☆ फक्त गॉगल काढा…☆ श्री सुनीत मुळे ☆
” नही साब ” त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवत तो म्हणाला,
” इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है “
तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे उभा होता !
रस्त्याखालचा पाईप पूर्ण भरला असावा, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते. फुटभर उंचीचे पाणी वरून वेगाने जात होते. पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे !
मी अवाक झालो ! कोण होता हा? कोणासाठी हा असा पाण्यात उभा राहिलाय?
मी भर पावसात खाली उतरलो. त्याला म्हटले, ” बहोत बढिया, भाई !”
तो फक्त कसनुसं हसला आणि म्हणाला,
” बस, कोई गिरना नै मंगता इधर “
” कबसे खडा है?”
” दो बजे से “
घड्याळात पाच वाजले होते !
३ तास तसेच उभे राहून याला भू =क लागली असणार. दुदैवाने माझ्याकडे काहीच नव्हते. सगळी दुकानेही बंद… हा भुक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते !
… कुठल्या प्रेरणेने तो हे करत होता? त्या गुडघाभर उंचीच्या घाण पाण्यात उभे राहून तो तीन तासांपासून कोणाला वाचवत होता? आणि का? दोन वाजल्यापासून त्याने कित्येक जणांना वाचवले असणार. कोणाला त्याची जाणीवही नव्हती. खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?
… ही अशी छोटी छोटी माणसे हे जग सुंदर करून जातात !
मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा ‘ कालनिर्णय ‘ विकत बसलेला दिसला.
दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.
“कालनिर्णय’ केवढ्याला, काका? “
“फक्त बत्तीस रूपये, साहेब ” .. केविलवाणेपणाने तो म्हणाला. सकाळपासून काहीच विकल्या गेलेले दिसत नव्हते. मी एक घेतले. पन्नासची नोट होती. ती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतच होता, की उंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला…
“कितने का है ये? “
“बत्तीस रुपया “
“तने है? “
“चौदा रहेंगे, साब “
ज्याला मराठी येत नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोय?
त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले !
मी आश्चर्यचकित ! छापील किंमतीत विकत घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेत नाहीये. तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटत नव्हता. तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल. मला राहवलेच नाही. मी थांबवून त्यांना विचारलेच !
हे मूळचे लखनौचे महोदय, एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते. शिवाजी पार्कात स्वत:चे घर होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. लठ्ठ पेन्शन येत होती.
” वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा? सौ, डेढ़ सौ ? वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभर ऐसेही धुपमे बैठना पडता था. मैने उसका काम थोडा हलका कर दिया. बस इतनाही !”
मला काही बोलणेच सुचले नाही ! पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणार काय होता?.. न राहवून शेवटी मी त्याला विचारलेच ….
” सोसायटी मे बहुत मराठी फ्रेंडस है, उनमे बांट दूंगा !”
.. मी दिग्मूढ !
” तू एक मिनिट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता ! ” मला डोळा मारत, हसत तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा !
माणुसकी याहून काय वेगळी असते?
एखाद्या हॉस्पिटलबाहेर ‘तत्काळ रक्त हवे ‘ असा फलक वाचून, ऑफिसला वा घरी जायला उशीर होईल, याची तमा न बाळगता रक्त देणारे कोण असतात? ते ही रांग लावून ! ..
… कोण असतात हे? कुठल्या जातीचे? कोणत्या धर्माचे? ‘ भैये ‘ असतात की ‘आपले’ मराठी?’
मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो ‘ चायवाले ‘ आहेत. बहुतांश उत्तरेकडले. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभर चहा ते रस्त्यावर फेकतात… पण दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक ‘ चायवाला ‘ मला माहिती आहे ! सकाळी सकाळी भिकारी आलाच नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो ! त्याबद्दल त्याला एकदा विचारले होते , तर
“बर्कत आती है ” एवढीच कारणमीमांसा त्याने दिली होती.
डोळे उघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरच मेलेली असते.
परवा थायलंडमध्ये गुहेत अटकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले. गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले. ते पाणी कुठे फेकले ? ज्याच्या शेतात ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातले तीन एकरातले उभे पीक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान. एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारले…
“नुकसानीचे काय एवढं? मुले वाचली ना? पेरणी परत करता येईल. मुलांचे प्राण परत आणता आले असते का?”…. हे उत्तर ऐकूनच डोळ्यात पाणी आले !
हे जग सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.
… फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे !
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈