श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “अंतिम पर्वाच्या स्मितरेषा…” ☆ श्री सुनील देशपांडे

आयुष्याचा ७३ वर्षाचा प्रवास संपवून आज ७४ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. बरंच आयुष्य जगून झालेलं आहे. बाकी आयुष्य फार थोडं उरलेलं आहे याचे जाणीव आहेच. खरं तर या दिवसाला वाढदिवस का म्हणतात हे समजत नाही. आयुष्यातलं एक वर्ष कमी होतं. वाढतो फक्त एक आकडा. जगलेल्या आयुष्याचा.  त्या वाढलेल्या आकडेवारीमुळे  लोकांना या माणसाने काहीतरी केलं असेल असं वाटत असावं.

तसं पाहायला गेलं तर करण्याच्या इच्छा प्रचंड असतात. साऱ्या इच्छा पूर्ण होतातच असे नाही. अर्थात अपूर्ण इच्छाच जास्त असतात. पण तरीही  आयुष्यात समाधान बाळगावं अशा गोष्टी घडल्यास जाताना तरी चेहऱ्यावर स्मितरेषा उमटेल.

बाळ कोल्हटकर यांच्या एका नाटकातील कवितेच्या ओळी आठवतात ….. 

आयुष्याचा माग मिळेना, गुन्हा कळेना जगदीशा ।

कुठे कधी अस्पष्ट हसावी एखादी तरी स्मितरेषा।।

आयुष्यामध्ये चेहऱ्यावर स्मितरेषा उमटण्यासारख्या घटना तशा कमीच असतात.

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे।

परंतु आयुष्याच्या शेवटाकडे असताना सिंहावलोकन करताना काही समाधानाच्या स्मितरेषा नक्कीच चेहऱ्यावर असणार आहेत.

मुले कर्तृत्ववान आणि आई-वडिलांची काळजी घेणारी असावीत हा सगळ्यात मोठा कौटुंबिक समाधानाचा ठेवा. त्याची एक स्मितरेषा !

आपल्या देशात अवयवदान आणि देहदान या सर्व महादानाचे प्रमाण वाढते आहे ही एक सामाजिक स्मितरेषा !!

साहित्य विश्वात छोटीशी लुडबुड करून स्वतःच्या मनाचे समाधान करून घेता आले ही मानसिक समाधानाची अजून एक स्मितरेषा!!!

रोटरी मार्फत समाजाच्या उपयोगाचे काही उपक्रम करता आले त्याची एक आंतरराष्ट्रीय सामाजिक स्मितरेषा!!!!

आपल्या देशाचा झेंडा वैज्ञानिकांनी चंद्रावर फडकवला आणि आता मंगळ पदाक्रांत करून शुक्रापासून सूर्यापर्यंत लक्ष्यांचा पाठपुरावा चालू ठेवला आहे ही राष्ट्रीय स्मितरेषा !!!!!

पत्नीची साथ शेवटपर्यंत (कुणाच्या ? ते माहित नाही) असेलच ४६ वर्षांचा सहवास ही आणखी एक स्मितरेषा !!!!!!

काही मित्रमंडळी, काही नातेवाईक, समाजकार्यातील सहकारी या सर्वांच्या आठवणीमध्ये माझी एखादी तरी स्मृती नक्की असेल याचे समाधान ही एक स्मितरेषा !!!!!!!

अशा अनेक स्मितरेषा या जगातून एक्झिट घेताना चेहऱ्यावर असतील आणि ही समाधानाची लकेर घेऊन या जगातून एक्झिट मिळेल हा आनंदाचा भाग.

(आयुष्याचे शेवटचे पर्व हे पुण्यात घालवता येणे हे, पुण्याचे (?) असले तरी त्यामध्ये आयुष्यभर गमावलेले पुण्य खर्ची पडेल काय ? ही सुद्धा भीती आहेच.)  

आयुष्याच्या शेवटच्या पर्वात आनंदाचे डोही आनंद तरंग या अवस्थेत असणे हे सगळ्यात मोठे भाग्य माझ्या वाट्याला आले याचे समाधान खूप मोठे आहे.

शेवटी माझ्याच एका जुन्या कवितेच्या  ओळी …… 

‘शेवटचे मिटताना डोळे, चेहऱ्यावरती स्मित  विलसावे !’ 

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments