??

☆ दि लास्ट एम्परर… भाग-१ – लेखक : श्री राज ठाकरे ☆ श्री सुनीत मुळे ☆

‘प्रभुकुंज’मध्ये मी एकदा ‘विम्बल्डन’ची एक जबरदस्त मॅच पाहिली होती. मी आणि लतादीदी सोफ्यावर गप्पा मारीत बसलो होतो. तेवढ्यात समोरून मीनाताई आल्या. आमच्या गाण्यांबद्दलच्या गप्पा ऐकून त्याही बसल्या. मग ‘अगं दीदी, ही हरकत अशी नाही, अशी आहे’ वगैरे त्या सांगू लागल्या. इतक्यात उषाताई आल्या, त्या गप्पांत सामील झाल्या. या गप्पा सुरू असल्याचं पाहून हृदयनाथजी आले आणि तेही गाण्यांबद्दल अधिक माहिती देत सामील झाले. मग दीदींनी ‘अरे बाळ. ते गाणं कुठलं’ वगैरे विचारणं सुरू झालं. वेगवेगळ्या गाण्यांच्या आठवणी निघू लागल्या, त्या गाण्यांचे मुखडे गायले जाऊ लागले, गाण्यांची बरसात सुरू झाली आणि त्याच क्षणी समोरून आशाताई आल्या. आशाताई आल्यावर त्या गप्पांची लज्जत अशी काही वाढली, की मला ऐकायला दोन कान कमी पडू लागले. माझ्यासाठी तर रॉजर फेडरर, नदाल, जोकोविच, अँडी मरे, बोर्ग, बेकर हे सगळे जणू एकाच वेळी खेळत होते. ‘दीदी, हे गाणं तसं नाही गं’, ‘आशा, ही ओळ अशी होती’, ‘उषा, ते जरा गाऊन दाखव बरं…’ मी फक्त आणि फक्त श्रवणभक्ती करीत होतो. हे सगळं सलग काही तास सुरू होतं. त्या गप्पा आणि चर्चा रेकॉर्ड करता आल्या असत्या, तर ती चिरंतन स्मृती राहिली असती. मला आजही ती हुरहूर लागून राहिली आहे. ‘आपण किती भाग्यवान आहोत’ असं वाटणारे जे मोजके क्षण आयुष्यात येतात, त्यातला हा एक क्षण होता. दीदी आज आपल्यात नाहीत. सुदैवानं आशाताई आहेत आणि त्यांच्या वयाची नव्वदी साजरी होताना आपण पाहत आहोत. एका अभिजात, श्रेष्ठ आवाजाची नऊ दशकं! आपल्याला अवर्णनीय आणि कालातीत असा आनंद देणारी नऊ दशकं!

मी त्या विशिष्ट काळाचा जेव्हा जेव्हा विचार करतो, तेव्हा मला आशाताई शम्मी कपूरसारख्या वाटतात. शम्मी कपूरसमोर राज कपूर होते, देव आनंद होते, दिलीपकुमार होते. या सगळ्यांनी चित्रपटसृष्टीचा अवकाश व्यापला होता. त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेतून मार्ग काढत, शम्मी कपूर यांनी मोठं यश मिळवलं. स्वतःची वेगळी शैली प्रस्थापित केली. नृत्याची वेगळी स्टाइल लोकप्रिय केली. सोलो फिल्म हिट करून दाखवल्या. हे तीन दिग्गज समोर असताना इतकं सगळं करून दाखवणं महाकठीण होतं. आशाताईंच्या बाबतीतही आपल्याला तेच म्हणता येईल. साक्षात दीदी समोर असताना, गीता दत्तसारखी व्हर्सटाइल गायिका ऐन भरात असताना, आधीच लोकप्रिय झालेल्या शमशाद बेगम, सुरैया या गायिका असताना, स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं, ही खरं तर अशक्यप्राय भासणारी गोष्ट होती; पण आशाताईंनी ती करून दाखवली. आजबाजूला चौफेर प्रतिभांचा सुकाळ असतानाही, शम्मी कपूर यांनी आपल्या नावाचा स्वतंत्र ब्रँड तयार केला; तशीच किमया आशाताईंनीही करून दाखवली.

उत्तुंग काम केलेले काय एकेक कलावंत होऊन गेले आहेत! आजच्या क्षणाचा विचार केला, तर ज्या व्यक्ती हयात आहेत, त्यात केवळ आशाताई या एकच अशा आहेत, की ज्यांना ‘भारतरत्न’ मिळायला हवं. भारताच्या सांगीतिक क्षेत्राकडं पाहिलं, तर माझ्या मते, संगीताच्या क्षेत्रातली आपली जी श्रेष्ठ आणि संपन्न परंपरा आहे, त्यातील आशाताई ‘लास्ट एम्परर’ आहेत. अखेरच्या सम्राज्ञी आहेत. एकाच घरात दोन दोन ‘भारतरत्न’ कसे देता येतील वगैरे सारखे प्रश्न विचारणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. एका घरात दोन महान व्यक्ती जन्माला आल्या आहेत, त्याला काय करणार? ही जर भारताची रत्नं नसतील, तर मग कोण आहेत? ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असं आपण तोंडानं म्हणतो; परंतु ‘भारतरत्न’ देण्याची वेळ आली, की प्रत्येक जण आपापल्या प्रांतातली नावं पुढं करतो. ‘भारत माझा देश आहे’ हे साफ विसरून जातो.

आशाताईंना दुय्यम गाणी मिळाली, असं अनेकांना वाटतं. मला काही ते फार पटत नाही. दुसरं म्हणजे, त्या काळात फक्त ओ. पी. नैयर यांनीच आशाताईंना नायिकेची आणि महत्त्वाची गाणी दिली, या म्हणण्यातही तथ्य नाही. ओपीनं गाणी दिली हे खरं आहेच, त्याबद्दल वादच नाही. ‘आँखो से जो उतरी है दिल में’, ‘आओ हुजूर तुम को’, ‘ये है रेशमी जुल्फों का अंधेरा’, ‘आईये मेहरबाँ’ अशी पन्नास-शंभर गाणी मी लागोपाठ सांगू शकेन. या दोघांच्या गाण्यातलं कुठलं अधिक चांगलं, ते कसं ठरवणार आपण? एकाच ताटात आमरसाची वाटी असेल आणि श्रीखंड असेल, तर त्यातलं कुठलं अधिक चांगलं, ते कसं सांगणार? प्रत्येकाची स्वतःची चव आहे आणि ती तेवढीच श्रेष्ठ आहे; तसंच या गाण्यांचं आहे.

त्या काळातली आशाताईंनी म्हटलेली एस. डी. बर्मन यांची गाणी बघा. मी काही उदाहरणं सांगतो. ‘सुजाता’मधलं ‘काली घटा छाए मोरा जियरा तरसाए’, ‘काला बाजार’मधलं ‘सच हुए सपने तेरे’, ‘बंबई का बाबू’मधलं ‘दिवाना मस्ताना हुवा दिल…’ कसली अफाट गाणी आहेत ही! दीदी आणि एस. डी. बर्मन यांच्यात त्या काळात काही कारणानं वाद झाला होता, म्हणून आशाताईंना ही गाणी मिळाली, असं म्हणणंही साफ चुकीचं आहे. त्या वादामुळं कदाचित चार गाणी जास्त मिळाली असतीलही; परंतु दीदींशी संबंध उत्तम असतानाही एस.डी.नं अत्यंत वेगळी आणि महत्त्वाची अनेक गाणी आशाताईंना दिली आहेत. नायिकांची गाणी आशाताईंना मिळाली नाहीत, असं उगाचच कुणी तरी हवेत पसरवलेलं आहे. हजारो गाणी आहेत आशाताईंनी नायिकांसाठी गायलेली. ‘बंदिनी’ या चित्रपटाच्या वेळेस लतादीदी आणि बर्मनदा यांच्यातला वाद मिटला. त्या चित्रपटातही दीदींना दोन गाणी आहेत आणि आशाताईंनाही दोन गाणी आहेत. मला वाटतं गुलजार साहेबांचं कारकीर्दीतलं पहिलं गाणं ‘मोरा गोरा अंग लईले…’ याच चित्रपटातलं आहे आणि ते दीदींचं आहे. याच चित्रपटातली ‘अब के बरस भेज भैया को बाबूल’ आणि ‘ओ पंछी प्यारे’सारखी दोन अतिशय मोहक, मधाळ गाणी आशाताईंनी गायली आहेत. या गाण्यांना दुय्यम म्हणायची हिंमत कोणी करील का? 

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री राज ठाकरे

प्रस्तुती –  श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments