☆ “प्रश्न अनेक, पण उत्तरांचा पत्ताच नाही !” – भाग-१ … लेखक : डॉ. मयुरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
रात्री लक्ष्मी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका चना जोर गरम वाल्याकडून सात-आठ जणांच्या टोळक्यानं भेळ घेतली. पैसेच दिले नाहीत. त्यानं पैसे मागितले तेव्हा सगळेजण त्याच्या अंगावरच धावून गेले आणि त्या पन्नाशीच्या वयाच्या माणसाला दमदाटी केली, एक-दोन टोलेही दिले. तो माणूस बिचारा घाबरून गेला, जागेवर थरथर कापायला लागला. ती पोरं त्या माणसाची टर उडवत, हसत खिदळत निघून गेली. जाताना त्याच्याकडची चुरमुऱ्याची पिशवीच उचलून घेऊन गेली. आता चुरमुरेच गेले म्हटल्यावर याचा धंदाच संपला !
पंधरा-वीस जणांच्या टोळक्यानं रात्री साडेतीन-चारच्या सुमारास एका मिल्कशेक वाल्याला धरलं. त्याच्याकडून पंधरावीस मिल्कशेक घेतले. पैसे मागितल्यावर दमदाटी केली, धक्काबुक्की केली. हपापाचा माल गपापा ! थोड्याफार फरकानं असे अनेक प्रसंग काल डोळ्यांसमोर घडताना दिसत होते.
गर्दीचा फायदा घेऊन मुली आणि स्त्रियांच्या जवळ जाऊन स्पर्श करण्याचे आणि छेड काढण्याचे तर अक्षरश: शेकडो प्रकार घडत होते. ढोल-ताशांच्या ठेक्यावर काही मुली नाचू लागल्या. लगेच बाजूला चार-पाच पोरं जमा झाली. नाचता-नाचता मुलींच्या अगदी जवळ जाऊ लागली. बेसावध मुलगी बघून तिच्या कानात कर्कश पिपाणी वाजवणे, तिचं लक्ष नसल्याचं पाहून हळूच तिच्या चेहऱ्यावर सिगारेटचा धूर सोडणे, जळती सिगारेट हातावर टेकवणे, ओढणी किंवा वेणी ओढणे, तरूण मुली किंवा स्त्रियांच्या जवळ जाऊन मुद्दामच घाणेरड्या शिव्या देणे असे विकृत प्रकार तर अनेक पाहिले. “विनाकारणच धक्काबुक्की करून पोरीबाळींना त्रास देण्याची हक्काची जागा म्हणजे मिरवणुकांचे रस्ते !” असाच समज समाजानं करून घेतलेला दिसतो. हा समज की गैरसमज याचं उत्तर कुणाकडे आहे?
अत्यंत गर्दीच्या ठिकाणी आपण कोणते कपडे घालावेत किंवा कसं वावरावं याचं भान युवतीच काय पण स्त्रियांनाही नव्हतं, हे दुर्दैवानं आणि खेदानं नमूद करावंसं वाटतं. स्त्रियांविषयीच्याच अश्लील आणि द्वैअर्थी गाण्यांवर स्त्रियांनीच बेभान होऊन नाचावं, म्हणजे कमाल झाली !
दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांचा तर सुळसुळाट झालेला होता. रस्त्यावरच खुलेआम बसून मद्यप्राशनाचे कार्यक्रम सुरू होते. नीलायम टाॅकीज जवळ तीन-चार मुलं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाक्यांची तोडफोड करत होती. त्यांनी आठ-दहा गाड्यांचं प्रचंड नुकसान केलं. रस्ते बंद करण्यासाठी वापरलेले बांबूचे तात्पुरते अडथळे तर लोकच मोडून टाकतात, हा दरवर्षीचाच अनुभव आहे. पण बंद दुकानांची शटर्स तंबाखू, गुटख्याच्या पिंका टाकून रंगवणे, फ्लेक्स फाडणे, दुकानांच्या बाहेरचे दिवे काढून ते फोडणे, चारचाकी-दुचाकी गाड्यांना स्क्रॅचेस मारणे, आरसे फोडणे असे उद्योग सर्रास घडत होते.
डुकराच्या ओरडण्यासारख्या आवाजाच्या पिपाण्या वाजवत रस्त्यावर मोकाट फिरायचं, तऱ्हेतऱ्हेचे विचित्र प्राण्यांचे आणि कवट्यांचे मुखवटे तोंडाला लावून मोकाट फिरायचं, मक्याची कणसं किंवा पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पायानं टोलवत टोलवत फिरायचं… या गोष्टी सामाजिक एकात्मता, देवभक्ती, देशभक्ती, हिंदू धार्मिक परंपरांविषयीचं प्रेम-आस्था-आपुलकी, मंगलमय पवित्र वातावरण यापैकी नेमकं काय करतात? याचं खरंखुरं उत्तर कुणी देऊ शकेल का?
हा काही आजचाच प्रकार आहे असं नाही. २००६-०७ साली मी पुण्यात काॅट बेसिसवर राहत होतो तेव्हाची गोष्ट. गणपती उत्सव जवळ आलेला. संध्याकाळी दारावरची बेल वाजली. दार उघडलं, एकदम चार-पाच माणसं थेट घरातच घुसली. दोन जणांनी सगळं घर फिरून पाहिलं. किती जण राहता वगैरे चौकशी केली. आणि चौघं राहताय ना, मग प्रत्येकी ३००/- प्रमाणे १२००/- रूपये द्या असं म्हणून बसून राहिले. शेवटी खूप अर्जविनंत्या करून प्रत्येकी १५०/- प्रमाणे ६००/- रूपये घेतले आणि गेले. हाच प्रकार २०१८ सालीदेखील सुरू आहे.
सातारा रोडवरच्या एका हाॅटेलमध्ये ऐन गणेशचतुर्थीच्याच दिवशी रात्री जवळपास ३०-४० माणसं पावतीपुस्तक घेऊन आली. काऊंटरवर जोरदार बाचाबाची सुरू होती. यातली बरीचशी पोरं पंचविशीच्या आतलीच. इकडे हात घाल, तिकडे हात घाल असे उद्योग सुरू होते. एकदोघांनी ज्यूस काऊंटरवरची फळंच उचलून नेली. एकजण पावभाजी काऊंटरवरचे टोमॅटो-काकडीचे काप खात उभा होता. एकाने तर कहरच केला. आॅर्डर घेऊन जाणाऱ्या वेटरला अडवलं आणि त्याच्या ट्रे मधल्या तीन-चार मसाला पापडच्या डिश काढून घेतल्या. तिथंच खात उभा राहिला. मग इतरांना जरासं धैर्य आलं. मग कोल्ड्रींक्सचा फ्रीज उघडून बाटल्या काढून घेऊ लागले, एकानं चीज क्यूब्ज चा बाॅक्सच उचलला. हा सगळा प्रकार अर्धा तास सुरू होता. काऊंटरवरचा माणूस मला म्हणाला, “व्यवसाय करायचा असेल तर हे सगळं सहन करावं लागतंच. नाहीतर तोडफोड करतात, नुकसान करतात, आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात, मारहाण करतात. पंचवीस हजार मागत होते, दहा हजारात फायनल होतंय बहुतेक.”
– क्रमशः भाग पहिला
लेखक : डॉ. मयुरेश डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈