डॉ. प्राप्ती गुणे

? मनमंजुषेतून ?

☆ “डीजेवाले बाबू … मला अंध नका करू…” – लेखक : डॉ. गणेश भामरे / डॉ. सचिन कासलीवाल ☆ प्रस्तुती – डॉ. प्राप्ती गुणे ☆

कालच अनंत चतुर्दशी आनंदात पार  पडली आपल्या लाडक्या गणरायाला आपण आनंदात विसर्जित केलं. ढोल ताशा आणि हा … आत्ता सध्या  D  J च्या   ट्रेण्डिंग  गजरात आपण नाचत, थिरकत गणपती बाप्पाला निरोप दिला !

दुसर्‍याच दिवशी मी नेहमीप्रमाणे ओपीडी मध्ये नेत्ररोगाचे रुग्ण पाहू लागलो. थोड्या वेळात एक विशीतला तरुण काल अचानक दिसायला कमी झालं म्हणून आला. प्राथमिक तपासणी करून बघितली तर त्याची नजर खूपच कमी झाली होती.  मग डोळ्याचे pressure घेऊन त्याला नेत्रपटल तपासणीसाठी घेतले.  बघतो तर काय त्याच्या नेत्रपटलावर खूप मोठे रक्त साखळले होते आणि नेत्रपटलावर भाजल्यासारख्या जखमा आढळल्या. 

नेहमीप्रमाणे वाटणारा हा आजार नव्हता याची मला जाणीव झाली. मग फेर हिस्टरी तपासणीत त्याला विचारलं की काही मार लागला होता का?  किंवा तू काही ग्रहण बघितले का? की कुठे वेल्डिंग बघितले? तर यातील काहीच पॉझिटिव्ह नव्हते . खोलवर विचार केल्यावर त्याने सांगितलं की काल मिरवणुकीत नाचलो आणि D J वर लेसर शो बघितला.  

मग मनात पाल चुकचुकली आणि लेसर शोचा लेसर बर्न रेटिना वर असल्याची खात्री पटली. मग रेटिनाचा O C T स्कॅन करून माझं निदान कन्फर्म केलं. पुढील दोन तासात असेच जून दोन रुग्ण आलेत.  त्यांना पण रेटिनावर याच प्रकारचे चित्र दिसले. मग मात्र मी आमच्या नेत्ररोग संघटनेच्या माध्यमातून विचारपूस केली असता अजून दोन हॉस्पिटलला असेच रुग्ण आहेत असे निदर्शनात आले.

बापरे ! म्हणजे ५ च्यावर तरुण एकाच दिवशी DJ लेसर शोचे शिकार झालेले पाहिले. यातील बरेच जण अजून कदाचित रिपोर्ट झालेले नसतील किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्टचे असतील. हा आकडा याहून जास्त प्रमाणात असावा .. नेत्रपटलावर आम्ही या प्रकारचे लेसर बर्न क्वचितच बघितले असावेत. 

हा काहीतरी भलताच प्रकार समोर आला आणि जनजागृतीसाठी हा पत्रप्रपंच केला. मग प्रश्न पडला की, ठराविक लोकांनाच असे का झाले. याचा खोलवर अभ्यास केला आणि कळाले की या green लेसरचे frequency खूप जास्त होती आणि जे युवक त्या लेसर च्या frequency च्या फोकल लेंग्थवर आलेत किंवा त्यांचे नेत्रपटल आले, त्यांनाच हे प्रकार घडले. आपण लहानपणी भिंग घेऊन ज्याप्रमाणे उन्हात कागद पेटवायचो तसाच  प्रकार या लेसरने या तरुणाईवर केला होता.

असल्या लेसर वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. नाहीतर याचे भयंकर परिणाम पुढील नवरात्र आणि दिवाळीत दिसतील आणि कित्येक निष्पाप लोकांची नजर यात जाईल. आपल्याकडच्या भाऊ ,दादा आणि राजकारणी चमकोगिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या DJ लेसरचा इतका वाईट परिणाम सामान्य नागरिकांवर होईल याची यत् किंचित कल्पना पण करवत नाही. 

या सगळ्या तरुणांना आणि तरुणींना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या करियरसाठी किती भयावह असेल?  यातील बरीच मंडळी उच्च शिक्षण घेणारी होती. 

प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि वेळीच हा प्रकार थांबवावा. नाहीतर लातूरच्या अनंत चतुर्दशीच्या भूकंपाप्रमाणे अंधत्वाचा भूकंप आपली वाट बघत आपल्या तरुण पिढीचा घास घेईल.

लेखक : 

डॉक्टर गणेश भामरे (रेटिना स्पेशालिस्ट )

डॉक्टर सचिन कासलीवाल (नेत्ररोग तज्ज्ञ )

 जनहितार्थ : नाशिक नेत्ररोग तज्ञ संघटना ) 

संग्राहिका –  डॉ. प्राप्ती गुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments