सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ सागरास… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

नारळी पौर्णिमा झाली आणि सागर थोडासा शांत झाला, त्यामुळे सागरावर जाणाऱ्या मच्छीमारांना आता आपल्या नौका समुद्रात नेता येतील! नारळी पौर्णिमेला समुद्रामध्ये नारळ अर्पण करून सागराची प्रार्थना केली जाते. तो सागर आता आपल्याला नेहमीच चांगली साथ देणारा आहे असा काहीसा विचार मनात आला आणि सागराची विविध रूपे डोळ्यासमोर आली.

असीम, अथांग सागरा, आत्तापर्यंत तू वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या रूपात भेटलास! बालपणी अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरच बालपण गेलं!

काळी वाळू असलेल्या समुद्रावर वाळू तुडवत जाताना सूर्याचा गोळा अस्ताला  जाईपर्यंत दूरवर दिसणाऱ्या बोटीसह तू चित्रात दिसावा तसं मी तुला पाहत होते! तेव्हा तुझी असीमता मला कळत नव्हती, ती माझ्या मनासारखीच छोटीशी होती.

समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, भेळ खाणे आणि तो सूर्याचा लाल गोळा तुझ्या पोटात सामावला की घरी परत यायला निघणे. तुझा अस्त ही आमची घरी परतायची सीमा होती. तो रत्नागिरीचा काळा आणि डोंगरापलीकडचा पांढरा समुद्र बघत मी मोठी झाले!

खूप वर्षांनी मुंबईला जाण्याचा योग आला आणि तुझे चमचमणारा हार घातलेले मरीन ड्राईव्ह वरील रूप डोळ्यांना मोहवून गेले, तर गेटवे ऑफ इंडिया ला जाऊन तुझे खळाळणारे रूप पण पहायला मिळाले. जुहूच्या बीचवर तरुणांचा उसळता समुद्र दिसला तर कधी पाश्चात्यांच्या  अनुकरणात दंग झालेल्या आधुनिक रूपात तू दिसलास!

जसा देश, तसा वेश असा बदलता तू मला नेहमीच भुरळ घालत राहिलास! गोव्यातील समुद्र पाहताना बा.भ.बोरकरांच्या “माझ्या गोव्याच्या भूमीत” कवितेतून दिसणारा तू डोळ्यासमोर येत होतास! किनाऱ्यावरील माडांच्या झावळ्यांचे आच्छादन घेऊन शितलता देणारं तुझं रूप थोडं सौम्य वाटत होतं!

पुढे गुजरात ट्रीप करतानाही तू सांगाती होतास. ओख्याच्या स्वच्छ किनाऱ्यावर शंख शिंपले वेचताना तुझ्या लाटांची गाज माझ्या कानात घुमत होती. द्वारकेला कृष्णाला मनात साठवताना हेच ते ठिकाण जिथे रुक्मिणीसह राजवाड्यात राहताना द्वारका बेटाभोवती संरक्षण देणारा तू होतास!

प्रत्येक ठिकाणी तुझं रूप न्याहाळताना माझी मीच राहत नाही! इतका तू विशाल होऊन मी तुझ्यात सामावून जाते….

आंध्र – ओरिसाची सहल करताना तुला पाहिले ते शांत रूपात! भुवनेश्वरला तुझं एक रूप पाहिलं तर कलकत्त्याला गंगेच्या विस्तीर्ण मुखाला सामावून घेणारा तू होतास!

तुझं खरं रूप पाहायचं ना ते कन्याकुमारीला! बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र तिन्ही तुझीच रूपे, लहान- मोठी! तिन्ही सागर एकत्र पाहिले की तुझी विशालता मनात भरून राहते! कन्याकुमारीला सकाळचं समुद्र दर्शन करताना दूरवर दिसणारा विवेकानंद रॉक! इतक्या गंभीर वातावरणात स्वामीजींनी चिंतन केलं असेल ही कल्पनाच अंगावर काटा उभा करणारी होती! तो ज्ञानरूपी सागर खऱ्या सागरास अर्घ्य देऊन त्या  खडकावर बसला असेल तेव्हा हे तीनही सागर त्याच्या चरणस्पर्शाने अधिकच पुनीत झाले असतील! एक संध्याकाळ कन्याकुमारीत अनुभवली! जिथे बंगालच्या उपसागराचे करड्या रंगाचे, अरबी समुद्राचे निळ्या रंगाचे आणि हिंदी महासागराचे अथांग पाणी, तिन्ही समुद्राचे पाणी एकमेकात मिसळताना पाहताना अंतरंगात इतके भाव उचंबळून आले की त्यांचे वर्णन करता नाही येत!

तुझे रुपच असे विशाल आहे. तुझ्या लांबी, रुंदी, खोलीचे मोजमाप शास्त्राप्रमाणे होत असेल कदाचित, पण खरं सांगू? तुझी अथांगता फक्त दृष्टीला जाणवते, मन जसं अपार, गूढ, अनाकलनीय आहे, तसाच तू अथांग आहेस! तुझ्या पोटात काय काय दडलं असेल!

वीर सावरकरांनी फ्रान्सच्या किनाऱ्यावर ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ म्हणताना, ते ऐकून तू सुद्धा गहिवरला असशील त्यांच्या देशभक्तीने! नाही तर एरवी कोणताही किनारा तुला सारखाच असेल ना भरती ओहोटीच्या लाटांनी वेढलेला! पण सावरकरांना आपल्या भारताच्या किनारपट्टीवरचा तू दृष्टीसमोर होतास!स्वातंत्र्य या भूमीला मिळालेले पाहायचे होते त्यांना! त्यासाठी तर त्यांनी अंदमानचा कारावास भोगला! तिन्ही बाजूंनी तू या भरतभूला वेढलं आहेस!

सह्याद्रीच्या कड्यांपली कडे अरबी समुद्राची तुझी दंतुर किनारपट्टी कोकणचं सौंदर्य वाढवते, तर पूर्वेला गंगा नदीच्या मुखाजवळचे बंगालच्या उपसागराचे बंगाली गाणे ऐकते. केरळच्या देवभूमीवर सागरा, तुझे सारे सौंदर्य फुलून आलेले असते. खरंच, या भरत भूचा एकेक भाग पाहताना मनात असंख्य विचार येतात..

भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक विविधतांनी  नटलेल्या आपल्या भरतखंडाला नगाधिराज हिमालयाचा मुकुट आहे तर तिन्ही सागरांनी वेढलेला रत्नजडीत हार त्याच्या गळ्यात आहे. वेगवेगळ्या संमिश्र भावना तुझ्या दर्शनाने मनात येतात. त्या शब्दरूपात नाही मांडू शकत, पण भक्तीभावाने तुझ्या या निसर्गाच्या रूपा पुढे मी कायमच नतमस्तक होते आणि कृतज्ञतापूर्वक मी हा नारळ तुला अर्पण करून हा नारळी पौर्णिमेचा दिवस साजरा करीत असते!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments