श्री सुनील काळे
मनमंजुषेतून
☆ कमिटमेंट… ☆ श्री सुनील काळे ☆
निसर्गरम्य पाचगणीत प्रवेश करत असताना उजव्या बाजूला टोलनाका आहे. हा टोलनाका पार केल्यानंतर रस्त्यालगतच हॉटेल (Ravine) रविनचा बोर्ड दिसतो .या हॉटेलमध्ये अनेक प्रसिद्ध ,मान्यवर व्यक्ती आणि बॉलीवूडचे सिनेकलावंत , शूटिंगसाठी येत राहतात . कारण हॉटेलच्या रूममधून दिसणारा कृष्णा खोऱ्याचा , धोम धरणाचा निसर्गरम्य व्हॅलीचा परिसर , पश्चिमेकडे महाबळेश्वरचे डोंगर , पूर्वेकडेचा सिडने पॉइंटचा परिसर सर्व मोसमांमध्ये नेहमीच विलोभनीय दिसतात .हॉटेलच्या मालकीणबाई बिस्मिल्ला सुनेसरा मॅडम व त्यांचा दक्ष परिवार येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना उत्तम पद्धतीचे जेवण, राहण्याची सर्व अत्याधुनिक सुखसुविधा व येथील दक्ष स्टाफ मेंबर्स सर्वोत्तम सर्व्हिस देतात. त्यामुळे बॉलीवुडचे अनेक नामवंत सुप्रसिद्ध कलाकार हॉटेल रविनमध्ये राहण्याला प्राधान्य देतात.
अशा या स्टार हॉटेलमध्ये माझे चित्रप्रदर्शन नुकतेच सुरू झाले होते . त्या काळात शाहरुख खान व दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेश‘ नावाच्या चित्रपटाची शूटिंग वाईजवळ मेणवली गावात सुरू होती . संपूर्ण दिवस शूटिंगसाठी शाहरुख खान व्यस्त असायचा .त्याच्या स्वतंत्र व्हॅनिटी कॅराव्हॅनमध्येच तो ये जा करत असल्याने व मुक्काम हॉटेलच्या टॉप रुममध्ये असल्याने त्याचे दर्शन दुर्लभ झाले होते .
एके दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकला सिडने पॉईंटच्या परिसरात चाललो होतो. त्यावेळी हॉटेलच्या परिसरात सकाळी सकाळीच खूप धावपळ सुरू झाली होती. मी सहज चौकशी केली त्यावेळी कळले की आज मेणवली घाटावर सूर्योदयाचा शॉट आहे, आणि त्यासाठी आज भल्या पहाटे शहारुख खान तयार होऊन निघाला आहे. प्रथम तो रिसेप्शनच्या शेजारी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये येणार आहे. शाहरुख खान सकाळी फक्त एक ग्लास फ्रूट ज्यूस घेतो अशी माहिती तेथील ओळखीच्या वेटरने मला सांगितली. मग मी देखील कोपऱ्यातली एक जागा पकडून शाहरुखच्या दर्शनासाठी थांबलो.
इतक्यात धावपळ सुरू झाली. शाहरुख खान मस्त ऑफव्हाईट कॉटनची पॅन्ट व स्काय ब्लू कलरचा बाह्या दुमडलेला शर्ट घालून रेस्टॉरंटमध्ये आला. त्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे सर्वांशी हसून सर्वांकडे प्रेमाने हात वर करून शुभेच्छांचा स्विकार केला. नंतर त्याच्या फेव्हरेट फ्रुट ज्यूसची मागणी केली .परंतु रात्रीच्या मॅनेजरने सकाळच्या मॅनेजरला व वेटरच्या टीमलीडरला इतक्या लवकर शूटिंग आहे याची माहिती दिली नव्हती, त्यामुळे फ्रुट ज्यूस तयारच केला नव्हता . मुख्य वेटरने पाच मिनिटात नवीन ज्यूस तयार करतो असे सांगितले. हे ऐकताच शाहरुख खान जरा तडकला, ‘मी रात्रीच इन्स्ट्रक्शन देऊन ठेवली होती तरी ज्यूस का तयार ठेवला नाही‘ अशी विचारणा त्याने केली.
“कमिटमेंट मीन्स कमिटमेंट.. नेव्हर फरगेट“ असे तो बोलला आणि काचेचा दरवाजा उघडून शूटिंगसाठी कॅराव्हॅनमधून थोड्या रागानेच नाराजीने निघून गेला.
इतक्यात हॉटेलच्या मालकीणबाई बिस्मिल्लामॅडम येथे आल्या. त्यांनी काय घडले याची सर्व माहिती घेतली. त्या कोणावरही रागावल्या नाहीत. सरळ किचनमध्ये गेल्या आणि संत्र्याचा दोन ग्लास ज्यूस स्वतःच्या हाताने त्यांनी तयार केला. तो ज्यूस एका मोठ्या बंदिस्त जारमध्ये भरला आणि मुख्य वेटरकडे देऊन ड्रायव्हरला हाक मारली आणि मेणवलीला ताबडतोब शाहरुखच्या गाडीच्या पाठोपाठ लगेच जायला सांगितले. इतक्यात त्यांनी मला पाहिले. इतक्या सकाळी पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले व माझ्यासमोरच मॅनेजरला सांगितले …. ” कमिटमेंट मीन्स कमिटमेंट ” नेव्हर फरगेट . त्या मॅडम आपल्या इतर रोजच्या कामासाठी शांतपणे निघून गेले गेल्या .
मला मात्र मनातून राग आला. पाच दहा मिनिटे थांबला असता तर शाहरुख खानला काय धाड भरली असती का ? ही सगळी स्टार मंडळी पैसा, प्रसिद्धी मिळाली की भाव खातात. त्यांना इगो येतो. .फुकटची हुशारी व स्टाईल मारत राहतात व इतरांवर इम्प्रेशन मारत राहतात. असा भलताच विचार करत मी परत घराकडे निघालो .
मुख्य रस्त्यावरून जात असताना माझा एक जवळचा मित्र वाईच्या दिशेने मोटरसायकलवरून एकटाच चालला होता .माझ्या शेजारी मोटरसायकल थांबवून त्याने मला वाईला चाललोय, येतो का बरोबर असे सहज विचारले .त्यावेळी मी मेणवली येथे शाहरुख खानच्या ” स्वदेश ” या पिक्चरचे शूटिंग चालू आहे व आत्ताच शाहरुख खान तिकडे गेला आहे असे त्याला सांगितले . हे ऐकताच आमचा मित्र चल ,येतोस का मग मेणवलीला ? असे विचारल्यानंतर मी ही लगेच तयार झालो . मला बघायचे होते की इतक्या घाईने शाहरुख खान का गेला ? तिथे जाऊन तो काय असा तीर मारणार होता ? मग जरा वेगाने मोटरसायकल चालवत आमच्या मित्राने शाहरुखची व्हॅनिटी कॅराव्हॅन गाठली. त्याच्यापाठोपाठ हॉटेल रविनची ज्युस घेऊन गाडी चालली होती .त्याच्या पाठोपाठ पाठलाग करत आम्ही देखील मेणवली घाटावर पोहोचलो.
मेणवली घाटावर पोहोचलो आणि मी थक्क झालो .सकाळच्या त्या थंडीत जवळपास तीनशे जणांचा समुदाय घाटावर उपस्थित होता . दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री गायत्री जोशी व इतर जेष्ठ स्त्री-पुरुष कलाकार व मॉब सीनसाठी अनेक स्थानिक गावकरीही सर्व तयारीनिशी उपस्थित होते. कॅमेरामन, सहाय्यक तंत्रज्ञ, ज्युनिअर ॲक्टर्स सर्व मंडळी शाहरुखचीच वाट पाहत होते. शाहरुखच्या नुसत्या एंट्रीनंतर सर्वांनाच जोश व उल्हास आला. सूर्याची कोवळी किरणे घाटावर व मंदिरावर नुकतीच पसरू लागली होती. आशुतोष लाऊडस्पीकरवरून कॅमेरामन व इतर तंत्रज्ञ व सहाय्यकांना सूचना देऊ लागला . सगळे युनिट शॉटच्या तयारीला वेगाने लागले. शाहरुख खानचा ड्रेसमन धावत आला. पांढरी धोती व झब्बा घालून मेकअपसाठी समोर बसला. शाहरुख खानने एकदोन टेक मध्येच शॉट ओके केला आणि शूटिंगची सर्व मंडळी विश्रांतीसाठी थांबली.
खुर्चीवर निवांतपणे बसलेल्या शाहरुख खानला पाहून रविन हॉटेलचा मुख्य वेटर ट्रेमधून ज्यूसचा ग्लास घेऊन समोर उभा राहीला . अनपेक्षितपणे शूटिंगच्या जागेवर आठवणीने बिस्मिल्ला मॅडमने ज्यूस पाठवलेला पाहून शाहरुख खानही भारावला व त्याने वेटरला मिठी मारली आणि म्हणाला ‘ सॉरी , मी लगेच आलो .कारण या सूर्योदयाच्या शॉटसाठी माझ्यासाठी येथे तीनशे लोक पहाटेपासून थंडीत वेटिंग करत आहेत याची मला जाणीव होती . आपण प्रत्येकाच्या वेळेची किंमत केलीच पाहीजे ना ? कमिटमेंट्स मीन्स कमिटमेंट . नेव्हर फरगेट .सकाळी तुला रागावलो . सॉरी वन्स अगेन .’
हा प्रसंग मला मेणवली घाटावर फिरताना नेहमी आठवतो आणि त्यामुळे स्वदेश माझा ऑल टाईम फेव्हरेट पिक्चर आहे . एखादा कलाकार त्याच्या कलेविषयी व स्वतःच्या व इतरांच्याही वेळेप्रती किती कमिटेड असतो याचे हे उत्तम उदाहरण मी स्वतः पाहिले होते .
पण आता दुर्दैवाने अनेक क्षेत्रात अशी कमिटमेंट न पाळणारी माणसेच जास्त आढळतात . आपल्या कृतीमुळे व अनकमिटेड वृत्तीमुळे इतरांच्या मनाला किती यातना सहन कराव्या लागतात याची जाणीव बोथट झाली आहे . व त्याची आता सर्वांना सवयही झाली आहे .
आपण एखाद्या चित्रकाराचे चित्र प्रदर्शन पाहायला जातो व त्यातील चित्र पाहत असताना चित्रातील रंग , आकार , पोत , माध्यम , चित्रातील विषयाचे सादरीकरण मनाला का आवडते ? याचा विचार केला तर कळते की त्या चित्रकाराची त्या चित्रासोबत एक भावनिक ” कमिटमेंट “असते. त्यात त्याने जीव ओतलेला असतो म्हणून ते चित्र देखील पाहणाऱ्याच्याही हृदयाला भिडते . पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते .
एखाद्या गायकाचे श्रवणीय गाणे ऐकताना किंवा एखाद्या वादकाचे असामान्य कौशल्य पाहून सूर, ताल , लय , आवाजातील जादू, शब्दफेक तुम्हाला का भावते ? कारण त्यात प्राण ओतलेला असतो . कारण गायकाची ,संगीतकाराची , कवीची , वादकाची त्या गाण्यासोबत त्या वाद्यासोबत त्या कवितेसोबत एक मनःपूर्वक जिवंत ” कमिटमेंट ” असते .
एखादा अभिनेता ,अभिनेत्री त्यांची भूमिका इतकी जिवंत व उत्कृष्ट पद्धतीने सादर करतात की ते नाटक किंवा सिनेमा पाहताना प्रेक्षक स्वतःला विसरून जातात कारण त्या कलाकाराची त्या सिनेमातील कॅरेक्टरशी एकरूप होण्याची एक वेगळी ” कमिटमेंट “असते .ती भूमिका ते जगतात .एकरूप होतात , समरस होण्याची , भूमिकेला न्याय देण्याची कृती , रसिकवृत्ती रसिक प्रेक्षकानां खूप भारावून टाकते .
एखादा फोटोग्राफर रोजच्या जीवनातील असा एखादा प्रसंग अशा बारकाईने व शोधक नजरेने टिपतो की तो फोटो पाहून प्रत्येक जण अचंबित होत जातो .हजारो शब्दांचे सामर्थ्य एका फोटोमध्ये असते असे म्हणतात, कारण त्या क्लिकमध्ये त्या फोटोग्राफरची दृश्य पकडण्याची एक “कमिटमेंट “असते .
एखादा लेखक त्याच्या लिखाणातून असे शब्दांचे मायाजाल पसरवतो की ते वाचत असताना वाचक मनातून फार हेलावून ,भारावून जातो . एका वेगळ्या अज्ञात विश्वात तो विहार करायला लागतो .कारण त्या लेखकाची त्या लेखाशी ” कमिटमेंट ” असते ही ” कमिटमेंट ” सगळीकडेच फार फार महत्वाची असते .
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तुमची कमिटमेंट त्या क्षेत्राशी प्रामाणिकपणाची असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होत रहाल याची खात्री आहे . तुम्ही शेतकरी असाल तर उत्कृष्ट बी बियाणे , उत्तम खते वापरून , मेहनतीने उत्तम पीक घेण्यासाठी तुम्ही कमिटेड असाल .
तुम्ही छोटे असो वा छोटे हॉटेल व्यवसायिक असाल तर तुमची सर्व्हिस व पदार्थांची चव चाखून हॉटेलबाहेर खाण्यासाठी खवय्यांची मोठी रांग लागते , लागणारच.
उत्कृष्ट वकील , उत्कृष्ट प्राध्यापक , उत्कृष्ट दुकानदार , उत्कृष्ट कारागीर ,उत्कृष्ट बिझनेसमॅन किंवा शालेय शिक्षक किंवा मोठे सरकारी उच्च ऑफिसर किंवा साधा कारकून असाल तरी तुम्ही तुमच्या क्षेत्राशी असलेली ” कमिटमेंट ” पाळली तर यशाची शिखरे व दारे सर्वांना नेहमीच उघडी असतात . फक्त हवी असते एक कमिटेड झोकून देण्याची वृत्ती .
कारण… कमिटमेंट मीन्स कमिटमेंट…
नेव्हर फरगेट… नेव्हर फरगेट…
© श्री सुनील काळे
संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३.
मोब. 9423966486, 9518527566