ते घरट्याजवळच घुटमळत. पिलांचा आवाज आल्यावर आम्ही लगेचच बघायला जात असू. पण आम्ही नजरेआड झाल्यावरच ते पिलांना खाऊ घालत. पूर्वीच्या आजीबाई लेकी- सुनांना सांगायच्या ना .. सगळ्यांसमोर बाळाला खायला द्यायचं नाही, तो सल्ला आठवायचा. आणि मग मी पण गॅलरीचे दार बंद करून घ्यायचे. मग ते पक्षी पिलांना चिमणचारा खाऊ घालत. पक्षी असो जनावरे असोत की माणूस… सर्वत्र मातृ-पितृभाव सारखाच ना ! शक्यतो दोन्ही पक्षी एकाच वेळी बाहेर जात नसत. एक जण पहारा द्यायचा आणि एक जण पिलांना चिमणचारा आणण्यासाठी जायचा. दोघांनी आपापली कामे वाटून घेतली होती.
अशा रितीने १४ दिवस कसे गेले काही समजलेच नाही. आम्हाला वाटले होते, जसा अंड्याचा क्रम होता तशी त्यांची वाढ होईल. पण सर्व पिल्ले बहुदा एकाच वेळी उडून गेली. बराच वेळ झाला पक्षी आणि पिलांचा आवाज का नाही म्हणून वर चढून बघितलं तर घरटे रिकामे होते. आनंद झाला होता पिलं आता आपल्या पंखांनी सर्वत्र हुंदडतील म्हणून…. पण काहीतरी हरवल्यासारखं पण वाटत होतं .
चला … एक जीवनपट सुफळ संपूर्ण झाला याचे समाधान घेऊन मी जवळजवळ २०-२२ दिवसांनी त्या कुंडीतल्या रोपाला पाणी घातलं. मला वाटले होते ही वेल आता वाळते की काय. पण त्या वेलीनेही
बिनपाण्याचा एवढे दिवस तग धरला होता. तीही त्या पक्षांना सहाय्य करीत होती. तिला पण मायेचा ओलावा मिळाल्यामुळे ती देखील बहरली होती…..
दEurek(h)a
© सौ. रेखा दयानंद हिरेमठ
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈