प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

☆ कृष्ण : माझ्या मनातला ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रावण महिना आला की, सणांची रेलचेल असतेच असते. अगदी भराडी गौर, शिवामूळ, मंगळागौरी, नागपंचमी, शुक्रवारची सवाष्ण, वरदलक्ष्मी व्रत, राखी पौर्णिमा, जन्माष्टमी, पिठोरी मातृपूजन, पोळा ! दर दोन तीन दिवसाआड येणारे सण.

सर्व सणांचं ठीक आहे. पण मला नेहमीच जन्माष्टमीचं कायम नवल वाटायचं. श्रीरामजन्म, श्री दत्त जन्म  श्री हनुमानजन्म, जवळपास सगळेच मंदिरात होतात. मात्र कृष्णजन्माचा उत्सव हा मंदिरांसोबतच प्रत्येक घरी होतो. माझ्या माहेरी तर जन्माष्टमीला आम्ही गोकुळाष्टमी म्हणायचो. माझे वडील प्रख्यात मूर्तीकार. सकाळी आंघोळ झाली की ते गोकुळ करीत बसायचे. प्रारंभी गणपती, नंतर श्रीकृष्ण, वसुदेव, देवकी, नंद, यशोदा, राधा, काही गौळणी, अगदी पूतनामावशी सुद्धा. काही गायी वासरं, कालिया. श्रीकृष्णाचे मित्र वगैरे. मजा यायची. आम्हाला कुठलं काय येतंय ? पण शिकवण्याचा कुठलाही आविर्भाव न आणता बाबा आम्हाला मातीकाम शिकवायचे. माणसं, प्राणी करणं कठीणच प्रकरण होतं. मग कुठे पाण्याचं टाकं, नाग, गौळणीच्या डोक्यावरचा माठ, फळं, ताकाचा डेरा असं काहीतरी करायचो. पुढे पोळ्यालाही वाडबैल वगैरे करताना तीच त -हा ! बाबा एकच वाक्य बोलायचे. ” आज ओल्या मातीला हात लावला नाही  तर पुढला गाढवाचा जन्म मिळतो. ” झालं. गाढव कोण होणार ? म्हणून आम्हीही करायचो. कळत नकळत असं कलेचं शिक्षण मिळत गेलं. नंतर त्यांची साग्रसंगीत पूजा नैवेद्य व्हायचा. दुपारी रात्रीच्या भजनाची आणि सुंठवड्याची तयारी असायची.

रात्रीचं भजन छानच रंगायचं. पंचपदी, शिक्का, गजर झाला की इतर भजनं व्हायची. त्या दिवशी कृष्णाची गाणी जरा जास्तच व्हायची. नंतर गवळण. ती झाली की कृष्णजन्म. कृष्णजन्म होताच गुलालाची उधळण होई. मग कृष्णाचा पाळणा. त्यावेळी घरातल्या स्त्रियाही त्यात सहभागी होत. शेवटी आरती आणि सुंठवड्याचा प्रसाद.

दुसऱ्या दिवशी पुन्हा भजन आणि गोपालकाला. हे सर्व झालं की गोकुळाचं विसर्जन. इकोफ्रेंडली हा शब्द आज सर्वांना ठावूक झालाय, पण शंभर वर्षांपासून किंवा त्याच्याही आधी माझ्या माहेरी तो होता. कारण गोकुळाचं विसर्जन पाण्यात न होता, परसातल्या दोडक्याच्या किंवा पडवळाच्या झाडाखाली व्हायचं. सगळं गोकुळ आम्ही त्या वेलांच्या मुळाशी ठेवायचो. पूर्वी श्रावणात श्रावण बरसायचा. रंग नसायचेच त्या मुर्त्यांना. हळूहळू ती ओली माती मातीत मिसळून जायची.अनेकांच्या घरी हा कुळाचार पण आहे.

मला बालपणी पडलेला प्रश्न हाच होता, की कृष्णजन्म घरोघरी का होतो ? ब्रह्मा विष्णू महेश हे ठावूक होतं. उत्पत्ती स्थिती लय. पण स्थिती म्हणजे विष्णूरूप रामाचेही होते.. आदर्श पुत्र, आदर्श भ्राता, आदर्श राजा. एकपत्नी, एकवचनी, एकबाणी प्रभू रामचंद्र. लहानपणी कळत नव्हतं पण जसजशी मोठी होत गेले तेव्हा स्वतःच विचार करू लागले. आजही कृष्ण कळला नाहीच. जरासा विचार केला एवढंच. रामाबद्दल वाटतो तो आदर. आदरयुक्त प्रेम. आणि कृष्ण वाटतो सखा. मनापासून प्रेम करावं असं वाटणारा.

आपल्या कुळाचाराचे देव कुण्या मोठ्या घरी असतात किंवा परंपरेने आपल्याकडे आलेलेही असू शकतात. पण सामान्यपणे आपल्या देवघरात कोण असतं ? श्री गणपती, अन्नपूर्णा आणि रांगता बाळकृष्ण ! सासरी जाताना आई लेकीला अन्नपूर्णा देते. ” तूही तुझ्या घरची अन्नपूर्णा हो ” असा आशीर्वाद देते. आणि दुसरा असतो बाळकृष्ण. मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक ! देवाची पूजा करताना  ती मुलगी हळुवारपणे बाळकृष्णाला आंघोळ घालते. त्याचे वस्त्र बदलते. त्याला मुकुट, गळ्यात साखळी, हातात पायात कडे तोडे घालते. नटवते. सजवते. जसं आपल्या बाळाशी वागावं तशी ती लाडिक वागते. राखी पौर्णिमेला ती त्याला राखी बांधते, स्वतःचा रक्षणकर्ता मानते. घरात काही घडलं तर त्याच्या कानात सांगते. जसं जिवाभावाच्या मित्राशी बोलावं तसं. आधार वाटतो त्याचा. आणि कधी काही सुचेनासं झालं की, त्याचाच सल्ला घेते.

कृष्णाने काय शिकवलं ? तुमचं कर्म तुम्हीच करा. यश आहेच. कारण मी पाठीशी आहे. सोबत आहे. कृष्णाने कुठला त्याग नाही केला ? जन्मतः च आईबाप दुरावले, नंतर नंद यशोदा दुरावले, राधा दुरावली, गोकुळ दूर गेले. असाही त्याग ? पुन्हा मागे वळून न बघण्याचा ? द्रौपदी सखी त्याची. तिचं लज्जारक्षण करणारा सखा तिचा.असूराच्या तावडीतून सोळा सहस्त्र एकशे नारींची त्याने सुटका तर केली. पण पुढे समाजातलं त्यांचं स्थान काय.. म्हणून त्यांना स्वतःचं नाव दिलं. पती म्हणून. बालपणी गुरं राखली, आणि मोठेपणी मित्राच्या रथाचा सारथीही झाला. त्याला योग्य मार्गदर्शन करीत जय मिळवून दिला.

…… आणि एवढं सगळं करूनही अलिप्त तो अलिप्तच राह्यला.

आपल्या मुखातून मातेला ब्रह्मांडाचे दर्शन घडवणारा कृष्ण माझ्या एवढ्याशा शब्दात बांधला जाणार आहे होय ? पण खरंच एवढं कायम वाटतं की, पुत्र, पिता, सखा, मित्र, अगदी पळवून नेणारा प्रियकर आणि नवरासुद्धा श्री कृष्णासारखाच असायला हवा.

© प्रा.सुनंदा पाटील

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments