सुश्री शांभवी मंगेश जोशी
☆ गुंतता जीव हा — ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆
आज सकाळी ड्राय बाल्कनीचं दारं उघडून पाहिलं तर केराची बादली चक्क कलंडलेली! जरा सावधपणे हळूच पुढे जाऊन पाहिलं . मांजरही नाही अन् चारापैकी एकही पिल्लू कुठेच दिसले नाही .
मी हुश्य केलं.
मागच्या मंगळवारी सकाळी उठल्यावर केराच्या बादलीत मांजराने पिल्लं घातलेली दिसली.
.. ई….. शी…… करून मी एकदम ओरडलेच ! घाबरलेच होते मी. आता काय करणार ? बाल्कनीत जायची पंचाईत ! खरंच सांगते मांजर हा प्राणी मला अजिबात आवडत नाही .तिची पिल्लंही ! उगाच सारखी पायात पायात येतात. पण आता करणार काय? बादली बाहेर ठेवून दिली की झालं ! पण छे ! कुत्री त्यांचा घास घेतील लगेचच !
एखाद्या जीवाचं जगणं नाकारण्याचा आपल्याला काय अधिकार ? छे….! पण मग ? करायंचं काय ? तूर्तास तरी ते दारं बंद करून ठेवणे, एवढंच हातात होतं .पण मनाचे दारं काही बंद ठेवता येईना. या काळात मांजर फार हिंस्त्र होते म्हणे ! दुपारी कामवाली आली. म्हटलं,” आता भांडी कुठं घासणार? “ती बिनधास्त. “ इथच” म्हणून तिने न घाबरता दणादणा भांडी घासली. ते पाहून मला जरा आत्मविश्वास आला.
मी जरावेळाने हळूच भीत भीत बादलीत डोकावून पाहिलं. मांजरीनेही क्षीणपणे डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं. तिच्या अंगात अजिबात त्राण नव्हतं .तरीही चार पिल्लांची ती आई होती . त्याची काळजी तिच्यासाठी होती. दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या पाहिलं . तर तीही माझ्याचकडे पहात होती. डोळयात डोळे घालून… डोळ्यात पिल्लांची काळजी होती. दयायाचना होती, क्षमायाचना होती. पिलांची काळजी होती..माझंही मन द्रवलं .ठीक आहे राहील चार आठ दिवस.
मीच घाबरलेली आहे, हे तिच्या लक्षात आलं असावं. तशाही अवस्थेत .! त्यामुळे माझ्यापासून काही भीती नाही, हे तिला कळलं असावं. ती निवांत झाली. डोळे मिटून पडून राहिली . श्रांत क्लांत ! मी मग ते दार लावून माझी कामं करत राहिले. पण डोक्यात तिचेच विचार ! लांबून लांबून तिला पहात राहिले… ती काय करतेय? पिल्लं काय करताहेत ?
मग अनेकांनी सांगितलं, ती जाते म्हणे तिची पिल्लं घेऊन .पण कधी ?
हं … राहिल चार आठ दिवस. मी माझ्या कामात अडकले. तिलाही माझ्या मनातले भाव कळले असावेत. ती निवांत झाली. रोज पिलांना ठेवून बाहेर जाऊन येऊ लागली. माझ्या भरोशावर? पण एकीकडे मी अस्वस्थ होऊ लागले. कधी हलणार ही ? मला दारं उघडतां येईनात. आज उठल्या उठल्या पाहिलं तर कोणी दिसेनात . मला एकदम सुनं सुनं वाटू लागलं. कुठे गेली असेल पिलांना घेऊन? नीट नेलं असेल ना? सुरक्षित जागा मिळाली असेल का? मग मी आजूबाजूच्यानाही विचारत राहिले. मांजराला पाहिलं का? पिल्ल दिसली का?… काय कारण होत मला एवढी चिंता करण्याचं ? जे अजिबात आवडत नव्हतं त्यांचं पालकत्व घेण्याचं ? पण माझ्याही नकळत ते होत राहीलं. चार पाच दिवस तरी तो विचार काही डोक्यातून जाईना. मला अगदीच रितं रितं वाटत राहिलं. मलाच गंमत वाटली माझ्या मनाची…
कसा जीव गुंततो ना ??
© सौ. शांभवी मंगेश जोशी
संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003
फोन नं. 9673268040, [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈